पोलिसांनी तुम्हाला उगाच मारलं तर तुम्हीही हात उचलू शकता का? काय सांगतो कायदा?

माजोरडेपणातून कधी कधी निष्पाप नागरिकांना पोलिसांचा मार खावा लागतो. काही चुकी नसताना सुद्धा त्यांना पोलीसांच्या रोषाला सामोरे जावे लागते. मग अशावेळी काय करावे?


पोलिसांना आपण कायद्याचे रक्षक म्हणतो आणि त्यांना कायद्यानेच तो अधिकार दिलेला आहे. कुठेही अन्याय होत असेल, चुकीची गोष्ट घडत असेल, बेकायदेशीर कृती नजरेस पडत असेल तरपोलीस त्यावर कारवाई करणारच! कधी कधी गुन्हेगार एवढा माजलेला असतो की पोलिसांनाच दमदाटी करतो, त्यांच्यावर हात उगारतो आणि अशावेळी स्वसंरक्षणार्थ पोलिसांना सुद्धा प्रतिकार करण्याचा अधिकार दिला गेला आहे.

पण हा अधिकार दिल्याने झालंय काय की कधी कधी काही पोलीस याचा गैरफायदा सुद्धा घेतात. त्यांना वाटतं आपण कोणालाही मारू शकतो. कोणी आपलं काही वाकडं करू शकत नाही. याच माजोरडेपणातून कधी कधी निष्पाप नागरिकांना पोलिसांचा मार खावा लागतो. काही चुकी नसताना सुद्धा त्यांना पोलीसांच्या रोषाला सामोरे जावे लागते. मग अशावेळी काय करावे? त्यांचा मार खाऊन शांत राहायचं का? आपली काही चुकी नसताना हा अन्याय आपण सहन करायचा का?

Source : cnn.com

आज आपण या खास लेखामधून हेच जाणून घेणार आहोत की विनाकारक पोलिसांनी तुमच्यावर हात उगारला तर तुम्ही काय करू शकता?

कोणीही व्यक्तीने तुमच्यावर हात उगारला तर प्रवृत्तीनुसार तुम्ही सुद्धा त्याला प्रतिकार करणारच! हीच गोष्ट पोलिसांच्या बाबतीत देखील होऊ शकते. पोलीस तुम्हाला विनाकारण मारत असतील तर तुमच्याकडून सुद्धा प्रतिकार वा बचाव होणे साहजिक आहे. त्यामुळे अशावेळी सामान्य नागरिकाने पोलिसावर हात उचलणे योग्य आहे का? अशावेळी कायद्याकडून बचावासाठी काही नियम आहेत का?

सगळ्यात पहिलं तर हे जाणून घ्या की तुम्ही स्वत:हून पोलीसांशी कधीच हुज्जत घालू नका किंवा पहिला हात उगारू नका. कारण कायदा स्पष्ट सांगतो की पोलिसांशी असभ्य भाषेत वर्तन आणि पहिली मारहाण सुरु करणे हा कायद्याने गुन्हा आहे.

आता दुसरी स्थिती म्हणजे समजा पोलिसांनी तुम्हाला विनाकारण मारलं तर? किंवा राग अनावर होऊन त्यांनी हात उगारला तर? तर मंडळी याचं सुद्धा उत्तर हेच आहे की तुम्ही त्या पोलिसाला प्रतिकार करू नये. कोणत्याही परिस्थिती मध्ये तुम्ही पोलिसांवर हात उगारू शकत नाही किंवा त्यांना मारहाण करू शकत नाही.

कारण काहीही असो आणि तुम्ही कोणत्याही पोलिसाला साधं टच जरी केलं तरी तो तुमच्यावर IPC ३५३ आणि ३३२ नुसार केस करू शकतो. त्यामुळे जर कोणी पोलीस तुमच्यावर राग काढत असेल तर तुम्ही स्वत:वर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही नियंत्रण ठेवलं तरच तुम्हाला न्याय मिळू शकतो.

अशावेळी तुम्हाला मारहाण झाल्यानंतर तुम्ही थेट FIR दाखल करू शकता. FIR घेतली नाही तर थेट कोर्टाची पायरी चढू शकता आणि न्याय मिळवू शकता. अर्थात ही प्रक्रिया मोठी आहे. पण तुम्हाला सुद्धा माहित आहेच की भारतात सामान्य माणसासाठी न्याय मिळणे दिसते तेवढे सोप्पे नाही. असो, मग आता याचा अर्थ असा आहे का की आपण मार खायचा काहीच करायचं नाही? तर कायदा सांगतो की तुम्ही प्रतिकार करू शकता, पण केव्हा..? जेव्हा तो पोलीसा तुम्हाला जीवानिशी मारण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा!

IPC ९६ ते १०० नुसार सामान्य व्यक्ती पोलीसा विरोधात प्रायव्हेट डिफेन्स अर्थात खाजगी संरक्षणाला पात्र ठरतो. अशावेळी त्याच्यावर केस होऊ शकत नाही.

IPC ९९ नुसार जर पोलिसाच्या मारहाणीत एखाद्या व्यक्तीचा अवयव तुटला, तो अपंग झाला, २० पेक्षा जास्त दिवस हॉस्पिटल मध्ये अॅडमिट राहिला तर अशावेळी त्या पोलिसावर केस होऊ शकते. समजा एखादा पोलीस विनाकारण तुमचा जीव घेणारच होता, आणि अशावेळी तुमच्या प्रतिकारात त्या पोलिसाचा मृत्यू झाला तर त्या हत्येला सुद्धा प्रायव्हेट डिफेन्स समजलं जातं, पण हो यासाठी ती गोष्ट न्यायालयात सिद्ध सुद्धा करावी लागते.

पण पुन्हा लक्षात घ्या जर विनाकारण एखादा पोलीस तुमच्या जीवाच्या मागे लागला असेल तेव्हाच तुम्ही या अधिकाराला पात्र ठरता. तुम्ही त्याला उकसवलं किंवा कारण दिलं असेल, गुन्हा केला असेल तर मात्र तुम्हीच या केस मध्ये फसू शकता.

मंडळी अशा घटना फार कमी दुर्मिळ आहेत ज्यामध्ये विनाकारण पोलिस कोणाच्या जीवावर उठले असतील. ते कायद्याचे रक्षक आहेत आणि अनेक पोलीस आपलं काम चोख बजावत असतात. अगदी पेटीतल्या नासक्या आंब्यासारखे काही पोलीस असतात जे अशी कृत्ये करू शकतात. अशावेळी तुम्ही वर सांगितल्याप्रमाणे आपले अधिकार वापरून न्याय मिळवू शकता.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

D Vishal