मुंबईजवळ निर्जनस्थळी वसलेले शंकराचे ‘हे’ जागृत देवस्थान आहे खूपच अद्भुत!

मंदिराबाहेर एक छोटेसे तळे असून त्यात कमळाची फुले उमलेली पहावयास मिळाली. मंदिराच्या मागे मोठी खाडी तसेच कांदळवन आहे.


मुंबई ते कल्याण आणि कल्याण ते मुंबई रेल्वेने प्रवास करत असताना दिवा स्थानक सोडल्यानंतर दिवा आणि कोपर स्थानकादराम्यान खाडीजवळ एक सुंदर असे मंदिर आपल्या सर्वांचे लक्ष वेधून घेते. हे मंदिर म्हणजे म्हातार्डेश्वर शिव मंदिर होय. सदर मंदिराची स्थापना १९८२ साली झाली असून आतील शाळुंका हि स्वयंभू असल्याचे सांगण्यात येते.

मंदिराचा परिसर अतिशय नयनरम्य आणि शांततापूर्ण आहे. गर्भगृहाबाहेर नंदी, कासव तसेच होमकुंड आहे. नंदी आणि कासवाचे दर्शन घेऊन पुढे जाताच डाव्या आणि उजव्या बाजूस दोन मोठ्या शिळा आहेत. एक शिळा मूळ स्वरुपात असून दुसऱ्या शिळेस शेंदूर लावलेला आहे.

म्हातार्डेश्वर मंदिरातून शिवशंकराचे दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर मागील बाजूस थोड्या पायऱ्या चढून वर गेल्यावर मारुतीरायाचे मंदिर आहे. त्यावर खापरेश्वर प्रसन्न व हनुमान मंदिर असे कोरलेले आहे. म्हातार्डेश्वर मुख्य मंदिराबाहेर दोन मोठाले सभामंडप आहेत. येथे वैदिक पद्धतीने लग्न तसेच श्राद्धाचे विधी केले जातात. त्याविषयीच्या दराची पाटी तसेच मंदिर विश्वस्त अन् कार्यकारी मंडळींचे नामफलक दुमजली खोलीच्या प्रवेशद्वारापाशी लावलेले आहे. मंदिराचे अध्यक्ष वा माहिती देणारे कुणी तेथे उपस्थित नसल्याने मंदिराविषयी तसेच तिथल्या व्यवस्थापन अन् नित्यनेमाने चालणाऱ्या विधिंविषयी फारशी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

मंदिर कुणी बांधले याविषयी काही माहिती उपलब्ध नाही, परंतु मंदिराबाहेर लावलेल्या कोनशिलेवर मंदिराच्या स्थापनेचे वर्ष तसेच १९८५ साली आणि २००७ साली मंदिराच्या जीर्णोद्धारास जवळपासच्या गावातील दानशूर व्यक्तिंनी हातभार लावल्याचे नावासहित नमूद केले आहे.

मंदिराबाहेर एक छोटेसे तळे असून त्यात कमळाची फुले उमलेली पहावयास मिळाली. मंदिराच्या मागे मोठी खाडी तसेच कांदळवन आहे. शिव मंदिर हे रेल्वेमार्गास लागून असल्याने रेल्वेच्या आवाज सोडला तर येथे बरीच शांतता आहे. प्रसन्न करणारा असा हा परिसर मन मोहून घेतो.म्हातार्डेश्वर मंदिर हे म्हातार्डी गावाच्या पश्चिमेस आहे. पूर्वेस म्हातार्डी गाव मध्ये रेल्वेमार्ग आणि पश्चिमेस खाडीलगत शिव मंदिर आहे. मंदिराकडे जाण्यासाठी दिवा स्थानकात उतरुन पूर्वेकडून शेअर रिक्षाने दातिवलीला यायचं. दातिवली हे कोकण रेल्वेमर्गावरील एक स्थानक आहे.

दातिवली स्थानकाहून रस्त्याने चालत पुढे आले कि अवघ्या काही मिनटांवर म्हातार्डी गाव लागते अन् म्हातार्डी गावातून जरासे पुढे आले कि रेल्वेमार्ग लागतो तो ओलांडून पुढे आल्यास समोरच मंदिराचा उल्लेख असलेली लोखंडी कमान दिसते. मंदिराकडे येणारा दुसरा मार्ग म्हणजे थेट रेल्वे मार्गावरुन चालत यायचं. सतत गाड्यांची ये जा सुरु असल्याने हा थोडा जिकीराचा असा मार्ग आहे.

या मंदिरात यायचे झाल्यास पावसाळा हा उत्तम ऋतू. मंदिरामागून वहाणारे खाडीचे पाणी, सभोवतालची हिरवळ आणि मंदिर परिसरातले शांत वातावरण आपल्याला सुखावल्याखेरीज रहाणार नाही.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *