रिल्सचा बाजार आणि आजार….येणारी पिढी संकटात आहे का?

कोवळ्या वयात आमची मुलं कशाप्रकारे मोबाईलवर युट्युब वगैरे हाताळतात याच्या फुशारक्या मारण्यात धन्यता मानणारे पाहिले कि खरंच हसू येतं.


कार्यालयीन कामानिमित्त फोर्टला जात असताना ट्रेनमध्ये माझ्या समोरच्या सीटवर मुलुंडच्या एका महाविद्यालयातील अकरावीची मुलं बसलेली होती. त्यात तीन मुले आणि एक मुलगी होती. लहान मोठं शेजारी कुणी बसलेलं आहे याची अजिबात तमा न बाळगता ते सारे आपल्याच मस्तीत एकमेकांची टर उडवत, एकमेकांना शिव्या हासडत होते. आता त्यांनी शिव्या द्याव्यात अथवा देऊ नये हा विषय इथे नाही. मूळ विषयाला सुरुवात झाली ती त्यांच्यातल्या संवादातून. त्यांचे आपआपसातील संवाद ऐकत असताना असं लक्षात आलं कि, काळानुरुप यांचे आदर्श बदललेत. त्यांच्या तोंडून ऐकलेल्या एका रिल बनवणाऱ्या मुलाचा व्हिडीओ मी मुद्दामहून माझ्या फेसबूक वाॕलवर शेअर केला होता. पूर्वी टिकटाॕकवर आणि त्यावर सरकारने बंदी आणल्यानंतर आता इंस्टाग्रामवर रिल बनवून भरघोस लाईक्स, सबस्क्राईब्स आणि फॕन फौलोईंग मिळवणारी मंडळी यांचे आदर्श बनू लागलेत. चांगले.

पूर्वीच्या म्हणजे आमच्या आधीच्या आणि त्यानंतरच्या आमच्या पिढीचे आदर्श म्हणजे स्वातंत्र्यसैनिक, क्रांतीवीर, महापुरुष, क्रिकेटर्स, साहित्यिक, संशोधक , वैज्ञानिक, सामाजिक, शैक्षणिक वगैरे क्षेत्रात उत्तुंग कर्तृत्व गाजवणारी मंडळी असायची. काळानुरुप पिढीचे आदर्श बदलू लागले आहेत हेच खरे. मुळात हा बदल खटकण्याचे कारण चुकिचे आदर्श हाच आहे.

९ मार्च २०२२ रोजीचा हा प्रसंग आणि त्याच संध्याकाळी एका वृत्तवाहिनीवर मनसेप्रमुख श्री. राज ठाकरे यांच्या पुण्यातील १६ व्या वर्धापन दिनानिमित्तच्या लाईव्ह सभेत त्यांनी नेमक्या याच मुद्द्याला घातलेला हात. या दोन्ही प्रसंगांनी माझ्या डोक्यातले विचारचक्र पुन्हा गरगर फिरु लागले.

मागील महिन्यातला दहावी – बारावीच्या परिक्षा आॕफलाईन न घेता आॕनलाईन घ्याव्यात यासाठी कुणा एका हिंदुस्थानी भाऊ नामक व्यक्तीच्या आवाहनावरुन धारावीत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर आंदोलसाठी जमलेला (खरंतर स्वतःच्या वैयक्तिक /राजकीय फायद्यासाठी हिंदुस्थानी भाऊने जमवून आणलेला) जमाव , त्यानंतर त्याला झालेली अटक. शिवराळ भाषेत रिल बनवणाऱ्या थेरगाव क्वीनचे वायरल झालेले विडिओ अन् त्यानंतर तिला झालेली अटक हे सारे प्रकार पाहिल्यावर असं लक्षात येतं कि, मोबाईल आणि सोशल मिडीयाचा अतिरेकी वापराने आताची हि पिढी खरंच चुकिच्या दिशेने चालली आहे.

