अख्तरच्या बॉलिंगला घाबरणाऱ्या पार्थिव पटेलला गांगुलीने फसवले पण पोरगा नडला आणि जिंकला!

संघासमोर आव्हान होते की, पाकिस्तानच्या भयंकर गोलंदाजी समोर वीरेंद्र सेहवागसोबत कोण पहिली सलामी देणार? आकाश चोप्राच्या जागी कोणाला पाठवायचे?


तब्बल १८ वर्षांनंतर २००४ मध्ये भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. भारत पाकिस्तान मॅच ही भारतीयांसाठी वर्ल्डकपपेक्षा ही जास्त महत्वाची आणि रंजक असते. भारताने त्यावेळी पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका ३-२ ने जिंकली होती. त्यानंतर तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरी आणि निर्णायक कसोटी रावळपिंडीत होती. मालिका १-१ अशी बरोबरीत होती. सौरव गांगुली मागील दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळला नव्हता. तो कर्णधार असेल तर संघात परतल्यावर कोणीतरी बाहेर बसावे लागले असते त्यामुळे आकाश चोप्राला बाहेर ठेऊन गांगुली संघात परतला.

Source: mensxp.com

आता संघासमोर आव्हान होते की, पाकिस्तानच्या भयंकर गोलंदाजी समोर वीरेंद्र सेहवागसोबत कोण पहिली सलामी देणार? आकाश चोप्राच्या जागी कोणाला पाठवायचे? अशा स्थितीत कर्णधार सौरव गांगुलीने निष्पाप चेहरा असलेल्या पार्थिव पटेलकडे बोट दाखवले.

पार्थिव तेव्हा १८ वर्षांचा होता आणि अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे पार्थिव घाबरला. या परिस्थितीमध्ये काय बोलायचे हेच त्याला समजेनासे झाले. त्याला पहिली बॅटिंग करणे खूपच भीतीदायक वाटू लागले. त्यात अख्तरचे चेंडू अगदी भरधाव वेगाने येतात हे त्याला माहित होते. वरून, मोहम्मद सामी आणि फजल-ए-अकबर देखील १४० पेक्षा कमी वेगाने चेंडू टाकत नाहीत. संघातील इतर खेळाडूंनी देखील पार्थिवला समजावायचा खूप प्रयत्न केला.

सर्वांच्या अथक प्रयत्नानंतर पार्थिव पहिली बॅटिंग करायला उतरण्यास तयार झाला परंतु त्याने एक अट घातली. ती अट अशी होती की, भारताची बॅटिंग पहिली आली तरच तो सलामी बॅटिंग करेल आणि भारताची बॉलिंग पहिली आली तर तो विकेट किपिंग केल्यावर ओपनिंग करणार नाही. सौरव गांगुलीने क्षणाचाही विचार न करता ही अट ताबडतोब मान्य केली.

दुसऱ्या दिवशी सकाळी रावळपिंडीत नाणेफेक झाली. हिरव्या विकेटमुळे भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय ऐकून पार्थिव अतिशय खुश झाला. कारण, आता त्याला पाकिस्तानच्या गोलंदाजांचा सामना करावा लागणार नव्हता. जणू त्याला सुंठीवाचून खोकला गेल्याचा आविर्भावच झाला असावा. पहिल्याच दिवशी चहापानापर्यंत पाकिस्तानचा संघ ऑल आउट झाला होता. एकट्या लक्ष्मीपती बालाजीनेच चार विकेट घेतल्या.

Source: dnaindia.com

संघ पॅव्हेलियनच्या दिशेने जात होता. पार्थिव मजेत पुढे चालला होता. मागून सौरव गांगुलीने पार्थिवला आवाज देऊन सामन्याची ओपनिंग करायला सांगितले. प्रथम क्षेत्ररक्षण केले तर सलामी करावी लागणार नाही, हे केलेले वचन गांगुलीने पाळले नाही म्हणून पार्थिव आश्चर्यात होता. पण कर्णधाराचे बोलणे तो टाळू शकत नव्हता.

सर्व टीम ड्रेसिंग रूममध्ये पोहोचली. पार्थिवला समोर सेहवाग ड्रेसिंग रूममध्ये पॅड बांधताना दिसला. सेहवागला पाहून पार्थिवच्या डोक्यात एक कल्पना आली. त्याने सेहवागकडून मदत मागायचे ठरवले. त्याने सेहवागला ओपनिंग स्ट्राईकवर राहण्यासाठी विनंती केली. पार्थिवला शोएबचा सामना करायचा नव्हता आणि सेहवाग स्ट्राईकवर असेल तर त्याला बघून पार्थिवला थोडा धीर येईल असे वाटत होते. त्यावेळी सेहवाग जबरदस्त फॉर्ममध्ये होता. मुलतानमधील पहिल्या कसोटीत त्याने ३०९ धावा आणि दुसऱ्या कसोटीत ९० धावा केल्या होत्या. पण सेहवागचा रेकॉर्ड असा होता की तो स्ट्राइक कधीच घेत नव्हता. याचा अर्थ तो सामन्याच्या पहिल्या चेंडूला कधीच सामोरे जात नव्हता. तो नेहमी नॉन-स्ट्राइकिंग एंडवर उभा राहत असे. कारण जेव्हा-जेव्हा सेहवागने स्ट्राइक घेतली तेव्हा-तेव्हा तो शून्यावर आऊट झाला होता.

पण कदाचित पार्थिव पटेलचा निरागस चेहरा पाहून सेहवागला दया आली असावी आणि त्यामुळेच सेहवागचा स्ट्राईकवर गेल्यावर शून्यावर आउट होण्याचा खराब रेकॉर्ड असूनही सेहवाग स्ट्राईकवर जायला तयार झाला. त्यानंतर पहिल्यांदाच रावळपिंडीत सेहवाग आणि पार्थिव पटेल ही जोडी सलामीला आली. चेंडू रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तरच्या हातात होता आणि समोर वीरेंद्र सेहवाग होता. नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा असलेला पार्थिव सेहवागने पहिल्याच चेंडूवर बाद होऊ नये, अन्यथा माझी कारकीर्द संपुष्टात येईल, अशी प्रार्थना करत होता. पण त्याची प्रार्थना मान्य झाली नाही.

आणि सेहवाग पहिल्याच चेंडूवर बाद झाला!

आता पार्थिव पटेलसमोर जगू की मरू अशी परिस्थिती निर्माण होती. त्यामुळे त्याला शोएब अख्तरला सामोरे जावे लागणार होते. सोबत राहुल द्रविड होता. पण म्हणतात ना अंगावर आलं कि माणूस बरोबर सगळं करतो, त्याप्रमाणे द्रविडने दिलेला धीर सोबत घेत पार्थिवने आपली खेळी खेळली. दोघांमध्ये १२९ धावांची भागीदारी झाली. त्या सामन्यात ६९ धावा करून पार्थिव बाद झाला. आज हा क्रिकेटर ही खेळी त्याच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय सलामीची खेळी मानतो. नंतर राहुल द्रविडने २७० धावांची खेळी खेळली आणि भारताने तो सामना एक डाव आणि १३१ धावांनी जिंकला.

भारत-पाकिस्तान क्रिकेटचे सगळेच सामने नेहमीच खूप मनोरंजक आणि आक्रमक असतात. परंतु, हा सामना पार्थिवच्या आणि भारतीयांच्या मनातून कधीच पुसला जाणार नाही!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

Gayatri Gurav