मोदींच्या गुजरात मध्ये आफ्रिकन लोकांचं आहे अख्खं गाव, कुठून आलेत हे लोक?

हे लोकं काटेकोरपणे आपापसातच विवाह करतात आणि त्यामुळेच त्यांचे जिन्स स्थानिक लोकांमध्ये कधीच मिसळले नाहीत.


आपला भारत देश विविधतेसाठी ओळखला जातो. या देशात अनेक जातीचे व धर्मांचे लोक राहतात आणि ते वेगवेगळ्या बोली, पेहराव आणि चालीरीती पाळतात. त्यांच्या वेगवेगळ्या भाषा, धर्म, खाद्यपदार्थ, संगीत, वास्तुकला आणि चालीरीती वेगवेगळ्या आहेत. आपण हिंदू धर्माचेच उदाहरण घेतले तर त्यात खूप भिन्नता आहे. हिंदूंशिवाय मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, ज्यू, पारशी आणि बहाई धर्माचे लोकही भारतात आहेत. अशा परिस्थितीत, विविधता केवळ इथल्यापुरतीच मर्यादित राहिली नसून, इतर अनेक देशांतील लोकही आता भारतात स्थायिक झाले आहेत.

असेच काही परदेशी लोक आफ्रिकेतूनही आहेत. आतापर्यंत ते जवळजवळ प्रत्येक शहरात आढळतात परंतु, असे लोक खूप कमी आहेत जे भारतात स्थायिक असून भारतालाच आपले घर मानतात. त्यापैकीच एक गुजरातची ‘सिद्धी’ जमात आहे.

आफ्रिकन वंशाचे हे लोक २०० वर्षांपासून भारतात राहत आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याबद्दल.

सिद्धी आफ्रिकन-गुजराती लोक कोण आहेत आणि ते कोठून आले आहेत?

सिद्धी हे पूर्व आफ्रिकन गुलाम आणि खलाशी यांचे वंशज आहेत. हे अरब मुस्लिम व्यापाऱ्यांनी शतकानुशतके भारतीय राजघराण्यांना आणि पोर्तुगीजांना पुरवले होते. मुख्यतः दक्षिण पूर्व आफ्रिकेतील बंटू येथील हबश येथून आले होते आणि म्हणून त्यांना हबशी म्हणूनही ओळखले जाते. ते आफ्रो-अरबांचे वंशज आहेत. म्हणजे भारतात काम करणार्‍या आफ्रिकन आणि अरब मजुरांचे ते वंशज आहेत. त्यानंतर हे लोक येथे स्थायिक झाले आहेत. तेव्हापासून सिद्धी लोक गुजरात आणि लगतच्या भागात वास्तव्यास आहे. संपूर्ण भारतामध्ये सुमारे २५,००० आफ्रिकन सिद्धी आहेत. इस्लाम हा प्रचलित धर्म असल्याने त्यांच्यापैकी काहीजण इस्लामचे पालन करतात आणि काही ख्रिश्चन देखील आहेत. तसेच काही लोक हिंदू धर्माचेही पालन करतात.

एका लोककथेनुसार जुनागढचा नवाब आफ्रिकेत गेला होता तेव्हा तो एका आफ्रिकन स्त्रीच्या प्रेमात पडला. ती भारतात आली तेव्हा तिने अनेक गुलामांनाही सोबत आणले होते. तेच लोक गुजरातमध्ये स्थायिक होऊन आफ्रिकन सिद्धी झाले. तथापि, हे लोक येथे कधी आले आणि ते भारतात कधीपासून राहतात हे कोणालाच माहीत नाही. भारतातील त्यांचे अस्तित्व २०० वर्षांहून अधिक जुने आहे असे मानले जाते.

गुजरातमध्ये अनेक पर्यटन स्थळे असली, तरी गुजरातमधील तलाला तालुक्यातील जांबूर हे गाव खूप प्रसिद्ध आहे. कारण तेथे बहुतांश गुजराती भाषिक आफ्रिकन लोक राहतात. अनेक लोक इथे येतात आणि त्यांच्यासोबत फोटो काढतात. राष्ट्रीय पातळीवर हे एक अद्वितीय पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.

सिद्धी लोकांचे अन्न आणि मनोरंजन

हे लोक गुजराती बोलतात आणि गुजराती जेवण देखील येथे तयार केले जाते, परंतु जेव्हा मनोरंजन आणि नाच-गाण्याची गोष्ट येते तेव्हा ते आफ्रिकन नृत्यच करतात. ते गोमा संगीत आणि नृत्य प्रकाराचा सराव करतात. स्थानिक गुजराती भाषेत त्याला ‘धमाल’ असे म्हणतात. येथील नृत्य, गाणी आणि मनोरंजनाची खूप चर्चा आहे.

सिद्धी लोकांचा अद्वितीय वारसा

सिद्धी लोकं काटेकोरपणे आपापसातच विवाह करतात आणि त्यामुळेच त्यांचे जिन्स स्थानिक लोकांमध्ये कधीच मिसळले नाहीत. त्यामुळे गुजरातमधील सिद्धी लोकांचे दिसणे आफ्रिकन लोकांसारखेच आहे. त्यांनी त्यांच्या काही बंटू परंपरा अजूनही जपल्या आहेत.

गुजरातला फिरायला गेलात तर या गावाला एकदा नक्की भेट द्या. यामुळे तुम्हाला काहीतरी वेगळे पाहण्याची उत्तम संधी मिळेल.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

Gayatri Gurav