ज्याच्यापुढे योगी आदित्यनाथ सुद्धा नतमस्तक होतात अशा युपी मधल्या ‘मराठी योद्ध्याची कहाणी’!

ही गोष्ट फक्त नावाला नसून त्यामागे आपल्या मराठा साम्राज्याचा एक इतिहास आहे. एक असा इतिहास ज्याच्या जोरावर आजही उत्तर प्रदेश मधील या ठिकाणी ‘आपले’ लोक मराठीपण जपतायत.


उत्तर प्रदेश मध्ये मराठी योद्धा? ऐकायला विचित्र वाटतं ना? पण हे अगदी खरं आहे आणि ही गोष्ट फक्त नावाला नसून त्यामागे आपल्या मराठा साम्राज्याचा एक इतिहास आहे. एक असा इतिहास ज्याच्या जोरावर आजही उत्तर प्रदेश मधील या ठिकाणी ‘आपले’ लोक मराठीपण जपतायत. ते ठिकाण म्हणजे उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यामधील बिठूर होय.

Source : twimg.com

ही गोष्ट सुरु होते नानासाहेब पेशव्यांपासून! नाना साहेब म्हणजे दुसरे बाजीराव पेशवे यांचे दत्त्तक घेतलेले अपत्य होय. जन्मावेळी त्यांचे खरे नाव होते धोंडू पंत. दुसरे बाजीराव पेशवे यांना मुलगा नसल्याने त्यांनी १८२७ साली नारायण भट यांच्या दोन मुलांना दत्तक घेतले. त्यापैकी एक म्हणजे धोंडू पंत, ज्यांचे नाव पुढे नाना साहेब पेशवे झाले.

नाना साहेबांचे बालपण हे उत्तम स्थिती मध्ये गेले त्यांना तात्या टोपे, अझिमुल्ला खान आणि मनिकर्निका तांबे यांसारखे खंदे सहकारी लाभले. हा तो काळ होता जेव्हा अखंड भारतावर असलेले पेशवे व मराठा साम्राज्याचे अस्तित्व लयास जात होते आणि परकीय ब्रिटीश आपले हातपाय पसरत होते.

पेशव्यांना नामोहरम करायचे तर पुणे ताब्यात हवे हे ओळखलेल्या ब्रिटीशांनी पुणे जिंकून पेशव्यांची सत्ता संपुष्टात आणली. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांना नाईलाजाने ब्रिटीशांचे मांडलिक व्हावे लागले. त्यांना ब्रिटीशांनी उत्तर प्रदेश मधील बिठूरचे राज्य दिले. पण ही सत्ता सुद्धा केवळ नावापुरती होती. बाजीरावांना हे सहन होईना. अखेर त्यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावून झाशीच्या राणीच्या मदतीने बिठूर स्वतंत्र केले. पण दुर्दैव हे की काही काळानेच त्यांना देवाज्ञा झाली.

नियमाने पुढील सत्ता ही मुलाच्या हातात जाते. पण नानासाहेब हे दत्तक पुत्र होते. त्यामुळे त्यांना गादीवर बसवण्यास ब्रिटीशांचा विरोध होता. कोणत्याही दत्तक पुत्राला राजसत्तेचे लाभ मिळणार नाहीत असा नियम ईस्ट इंडिया कंपनीने काढला होता. अखेर आपल्याला आपला हक्क मिळावा म्हणून नानासाहेबांना ब्रिटीशांशी युद्ध करावे लागले. तात्या टोपे सुद्धा त्यांच्या सोबत होते. दोघांनी अत्यंत शिताफीने ब्रिटीशां विरोधात लढा देणाऱ्या बंडखोरांना हाताशी धरून संपूर्ण कानपूर आपल्या ताब्यात घेतले आणि ब्रिटीशां विरुद्ध युद्ध पुकारले.

अनेक इतिहासकारांच्या मते हीच १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामाची खरी सुरुवात आहे. कारण नाना साहेबांनी अगदी उघड उघड ब्रिटीशांना आवाहन दिले होते. बंडखोरांना सुद्धा आपल्याला एक खंदा नेता मिळाला म्हणून आनंद झाला, पण स्वातंत्र्याचे हे दिवस फार काळ टिकले नाहीत आणि ब्रिटीशांच्या मोठ्या सैन्यापुढे नानासाहेबांना माघार घ्यावी लागली. नाना साहेबांनी कुटुंबाच्या रक्षणासाठी ब्रिटीशांपुढे समर्पण केले आणि अशा प्रकारे पेशवाईचा अंत झाला.

आपला राजा जरी आता नसला तरी तेथे स्थायिक झालेल्या मराठ्यांनी मात्र बिठूरची भूमी सोडण्यास नकार दिला. आजही तेथील लोकांनी नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांच्या स्मृती जपल्या आहेत हे विशेष! आजही येथील कुटुंबे मराठीत एकमेकांशी बोलतात, पेशवाई आणि मराठी साम्राज्यातील कित्येक जुन्या रूढी, परंपरा, सण, समारंभ आजही उत्साहात साजरे केले जातात.

टोपे, मोघे, टाकणीकर, सप्रे, हर्डेकर, आठवले अशा आडनावाची मराठी माणसे बिठूर मध्ये मोठी प्रस्थ आहेत. आपल्या या माणसांचा पेहराव सुद्धा मराठमोळा असून इथे आजही डोक्यावर पारंपारिक पांढरी टोपी घालण्याचा प्रघात आहे. महाराष्ट्राची आणि खास करून पुणे शहराची आठवण या लोकांना आजही येते. कारण त्यांचे पूर्वज इथलेच, पण बिठूरच्या मातीमध्ये त्यांचा जन्म झाला आणि हीच त्यांची कर्मभूमी आहे. त्यामुळे बिठूर पासून कधीच दूर जाणार नाही ही भावना देखील त्यांच्या बोलण्यातून वारंवार दिसून येते.

Source : adotrip.com

त्यांच्या मराठी बोलण्याचा येथील हिंदी भाषिकांना त्रास होतो का? तर त्याचे उत्तर आहे अजिबात नाही. उलट आजही तिथे मराठी टिकली आहे याचे कारणच हे आहे की येथील मूळच्या स्थानिक लोकांनीच ती टिकवण्यास हातभार दिला आणि कधीच भाषेची सक्ती त्यांच्यावर केली नाही. उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सुद्धा जेव्हा कधी बिठूर दौऱ्यावर असतात तेव्हा आवर्जून नाना साहेब पेशवे आणि तात्या टोपे यांच्या स्मारकाचे दर्शन घेतात व त्यांच्या शौर्याला शब्दांतून मानवंदना सुद्धा देतात.

तर असे हे उत्तर प्रदेशातील आगळेवेगळे ‘आपले बिठूर’ कधी कानपूर मध्ये जाण्याचा योग आला तर उत्तर प्रदेशातील ह्या ‘मिनी महाराष्ट्र’ प्रदेशाला नक्की भेट द्या!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

D Vishal