भारत विरुद्ध पाकिस्तान : कधीही न विसरता येणाऱ्या ५ बेस्ट मॅचेस!

हा सामना जिंकून आपल्या देशात ‘दिवाळी’ साजरी व्हावी म्हणून भारत झगडत असतो. तर आपल्या देशात ‘ईद’ साजरी व्हावी म्हणून पाकिस्तान झटत असतो.


भारत विरुद्ध पाकिस्तान म्हणजे क्रिकेट जगतातील सर्वात मोठा ‘सामना’! आणि हा सामना जेव्हा वर्ल्ड कपचा असतो तेव्हा तो केवळ दोन टीम्स मधला नसतो. तेव्हा या सामन्यात दोन देश, करोडो नागरिक आणि अगणित भावना यांचे द्वंद सुरु असते. हा सामना जिंकून आपल्या देशात ‘दिवाळी’ साजरी व्हावी म्हणून भारत झगडत असतो. तर आपल्या देशात ‘ईद’ साजरी व्हावी म्हणून पाकिस्तान झटत असतो. पण प्रत्येक सामन्यानंतर दोन्ही देशांत काही ना काही फुटतेच. कुठे फटके फुटतात, तर कुठे टीव्ही!

Source : gqindia.com

आजवरचा वर्ल्ड कप सामान्यांचा इतिहास पाहिला तर मात्र भारतात सर्वात जास्त फटाकेच फोडले गेले आहेत असे दिसून येते.

२०२१ पर्यंत भारत आणि पाकिस्तान कसोटी, वन डे आणि टी 20 अशा सर्व फॉरमॅट मध्ये एकूण १९९ वेळा समोरा समोर उभे ठाकले होते आणि २४ ऑक्टोबर २०२१ रोजी २०० व्या वेळा दोन्ही संघ एकमेकांसमोर आले, पण दुर्दैवाने या सामन्यात भारताला अत्यंत लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. पण ही एक मॅच वगळता जेव्हा जेव्हा भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचची चर्चा होते तेव्हा जुन्या काही आठवणीतल्या मॅचेस आपल्या डोळ्यांपुढे येतात. अशाच काही मॅचेस आहेत ज्या एकही क्रिकेट रसिक कधीच विसरणार नाही.

पहिल्या क्रमांकावर आहे ४ मार्च १९९२ साली सिडनी येथे खेळवली गेलेली मॅच! ही तीच मॅच आहे जेव्हा जावेद मियांदाद याची विकेट कीपर किरण मोरे याच्याशी शाब्दिक बाचाबाची झाली आणि जावेद मियांदादने कांगारू सारख्या उड्या मारायला सुरुवात केली. या मॅच मध्ये भारताने २१६ रन्सचे दिलेले टार्गेट पाकिस्तानला काही पेलवले नाही आणि १७३ रन्स वर पाकिस्तानची पूर्ण टीम ऑल आउट झाली. पूर्ण भारतीय टीमने मिळून जबरदस्त खेळ केला होता.

दुसऱ्या क्रमांकावर आहे १ मार्च २००३ साली सेंच्युरीयन येथे खेळवण्यात आलेली मॅच! ही मॅच सचिन आणि शोऐब अख्तर यांच्यात रंगलेल्या जबरदस्त जुगलबंदीसाठी अविस्मरणीय ठरली. पाकिस्तानने दिलेले २७४ रन्सचे आवाहन भारताने ६ विकेट्स राखून सहज पार केले. या सामन्यात सचिन आणि सेहवाग जोडीने केवळ ४ ओव्हर्स मध्ये फक्त अप्पर कट मारून तब्बल ५० रन्स जोडले होते.

तिसऱ्या क्रमांकावर आहे ९ मार्च १९९६ रोजी बेंगळूरू येथे खेळवण्यात आलेली मॅच! या मॅच मधील तो क्षण कोणीच विसरू शकणार नाही, जेव्हा अमीर सोहेलने व्यंकटेश प्रसादला पुढील बॉल वर फोर मारतो की नाही बघ असे खुणावले आणि त्याच बॉलला व्यंकटेश प्रसादने अमीर सोहेलला क्लीन बोल्ड केले होते. शिवाय याच मॅच मध्ये जेव्हा भारताला गरज होती तेव्हा अजय जडेजाने २५ बॉल्स मध्ये ४५ रन्स ठोकून पाकीस्तानच्या मनसुब्यांना सुरंग लावला होता.

चौथ्या क्रमांकावर आहे ८ जून १९९९ मध्ये मँचेस्टर येथे खेळवण्यात आलेली मॅच! या मॅच मध्ये भारताने दिलेले २२८ रन्सचे टार्गेट पूर्ण करताना पाकिस्तानच्या नाकी नऊ आले होते. व्यंकटेश प्रसाद याने फक्त २७ रन्स मध्ये ५ विकेट्स घेऊन पाकिस्तानचा अक्षरश: धुव्वा उडवला होता. तेव्हा पूर्ण पाकिस्तानच्या टीमचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.

पाचव्या क्रमांकावर आहे २००७ सालची टी 20 वर्ल्ड कप फायनल मॅच! धोनीची जबरदस्त कॅप्टन्सी आणि श्रीशांतने शेवटच्या बॉलला पकडलेली कॅच आजही कोणी विसरू शकत नाही. टीम इंडिया या मॅचमध्ये हरणार असे भाकीत अनेकांनी वर्तवले होते, पण नव्या दमाच्या टीम इंडियाने दिग्गजांनी भरलेल्या पाकिस्तानला अक्षरश: गुडघे टेकायला भाग पाडले आणि पाकिस्तान मध्ये त्या रात्री खूप टीव्ही फुटल्या.

तर मंडळी अशी आहे ही Rivalry, जी कधीच संपणार नाही, कारण या Rivalry तर खरी मज्जा आहे!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

D Vishal