आपण कुणाच्या मागे धावतोय आणि का हेच कळत नाही आहे यांना बहुतेक. आॕफलाईन परिक्षा देण्याला विरोध करण्याचं कारण मुळात कोरोना /कोविडची भिती वगैरे नसून या काळात वाचन, पाठांतर, नियमित अभ्यास अन् लिखाणाची सुटलेली सवय हे आहे. या गोष्टीला कारणीभूत खरंतर आपणच आहोत. लहान मुलं जेवत नाहीत म्हणून त्यांच्या हाती मोबाईल देऊन युट्युबवर एखादा गेम, एखादं कार्टून लावून दिलं कि आपली या कठीण कामातून सुटका झाली या अविर्भावात वावरणारे आपण लहान मुलांना कोवळ्या – नकळत्या वयातच मोबाईलची सवय लावत आहोत.

हे कमीच कि काय म्हणून त्याहीपुढे जाऊन कोवळ्या वयात आमची मुलं कशाप्रकारे मोबाईलवर युट्युब वगैरे हाताळतात याच्या फुशारक्या मारण्यात धन्यता मानणारे पाहिले कि खरंच हसू येतं कारण याच कोवळ्या वयात लावलेल्या सवयींचा पुढे अतिरेकी वापर वाढला कि त्याचे व्यसनात रुपांतरीत होणार यात तीळमात्रही शंका नाही. सबस्क्राईबर्स , फौलोअर्स वाढले कि युट्यूब वगैरे सारख्या माध्यमांतून पगार सुरु होतो या साध्या सोप्या मार्गाने मिळणाऱ्या पैशाच्या हव्यासपाई आपण आपल्याच मुलांचं चावी देताच नाचू बोलू लागणारं खेळणं बनवत चाललो आहोत हे मात्र तितकच खरं. अशाने कष्टाची किंमत त्यांना काय कळणार?

Source : weforum.org

खरंतर सोशल मिडीया हे एक आभासी जग आहे. यातून मिळणारे लाईक्स, कमेंट्स, हजारोंची फ्रेंडलिस्ट हे सारं प्रत्यक्ष आयुष्यात खरंच वेळप्रसंगी कामाला येणार आहे का ओ हा प्रश्न स्वतः आपणच स्वतःला विचारण्याची गरज आहे. माझ्यामते तरी सोशल मिडीया हे एक व्यासपीठ आहे ज्याचा वापर आपण जोपासत असलेले छंद, आपल्या अंगी असलेली कला लोकांसमोर आणण्याचे माध्यम आहे. यातून बऱ्याच चांगल्या गोष्टी ठरवून साध्य करता येऊ शकतात पण ते करण्याऐवजी थुकरट रिल बनवून कमी वयात लाईक्स, सबस्क्राईब्स, फौलोअर्स आणि पैशाच्या पाठी धावणारी हि लोकं पाहिली कि कुठेतरी काहीतरी नक्कीच चुकतय हे लक्षात येतं.

काहीतरी चांगला , समाजप्रबोधनपर संदेश देणारे रिल्स किंवा ज्यातून खरच काहीतरी तुमच्यात दडलेली अंतर्गत खुबी किंवा कला असेल तर त्या रिल्सच्या माध्यमातून जरुर लोकांसमोर यायला हव्या पण केवळ लोकांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी बनवलेले थुकरट रिल्स आणि त्याचा भडिमार हा थांबायलाच हवा. तरुण पिढीच्या मानगुटीवर बसलेलं हे रिल्सरुपी भूत उतरवायलाच हवे.

