शंकराने गणपती बाप्पाला हत्तीचे तोंडच का लावले, माणसाचे का नाही?

रावण हा भगवान शंकरांचा सर्वात श्रेष्ठ भक्त म्हणून ओळखला जातो. भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासही तो कित्येक वर्षे तप आणि भक्ती करत होता.


आल्या देशात सर्वात जास्त भक्त कोणत्या देवाचे असतील तर देवांचे देव महादेव यांचे! भगवान शंकरांविषयी एक आगळी वेगळी ओढच पत्येक आस्तिक हिंदुच्या मनात असते. आता तर केवळ हिंदूच नाही तर परदेशातील सुद्धा विविध धर्मांचे असंख्य लोक भगवान शंकरांच्या महतीमुळे, अध्यात्माशी असलेल्या त्यांच्या संबंधांमुळे त्यांचे भक्तगण होत आहेत.

भगवान शंकरांविषयी तशा अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची दंतकथा म्हणजे गणपती बाप्पाची! देवी पार्वतीने मळापासून एक बालक बनवला आणि त्याला जिवंत रूप दिले. आपली आई स्नानासाठी आतमध्ये गेली म्हणून दरवाज्यावर पहारा ठेवून असणाऱ्या या बालकाची गाठ भगवान शंकरांशी झाली.

Source : quoracdn.net

एक बालक आपल्याला अडवतो हे पाहून क्रोधीत झालेल्या भगवान शंकरांनी त्यांचे मुंडकेच धडापासून वेगळे केले. देवी पार्वतीला ही गोष्ट कळताच तिचे अश्रू अनावर झाले. आपल्या लाडक्या पत्नीचे हे दु:ख भगवान शंकरांना पाहवले नाही आणि जो कोणी पहिला प्राणी दिसेल त्याचे मुंडके त्यांनी आपल्या गणांना घेऊन येण्यास सांगितले.

गणांना हत्तीचे मुंडके मिळाले. ते आणून देताच भगवान शंकरांनी ते मुंडके त्या मृत बालकाच्या धडावर बसवले आणि त्याला पुन्हा जीवदान दिले. अशा पद्धतीने जन्म झाला गणपती बाप्पाचा!

आता ही स्टोरी तर आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पण याच स्टोरीचा विरोधाभास असणारी एक स्टोरी सुद्धा सांगितली जाते. तर झाले असे की रावण हा भगवान शंकरांचा सर्वात श्रेष्ठ भक्त म्हणून ओळखला जातो. भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासही तो कित्येक वर्षे तप आणि भक्ती करत होता. या दरम्यान तो स्वत:चे मुंडके कापून भगवान शंकरांना अर्पण करत असे. पण जेव्हा जेव्हा तो मुंडके अर्पण करे तेव्हा तेव्हा त्या जागी नवीन मुंडके उत्पन्न होई. अशा प्रकारे दहा वेळा झाल्यावर अखेर भगवान शंकर प्रसन्न झाले होते.

तर इथे प्रश्न हा उद्भवतो की भगवान शंकर जर रावणाला दहा मुंडके पुन्हा देऊन जिवंत करू शकतात तर हीच गोष्ट त्यांनी गणेशाच्या बाबतीत का केली नाही? अनेकांना पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर आज तुम्हाला मिळणार आहे!

Source : quoracdn.net

अनेक जाणकारांकडून माहिती घेतल्यावर अनेक रंजक उत्तरे यातून मिळाली. काहींच्या मते भगवान शंकरांनी आपल्या अस्त्राने अर्थात त्रिशूळाने गणेशाचे मुंडके उडवले होते. त्रिशूळ इतके शक्तिशाली आहे की त्याच्या स्पर्शाने त्या मुंडक्याची राख झाली. शंकर जरी देव असले तरी ते काळ मागे फिरवू शकत नव्हते. त्यामुळे जे घडले ते पूर्ववत होण्यासारखे नव्हते. त्यामुळे गणपती बाप्पाला हत्तीचे शीर मिळाले. तर दुसरीकडे रावणाचे मुंडके भगवान शंकरांनी आपल्या त्रिशूळाने उडवले नव्हते तर त्याने ते स्वत:हून अर्पण केले होते. त्यामुळे त्याचे प्रत्येक कापलेले शीर त्याला परत मिळाले.

आता या मागे अजून एक तर्क असा लावला जातो की नियतीने ठरवल्याप्रमाणे हे सगळे होणारच होते आणि त्यानुसार सगळ्या गोष्टी घडल्या.

भगवान शंकरांना ऋषी कश्यप यांनी शाप दिला होता की, “तू माझ्या पुत्राचा वध केलास त्यामुळे एक वेळ अशी येईल जेव्हा तुझ्या हातून तुझ्या पुत्राचा वध होईल.” शिवाय गजासुर जो हत्तीच्या रूपात होता त्याला भगवान शंकरांनी वर दिला होता की एक वेळ अशी येईल जेव्हा तुझी सगळी पापे धुतली जातील आणि तू माझ्या सोबत कैलासात वास करशील.

Source : peakpx.com

ज्या हत्तीचे मुंडके बाप्पाला बसवले गेले तो गजासुर होता. त्यामुळे नियतीच्या खेळाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडल्या, त्यात खुद्द देव सुद्धा काही करू शकत नव्हते!

तर मंडळी अशा आहेत या गूढ, अद्भुत आणि मनाचे कुतुहल अधिक वाढवणाऱ्या दंतकथा….ज्यांच्या तुम्ही जेवढ्या खोलात जाल तेवढे कमी आहे, कारण त्यांना ना आदी आहे न अंत आहे!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

D Vishal