त्यांनी उद्धव ठाकरेंचा पुतळा जाळला, आपण कन्नड पाट्यांना काळे फासले….काय आहे बेळगाव सीमा वाद?

कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील आंतरराज्य वाद स्वातंत्र्यकाळापासून म्हणजेच १९५६ मध्ये जेव्हा भाषेच्या आधारे दोन्ही राज्यांचे वर्गीकरण झाले तेव्हापासुन सुरू आहे.


महाराष्ट्र आणि कर्नाटक हे भारतातील अतिशय लोकप्रिय राज्ये आहेत. दोन्ही राज्यांना खूप सुंदर असा इतिहास, संस्कृती, खाद्य संस्कृती, भाषा, वेशभूषा आणि माणसे लाभली आहेत. परंतु, कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील आंतरराज्य वाद स्वातंत्र्यकाळापासून म्हणजेच १९५६ मध्ये जेव्हा भाषेच्या आधारे दोन्ही राज्यांचे वर्गीकरण झाले तेव्हापासुन सुरू आहे.

महाराष्ट्रात अनेक मराठी भाषिक लोक तर कर्नाटकात कन्नड भाषिक लोक जास्त आढळतात. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील हा वाद वर्षानुवर्षे सुरूच आहे. कर्नाटकच्या बेळगावी भागात या वादाने आता पुन्हा डोके वर काढले आहे. या वादामागचे खरे कारण आपण जाणून घेऊयात.

Source: loksatta.com

गेल्या काही काळापासून बेळगावजवळील महाराष्ट्र कर्नाटक सीमेच्या दोन्ही बाजूंना सतत तणाव दिसून येतो. या तणावामुळे बेळगावी जिल्ह्यावरून महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्ये अनेकदा एकमेकांना भिडतात सुद्धा, अनेकदा याचे मोठे पडसाद देखील उमटतात!

२९ डिसेंबर २०२१ ला महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील बससेवा थांबवण्यात आली. त्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात कन्नड चित्रपटाचे प्रदर्शन रोखले आणि कर्नाटकात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

पण काय आहे हा नेमका वाद? महाराष्ट्र आणि कर्नाटक बेळगाव प्रश्नी सतत भांडत का असतात? चला जाणून घेऊ सगळ्या गोष्टी!

बेळगाव हा कर्नाटकातील एक जिल्हा आहे जो महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या सीमेवर आहे. या जिल्ह्यात कन्नड आणि मराठी या दोन्ही भाषा बोलणारे लोक राहतात. ब्रिटिश राजवटीपासून भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९५६ मध्ये बेळगावच्या आसपासचे भाग कर्नाटकचा भाग बनले. तेव्हापासून हा परिसर वादात सापडला आहे.

भारत सरकारने १९६६ मध्ये हा सीमावाद पाहण्यासाठी महाजन आयोगाची स्थापना केली होती. सीमावादावर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी कर्नाटकने बेळगावला आपली दुसरी राजधानी म्हणून घोषित केले आणि बेळगावचे नाव बदलून बेळगावी केले. तसेच, नव्याने बांधलेल्या विधानसभेत हिवाळी अधिवेशन आयोजित केले.

Source : tfipost.com

एमईएस (महाराष्ट्र एकीकरण समिती) कर्नाटकातील ८०० गावे महाराष्ट्रात घेण्यासाठी लढा देत आहेत. डिसेंबर २००५ मध्ये केंद्रातील काँग्रेस सरकारने या वादावर पुन्हा चर्चा सुरू केली आणि २००७ मध्ये महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेत महाराष्ट्र सरकारने कर्नाटकातील मराठी भाषिक लोकांना बाजूला केले जात असल्याचा दावा केला होता.

दरम्यान, सीमाभागाच्या राज्यात विलीनीकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपच्या प्रत्येक निवडणूक जाहीरनाम्यात या वादावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिसून येते.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डिसेंबर २०१९ मध्ये या वादाचा खटला लवकरात लवकर लागण्यासाठी छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांची सह-समन्वयक म्हणून नियुक्ती केली. तसेच ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभेत असा आरोपही केला की भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्रसरकार कर्नाटकची बाजू घेत आहे आणि या वादावरील सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्यात महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करत आहे.

शिवसेनेच्या सदस्यांनी कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने केली आणि मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. इतकेच नव्हे तर ते कोल्हापुरातील अप्सरा थिएटरमध्ये घुसून कन्नड चित्रपट ‘अवने श्रीमन्नारायण’ चे प्रदर्शन थांबवले होते. कन्नडमध्ये असलेल्या दुकानांच्या पाट्यांनाही त्यांनी काळे फसले होते.

एकंदर हा वाद असा आहे जिथे कोणत्याच बाजूकडचे लोक मागे हटायला तयार नाहीत आणि यावर सामंजस्याने व शांतपणे तोडगा कधीतरी निघेल याची शक्यता कमीच आहे कारण बेळगाव हे कर्नाटकात असले तरी महाराष्ट्राचा सुद्धा त्यावर तेवढाच हक्क आहे याची साक्ष खुद्द इतिहास सुद्धा देते!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

Gayatri Gurav