काय आहे सिक्रेट SPG ब्ल्यू बुक? ज्यात दडला आहे पंतप्रधान मोदींचा जीव!

स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचा एक वेगळा कायदादेखील आहे. त्यांचे सुरक्षाव्यवस्थेसाठीचे एक वेगळे ब्लू बुक तयार केले जाते.


तुम्ही वाय प्लस, झेड प्लस, एक्स प्लस अशा सुरक्षा यंत्रणांची नावं ऐकली असतील. अशा सुरक्षा या काही बड्या मंडळींना दिल्या जातात. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, मोठे नेते, वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश असतो. बीबीसीने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, भारतात अशी सुरक्षा केवळ ४५० जणांना दिली जाते.

तर या सुरक्षा यंत्रणांना अर्थ नक्की काय असतो… भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही एसपीजी अर्थात स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपवर असते. आता हे एसपीजी म्हणजे काय ते पंतप्रधानांना नक्की कशी सुरक्षा देतात हे जाणून घेऊ. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचा एक वेगळा कायदादेखील आहे. त्यांचे सुरक्षाव्यवस्थेसाठीचे एक वेगळे ब्लू बुक तयार केले जाते.

देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचे देश-विदेशात दौरे होतात. अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी किंवा विविध देशांसह करार करण्यासाठी पंतप्रधान नेहमीच परदेशी दौरे करत असतात. भारतातदेखील अनेक कार्यक्रमांना त्यांची हजेरी असते. अशावेळी त्यांची सुरक्षाव्यवस्था या सगळ्यात महत्त्वाची भूमिका निभावत असते.

पंतप्रधानांच्या सुरक्षेचा विचार करता त्यांच्यासाठी खास एसपीजीची नियुक्ती केली गेली आहे. या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपवर पंतप्रधानांच्या संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी असते.

सावलीप्रमाणे एसपीजी पंतप्रधानांच्या सुरक्षेचे काम बजावत असते. एसपीजीवर केवळ पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळीच नाही तर पंतप्रधान आवासमध्येही त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी असते. पंतप्रधानांना देण्यात आलेल्या या एसपीजी सुरक्षेची काय खासियत आहे हे पाहुयात.

एसपीजी ही सुरक्षाव्यवस्था सर्वात महाग आणि खात्रीशीर सुरक्षाव्यवस्था असल्याचे मानले जाते. पंतप्रधान, माजी पंतप्रधान तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी एसपीजीची स्थापना १९८८मध्ये करण्यात आली. या यंत्रणेला देशातील सर्वात महाग आणि खात्रीशीर सुरक्षव्यवस्था मानले जाते. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, एसपीजी यंत्रणेवर दरवर्षी ३७५ करोड रूपये खर्च केले जातात.

पंतप्रधानांच्या प्रत्येक दौऱ्याआधी विशिष्ट प्रकारची तयारी केली जाते. एसपीजीअंतर्गत पंतप्रधानांच्या दौऱ्याचा सविस्तर अभ्यास करून विशिष्ट प्लॅन आखला जातो. याबद्दल माहिती देताना माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी यशवर्धन आझाद यांनी यासाठीच्या तयारीबाबत सांगितले. पंतप्रधानांच्या कोणत्याही दौऱ्याआधी विशिष्ट प्रकारची तयारी केली जाते. पंतप्रधान जर निवडणुकांच्या संदर्भात रॅलीमध्ये जर जनतेच्या उपस्थितीत भाषण करणार असतील तर त्यासाठीची तयारीही वेगळी असते. ज्या ठिकाणी पंतप्रधान उपस्थित राहणार असतील मग ते अगदी काही मिनिटांसाठी का असेना त्या जागच्या कोपऱ्या न कोपऱ्याची पडताळणी केली जाते आणि आवश्यक ती काळजी घेतली जाते.

पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी एसपीजी सुरक्षा संबंधित ठिकाणाची काळजीपूर्वक तपासणी करतात. तसेच त्याठिकाणी एसपीजीमार्फत एक टीमही तैनात करण्यात येते. दुसरीकडे एसपीजीची यंत्रणा काम करत असतानाच आयबी म्हणजेच इंटेलिजेंस ब्युरो हे राज्य सरकारच्या सुरक्षा यंत्रणांच्या कायम संपर्कात असते.

पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी ऍडवान्स सेक्युरिटी लिएजन म्हणजेच एएसएलची बैठक होते. यामध्ये एसपीजीसोबतच स्थानिक पोलीस तसेच प्रशासकीय अधिकारीदेखील उपस्थित असतात. या बैठकीत पंतप्रधानांच्या कार्यक्रमानुसार त्यांच्या सुरक्षेबाबत विश्लेषण केले जाते. तसेच दौऱ्यासंदर्भातच अनेक गोष्टींवर सुरक्षेच्या बाबतीत भर दिला जातो. पंतप्रधानांच्या हालचालींबाबत म्हणजेच ते कधी काय करणार, कुठे जाणार, किती वेळ बोलणार तसेच किती वेळ बसणार यासंबंधित ड्रील केले जाते.

या सर्व योजना करताना अनेक पर्यायांचाही विचार केला जातो. पंतप्रधान कोणत्या मार्गावरून याचीही चौकशी केली जाते. एवढंच नव्हे तर कोणत्याही कार्यक्रमादरम्यान आपातकालीन परिस्थिती उद्भवल्यास संबंधित जागी सुरक्षित ठिकाणांचीही सोय केली जाते.

आता आपण जाणून घेऊ की या सर्व सुरक्षा यंत्रणेत ब्लू बुक हे नक्की काय असतं… योजनेत महत्त्वाची भूमिका या ब्लू बुकची असते. यामध्ये पंतप्रधानांच्या राज्यातील दौऱ्यासंबंधित एसपीजीसाठी काही निर्देश दिलेले असतात. हे सर्व निर्देश गृह मंत्रालयाकडून देण्यात आलेले असतात. या निर्देशांनुसारच पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या तीन दिवस आधी एसपीजी राज्यातील पोलीस अधिकारी, आयबी, स्थानिक प्रशासकीय यंत्रणा आणि इतर महत्त्वाच्या लोकांसोबत बैठक करतात. या बैठकीत पंतप्रधानांच्या मिनिट टू मिनिट कार्यक्रमासंबंधित सुरक्षाव्यवस्था चोख ठेवली जाईल यावर योजना केल्या जातात.

यादरम्यान सुरक्षेसंबंधित प्रत्येक लहान गोष्टींबाबतही बोलले जाते. प्रत्येक परिस्थितीनुसार योजना आखल्या जातात. त्याचप्रमाणे राज्यातील ज्या ठिकाणाहून पंतप्रधानांचा ताफा निघेल त्या ठिकाणी राज्यातील पोलीस तैनात केले जातात.

Source : www.india.com

एसपीजी ऍक्ट १९८८ मध्ये अस्तित्वात आला. यात पंतप्रधानांची सुरक्षा आणि एसपीजीच्या जबाबदाऱ्या नमूद केल्या आहेत. या ऍक्टनुसार, एसपीजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षा देण्याचे काम करते. तसेच ठराविक काळासाठी ही सुरक्षा माजी पंतप्रधानांनादेखील दिली जाते. एसपीजी कोणत्याही एका राज्यापुरती किंवा देशापुरती मर्यादित नाही. तसेच इतर कामांप्रमाणे एसपीजीचा कोणताही सदस्य सुट्टी घेऊही शकत नाही आणि राजीनामाही देऊ शकत नाही.

एसपीजीच्या सदस्यांविरोधात कधीच कोणताही खटला किंवा कायदेशीर कारवाई होत नाही. केंद्र सरकार, राज्य सरकार, भारतीय मिशन, केंद्रशासित प्रदेशाचे मंत्रालय या सर्वांना एसपीजीची मदत करणे भाग असते. अशाप्रकारे अनेक महत्त्वाच्या गोष्टीही यात नमूद केलेल्या आहेत.

तर हे सर्व जाणून घेण्यामागचे कारण म्हणजे आपण पंतप्रधानांना भाषण करताना किंवा रॅलीमध्ये फिरताना प्रचार करताना घरबसल्या पाहतो, मात्र त्यामागे ही एवढी सगळी यंत्रणा कामाला लागलेली असते बरं का…आणि याच बुक वर पंतप्रधानांच्या जीवाची सुरक्षा अवलंबून असते.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *