फोनमधील ‘हा’ Folder तुम्ही कधीच Delete करू शकत नाही, पण का?

LOST.DIR फोल्डर म्हणजे लॉस्ट डिरेक्टरी होय. हा एक सिस्टम फोल्डर आहे जो अँड्रोईड स्वत: तयार करते.


कोणालाच आपला फोन हँग व्हावा किंवा हॅक व्हावा असे वाटत नसते. अशावेळी अनेक जण आपल्याला सल्ला देतात की मेमरी फ्री कर आणि नको असलेल्या फोल्डर्स डिलीट कर, मग आपण लागतो कामाला, नको असलेल्या फोल्डर्स डिलीट करायला. आता यात दोन प्रकारचे लोक असतात एक म्हणजे जे प्रत्येक फोल्डर उघडून त्यात काही आहे की नाही ते तपासतात आणि मगच तो फोल्डर डिलीट करतात. तर दुसरा प्रकार अशा लोकांचा असतो जे ओळखीच्या नसलेल्या फोल्डर्स थेट डिलीट करतात.

तुम्ही कोणत्याही प्रकारातले का असेना तुम्हाला एक अनुभव नक्की आला असेल. जेव्हा तुम्ही मेमरी कार्ड मधून फोल्डर डिलीट करता तेव्हा त्यात LOST.DIR नावाचा एक फोल्डर सुद्धा डिलीट करता. कारण तो बहुतांश वेळा रिकामीच असतो. पण जेव्हा तुम्ही पुन्हा काही दिवसांनी पाहता तेव्हा तो फोल्डर पुन्हा तिथे असतो. काय आहे नेमकं या फोल्डरमागचं गौडबंगाल?

Source : easeus.com

LOST.DIR फोल्डर म्हणजे लॉस्ट डिरेक्टरी होय. हा एक सिस्टम फोल्डर आहे जो अँड्रोईड स्वत: तयार करते. नावाप्रमाणे यात गहाळ झालेल्या फाईल्स स्टोर होतात. थांबा, गल्लत करू नका, गहाळ झालेल्या फाईल्स म्हटलं, डिलीट झालेल्या नाही.

आता फाईल्स गहाळ होणे म्हणजे काय? तर समजा तुम्ही एखादी फाईल इंटरनेट वरून डाऊनलोड करत आहात आणि अचानक तुमचा फोन बंद झाला, समजा तुम्ही कॉम्प्यूटर मधून एखादी फाईल कॉपी करत आहात आणि अचानक तुमचा फोन बंद झाला, समजा तुम्ही एखाद्याकडून काही फाईल्स मोबाईलच्या माध्यमातून ट्रान्सफर करत आहात आणि अचानक तुमचे मेमरी कार्ड हलले वा तुम्ही ते स्वत:च काढले तर या सर्व प्रसंगात फाईल मेमरी मध्ये स्टोर होण्याची प्रक्रिया थांबते. अशावेळी त्या फाईलची एक कॉपी LOST.DIR मध्ये स्टोर होते. म्हणजे तुम्ही पुन्हा Retry करून त्या फाईल्स जिथून कॅन्सल झाल्या तिथून कॉपी किंवा डाऊनलोड करू शकता. जर हे नाहीच करता आले तर Recovery Software चा वापर करून तुम्ही या फाईल्स मिळवू शकता.

म्हणजे पाहायला गेलं तर ही फोल्डर तशी कामाची आहे सुद्धा आणि नाही सुद्धा! कारण जरी तुमची कॉपी किंवा डाउनलोड प्रक्रिया थांबली तरी तुम्ही पुन्हा ती नव्याने करूच शकता की! आता राहिला अजून एक प्रश्न ही फोल्डर डिलीट करावी का? केली तर काही प्रॉब्लेम होईल का? तर उत्तर आहे अजिबात नाही.

तुम्ही बिनधास्त ही फोल्डर डिलीट करू शकता. यामुळे काहीच प्रॉब्लेम होणार नाही. पण जेव्हा जेव्हा तुम्ही फोन रिस्टार्ट कराल तेव्हा तेव्हा ही फोल्डर मेमरी कार्ड मध्ये परत येईल. तुम्ही जेव्हा फोन रिस्टार्ट करता तेव्हा तुम्हाला एक नोटीफिकेशन येत असेल की ‘Preparing for sd card’ तर यावेळेस अँड्रोईड हेच चेक करत असतं की तुमच्या  LOST.DIR फोल्डर मध्ये कोणत्या  कॅन्सल झालेल्या फाईल्स तर नाहीत ना आणि जर तुम्ही LOST.DIR डिलीट केला असेल तर हेच चेक करण्यासाठी अँड्रोईड  ऑटोमॅटिकपणे पुन्हा ही फोल्डर तयार करते. कारण फोल्डर असेल तरच आत फाईल्स आहेत की नाही ते चेक करणार ना!

बस्स हेच आहे या LOST.DIR फोल्डरचं गौडबंगाल, ज्यापासून तुम्ही कधीच तुमचा पिच्छा सोडवू शकत नाही. एखाद्या वेताळाप्रमाणे सदानकदा हा फोल्डर तुम्हाला तुमच्या मेमरी कार्ड मध्ये दिसणारच!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

D Vishal