सोशल मिडीयावरच्या या रिल्सच्या भडिमाराला बाजार म्हणावं कि आजार ? याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी मी माझ्या एका मित्राच्या पत्नीला फोन केला. गेल्या काही महिन्यांपासून एका दैनिकात त्यांचे मानसोपचारासंबधीचे लेख वरचेवर येत असतात. त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी या आजाराला त्यांच्या भाषेत मोबाईल फोबिया, इंटरनेट एडिक्शन , इंटरनेट डिसआॕर्डर वगैरे नावानी ओळखले जात असल्याचे सांगितले. सुरुवातीला गंमत म्हणून वाटणाऱ्या या गोष्टी पुढे जाऊन भीषण रुप कसे धारण करतात हे त्यांनी त्यांच्याकडे आलेल्या एका केसचे उदाहरण देऊन सांगितलं.

हटके रिल्स बनवण्याच्या नादात शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलींनी हातात सिगारेट घेऊन बनवलेला रिल पुढे वायरल झाल्यानंतर कसा त्यांच्याच अंगलट आला हा अनुभव त्यांनी मला सांगितला. लाईक्स , सबस्क्राईबर्स, फौलौअर्स वाढवण्यासाठी , हटके रिल्स बनवण्यासाठी शिवराळ भाषा वापरणे, रिल्समधून धमकिवजा संदेश देणे अशाप्रकारची लागलेली चढाओढ आणि मग त्यातून येणारे डिप्रेशन, मोबाईल स्क्रीनिंगची वाढती वेळ अन् त्यायोगे डोळ्यांचे वाढते आजार, सतत नोटिफिकेशन चेक करत रहाणे, मोबाईलची रिंग वाजली नाही तरी वाजल्याचे भास होणे हि याच इंटरनेट डिसआॕर्डर, मोबाईलफोबियाची लक्षणे.

Source : ytimg.com

लहानपणी शाळेत असताना आम्हांला एक निबंध होता विज्ञान शाप कि वरदान त्याचप्रमाणे आता मोबाईल -सोशल मिडीया शाप कि वरदान यावर लिहीण्याची, चर्चा करण्याची वेळ आली आहे असं मला वाटतं. एखाद्या तंत्रज्ञानाचा योग्य विधायक वापर हा जसा वरदान ठरतो तसाच आतिरेकी, चुकिचा वापर हा कालांतराने शापच ठरतो. दहावीनंतर आर्या पाल्याने कुठल्या शाखेत एडमिशन घ्यावं हे जसं पालकच ठरवत असतात ना मग त्याचप्रमाणे आपल्या पाल्याच्या हाती काय द्यावं काय नाही, त्यांनी काय पहावं काय नाही , त्यांनी काय वाचावं काय नाही , त्यांनी काय करावं काय नाही , मोबाईलचा वापर त्यांनी कसा , किती प्रमाणात आणि कशासाठी करावा याची चर्चा आपण आपल्या पाल्यासोबत करायला हवी तर आणि तरच रिल्सचा हा बाजाररुपी आजार उठेल.

हिंदुस्थानी भाऊ , थेरगाव क्वीन हि प्रकरणं म्हणजे पुढील काळात येणाऱ्या एखाद्या त्सुनामीची पूर्वसूचना आहेत जी आपण वेळीच ओळखायला हवी अन्यथा आपल्यासारखे कर्मदरिद्री आपणच असू हे मात्र नक्की. हे असे होऊ नये यासाठी चांगले वाचनीय साहित्य उपलब्ध करुन आपल्या पाल्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, त्यांना वेगवेगळ्या भाषा, लिपी शिकण्यासाठी प्रवृत्त करणे, त्यांच्यातील सुप्त कलागुण ओळखून त्यास वाव देणे, एखादा छंद जोपासून तो वृद्धींगत करण्यासाठी प्रोत्साहन देणे, वेळोवेळी त्यांच्याशी संवाद साधणे, चांगल्या गोष्टींची गोडी, आवड त्यांच्यात निर्माण करणे हे गरजेचे आहे.

रिल्सच्या दुनियेतून आपल्या पाल्यांना बाहेर काढून रिअल लाईफची ओळख करुन देणे हि पालकांची जबाबदारी आहे.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *