एका रात्रीत धावता धावता वायरल होणाऱ्या मुलाची ‘ही’ आहे सत्य कहाणी!

प्रदीप रोज रात्री ऑफिस संपल्यावर ऑफिस ते घर असं १० किलोमीटरचं अंतर धावत पार करतो. सैन्यात प्रवेश मिळवण्यासाठी प्रदीप हे करत असल्याचे त्याने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.


प्रदीप मेहरा असं या १९ वर्षांच्या पठ्ठ्याचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी प्रदीपचा धावत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला गेला. चित्रपट निर्माते विनोद कापरी यांनी हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला होता. व्हिडिओ शेअर करताच अनेक जणांनी या मुलावर कौतुकाचा वर्षाव केला. अनेक आर्मी ऑफिसर्सनी देखील या मुलाचं कौतुक करत त्याला पाठिंबा दर्शवला आहे. पण आर्मी ऑफिसर्सनी या मुलाचं कौतुक का केलं असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर त्याला कारणही तसंच आहे.

तर जाणून घेऊया विनोद कापरी यांनी हा व्हिडिओ का शेअर केला ते… नोएडाचा रहिवासी असलेला प्रदीप मेहरा हा सेक्टर १६ मध्ये काम करतो. प्रदीपला सैन्यात भरती होण्याची इच्छा आहे. आणि याचसाठी प्रदीप रोज रात्री ऑफिस संपल्यावर ऑफिस ते घर असं १० किलोमीटरचं अंतर धावत पार करतो. सैन्यात प्रवेश मिळवण्यासाठी प्रदीप हे करत असल्याचे त्याने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. प्रदीप खांद्यावर बॅग घेऊन धावत असताना विनोद कापरी यांनी त्याला काळजीपोटी मदतीसाठी विचारले. कदाचित त्याला लवकरात लवकर कुठेतरी पोहोचायचं असेल या हेतूने त्यांनी प्रदीपला विचारले. मात्र कारण काही भलतंच होतं. प्रदीपला सैन्यात भरती होण्याची इच्छा असल्याने फिट राहण्यासाठी तो रोज १० किलोमीटर धावतो असे त्याने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

काहीच दिवसांपूर्वी हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात प्रदीपने सैन्यात भरती होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. विनोद कापरी यांच्याशी संभाषणात त्याने अनेक गोष्टी सांगितल्या.

प्रदीपची आई काही कारणास्तव रूग्णालयात दाखल आहे. तेव्हा त्याला सकाळी ऑफिस आणि घरचे जेवण बनवावे लागते. नोएडामध्ये प्रदीप त्याच्या मोठ्या भावासोबत राहतो. त्याचा भाऊसुद्धा नाईट शिफ्ट करतो.

आजच्या सोशल मीडिया सॅव्ही असणाऱ्या तरूणाईच्या जगात विनोद कापरी यांनी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यावर तो व्हायरल होईल असे त्याला सांगितले. त्यावर प्रदीपला फार काही फरक पडला नाही. व्हिडिओ व्हायरल होऊनही त्याची कोण दखल घेईल आणि तसंही मी काही चुकीचं तर करत नाहीये असे उत्तर प्रदीपने दिले.

व्हिडिओ व्हायरल झाल्यावर प्रदीपला अनेक आर्मी ऑफिसर्सनी पाठिंबा देत मदतीचे आवाहन केले.

रिटायर लेफ्टनंट जनरल सतिश दुआ यांनी रिट्विट करत म्हटले, “त्याच्या हिंमतीला दाद दिली पाहिजे आणि भरतीप्रक्रियेत त्याच्या मेरिटवर पास होण्याकरता मदत करण्यासाठी मी कुमाओ रेजिमेंटशी बोललो आहे.”

लेफ्टनंट जनरल राणा कलिता, इस्टर्न आर्मी ऑफिसर यांनी म्हटले, “आमच्या रेजिमेंटमध्ये या मुलाची भरती व्हावी याकरता त्याला ट्रेनिंग मिळण्यासाठी योग्य ती मदत मी करेन.”

रिटायर मेजर डी पी सिंग यांनीदेखील ट्विट करत या मुलाची सर्वजण दखल घेत आहेत हे पाहून आनंद झाला, मी सर्वांना हेच सांगेन की या तरूणाप्रमाणेच सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक तरूणाला असाच पाठिंबा मिळावा असे म्हटले.

विनोद कापरी यांनी हा व्हिडिओ रविवारी ट्विटरवर शेअर केला होता. रविवारी संध्याकाळपर्यंत या व्हिडिओला ७५ हजार रिट्विट्स, ११ हजार कोट्स ट्विट्स आणि जवळपास २.५० लाख लाईक्स होते.

व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अनेक जणांनी तसेच काही सेलिब्रिटींनी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच या व्हिडिओमुळे या तरूणाला धावण्यासाठी शूज, कपडे अशी मदतही एका स्पोर्टस ब्रॅंडने केली आहे. एवढंच नाही तर प्रदीपचा हा व्हिडिओ दिल्लीतील काही शाळांमध्ये प्रेरणात्मक असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना दाखवला जात आहे. खरं तर अशाच तरूणांचा आदर्श भावी पिढीसमोर ठेवला गेला पाहिजे हेच प्रदीपच्या जिद्दीवरून लक्षात येते. विविध क्षेत्रातील लोकांकडून प्रदीपला मदत तसेच पाठिंबा मिळत आहे.

विनोद कापरी यांनी या मुलाची दखल घेत हा व्हिडिओ शेअर केला. तसेच हा मुलगा सैन्यात भरती होण्यासाठी कसे प्रयत्न करत आहे हे शेअर केल्यावर अनेक सैन्य अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली तसेच त्याला मदत आणि पाठिंबा दर्शवला यामुळे नक्कीच त्याला प्रगती करण्यासाठी प्रेरणा मिळेल यात शंका नाही.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *