वडील मजूर, आई सफाई कामगार आणि स्वत: मोबाईल रिपेअर करणाऱ्या ‘ह्या’ पोराने हरवले मुख्यमंत्र्यांना!

भदौर हा मतदारसंघ मुख्यमंत्र्यांसाठी अत्यंत सुरक्षित मानला जात होता. या पराभवानंतर मुख्यमंत्र्याना पराभूत करणाऱ्या लाभ सिंह उगोके यांचे नाव देशभरात चर्चेत आहे.


पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांना २०२२ च्या निवडणुकीत पराभवाचा मोठा झटका बसला आहे. भदौर मतदारसंघात त्यांना ‘आम आदमी’ पक्षाचे उमेदवार लाभ सिंह उगोके यांनी पराभूत केले.

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या निकालानुसार आम आदमी पार्टी प्रचंड बहुमताने विजयी ठरली आहे. या निवडणुकीतील विशेष बाब म्हणजे अनेक मोठया उमेदवारांना पराभवाला सामोरं जावं लागलं. यात सगळ्यात मोठे नुकसान माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचे झाले. त्यांना त्यांच्या दोन्ही जागांवर पराभव पत्करायला लागला. भदौर हा मतदारसंघ मुख्यमंत्र्यांसाठी अत्यंत सुरक्षित मानला जात होता. या पराभवानंतर मुख्यमंत्र्याना पराभूत करणाऱ्या लाभ सिंह उगोके यांचे नाव देशभरात चर्चेत आहे. कोण आहे हा तरुण नेता?

Source: thewire.in

पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये ‘आम आदमी’ पक्षातर्फे निवडणूक लढवणारे लाभ सिंह उगोके हे अवघ्या ३५ वर्षाचे असून ते एका साध्या मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात नोकरी करतात.

ते एका अतिशय नम्र कुटुंबातून आले आहेत. त्यांचे वडील शेतात मजूरी करतात तर आई एक सरकारी शाळेत सफाई कामगार म्हणून काम करते. लाभ सिंह यांचे शिक्षण बारावी पर्यंत झाले आहे. लाभ सिंह उगोके २०१३ साली आम आदमी पार्टीमध्ये एक स्वयंसेवक म्हणून दाखल झाले होते.

मोबाईल रपेरिंगच्या दुकानात काम करणाऱ्या भदौर येथील आम आदमी पार्टीचे लाभ सिंह उगोके यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचा ३७,५५८ मतांच्या फरकाने पराभव केला. ११७ विधानसभा जागांसाठी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदानाच्या निकालानुसार आम आदमी पार्टी ९२ जागा जिंकत सत्तेवर आली. पंजाबमधील जोरदार विजयानंतर आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी देखील लाभ सिंह उगोके यांचे कौतुक केले.

प्रतिज्ञापत्रानुसार, लाभ सिंह उगोके यांनी त्यांची मालमत्ता म्हणून हिरो होंडा मोटारसायकल नमूद केली आहे जी त्यांनी आठ वर्षांपूर्वी खरेदी केली होती. तसेच, भदौरमधून निवडणूक लढवण्याचे तिकीट मिळाल्यानंतर लाभसिंह उगोके यांनी मुख्यमंत्री चन्नी यांचा पराभव करून इतिहास घडवू, असा दावा केला होता. बारावी उत्तीर्ण आणि फर्स्ट टाईमर असलेल्या उगोके यांनी चन्नी यांच्यावर ‘सामान्य माणसाचा मुखवटा’ घातल्याचा आरोप केला होता.

“त्यांच्या मतदारसंघात ७४ गावे असून त्यातील प्रत्येक गावाच्या समस्या त्यांना माहित आहेत. त्यांच्यासाठी भदौर हा ‘हलका’ (मतदारसंघ) नसून एक कुटुंब आहे. तसेच, चन्नी साहेबांना भदौर मतदारसंघातील १० गावांची नावेही माहित नाहीत. तसेच चन्नी हे ‘आम आदमी’ नाहीत ते दलित असूनही राजाचे जीवन जगत आहेत” असा दावा उगोके यांनी मीडियाशी बोलताना केला होता.

कॅप्टन, सिद्धू, चन्नी, माजीठीया या सगळ्यांचा यंदाच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. पंजाबच्या नागरिकांनी हा अद्भुत चमत्कार करून दाखवला आहे. ही मोठी क्रांती घडवून आणली आहे असे जनतेचे मत आहे. पहिली क्रांती दिल्लीत झाली, आता संपूर्ण देशात क्रांती होणार आहे असेही म्हटले जात आहे.

Source: dnaindia.com

पंजाबच्या बरनाला जिल्ह्यात बरनाला, महाल कला आणि भदौर हे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील भदौर मतदारसंघात एकूण १३ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी हे काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते. निवडणूक शपथपत्रात चन्नी यांनी आपली एकूण संपत्ती ९.२ कोटी असल्याचं जाहीर केलं होतं. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचा चमकौर साहिबमधूनही पराभव झाला. चन्नी यांनी राज्य विधानसभेत तीनदा प्रतिनिधित्व केलेल्या चमकौर साहिबमधून नेत्रचिकित्सक डॉ. चरणजीत सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना ७,९४२ मतांनी पराभूत केले.

म्हणतात ना एकदा का जनतेने कौल दिला की राजा सुद्धा रंक होतो आणि रंक हा राजा होतो, शेवटी जनता हीच खरी जनार्दन!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

Gayatri Gurav