बाबासाहेबांनी चक्क इंग्लंडच्या राणीचा फोटो उलटा चिटकवला आणि…….

बाबासाहेब काही काळ कामानिमित्त लंडन मध्ये वास्त्यव्यास होते. तेव्हा त्यांना तातडीने पोस्टातून एक पत्र पाठवण्याची गरज भासली.


१५ नोव्हेंबरचा २०२१ चा दिवस उजाडला आणि सबंध महाराष्ट्रावर व इतिहासपप्रेमींवर एक शोककळाच पसरली. तब्बल १०० वर्षे भरभरून आयुष्य जगलेला इतिहासपुरुष अखेर आपल्याला सोडून गेला होता. ज्यांनी स्वराज्याचा दडलेला इतिहास अत्यंत ओघवत्या शैलीत उलगडला, लोकांना गोडी लागेल अशा पद्धतीने मांडला आणि जाणता राजा सारखे कधीही न विसरता येणारे महाकाव्य आपल्या पुढे सादर केले ते बळवंत मोरेश्वर पुरंदरे अर्थात बाबासाहेब पुरंदरे नामक इतिहासाच्या पानात रमणारे ऋषी अनंतात विलीन झाले.

बाबासाहेबांबद्दल वेगळे काय हो सांगायचे? समस्त इतिहासप्रेमींचे ते श्रद्धास्थान होते. वयाच्या शंभरी मध्ये असतानाही त्यांच्या सहवासात एक वेगळीच ऊर्जा मनी संचारायची, त्यांचा कापरं भरलेला पण या त्या वयातही करारी असणारा आवाज ऐकत राहावसा वाटायचा. या महान व्यक्तीने ज्या पाउलखुणा मागे सोडल्या आहेत त्या आपल्या येणाऱ्या शंभर पिढ्यांना स्वराज्याची आणि छत्रपती शिवाजी महाराज नामक देवतुल्य व्यक्तिमत्त्वाची प्रेरणादायी गाथा सांगत राहतील.

Source: thehindu.com

एका सामान्य मुलाप्रमाणे स्वराज्याच्या आणि शिलेदारांच्या कथा ऐकतच बाबासाहेब मोठे झाले. त्या कथा ऐकतानाच त्यांना स्फुरण चढे. आपल्या महाराष्ट्राचा इतिहास हा किती अगाध आहे याचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळते होते आणि तिथेच कुठेतरी त्यांच्यातील इतिहासकाराचा अंकुर फुलला.

१९३३ साली प्रभात फिल्म कंपनीने ‘सिंहगड’ नावाचा एक चित्रपट तयार केला. बाबासाहेबांना साहजिकच इतिहासाची ओढ असल्याने ते चित्रपट पाहण्यास गेले. अवघे ११ वर्षे वय असावे त्यांचे, पण त्या एवढ्या वयात सुद्धा शंकरराव भोसल्यांनी साकारलेली तानाजी मालुसरे यांची भूमिका त्यांना भावली. बाबासाहेबांना इतिहासाचे वेड लावण्यात या चित्रपटाची मुख्य भूमिका होती असे म्हटले तर वावगे ठरू नये.

याच वेडापायी पुढे त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासासाठी जे योगदान दिले ते आपण सर्व जाणतोच! बाबासाहेबांना त्यांच्या कार्यासाठी खूप प्रसिद्धी आणि प्रशंसा आयुष्यभर मिळाली, मात्र शेवटच्या श्वासापर्यंत एक खंत त्यांना सतावत राहिली ती म्हणजे आपल्या लोकांना आपल्या पुर्वजांच्या शौर्याची आणि आपल्या इतिहासाची जाण नाही. आपली ही खंत किती रास्त आहे हे पटवून देताना ते लंडन मध्ये त्यांना आलेला एक अनुभव सांगायचे.

Source : Lokmat.com

बाबासाहेब काही काळ कामानिमित्त लंडन मध्ये वास्त्यव्यास होते. तेव्हा त्यांना तातडीने पोस्टातून एक पत्र पाठवण्याची गरज भासली. ते लागलीच जवळच्या पोस्टात गेले. पत्र पाठवण्याच एक लॉट निघण्याच्या तयारीत होता. त्याच लॉट मधून आपले पत्र गेले तर लवकर पोहोचेल असे बाबासाहेबांना वाटले. त्यांनी थोडी घाई केली आणि घाईघाईत पत्र दिले. पण या घाईच्या नादात त्यांच्याकडून एक चूक झाली ती म्हणजे त्यांनी पोस्टाचे तिकीट उलटे चिकटवले होते आणि त्यावर फोटो होता इंग्लंडच्या राणीचा!

पोस्टात काम करणाऱ्या तरुणीने त्यांना परत बोलावले आणि पोस्टाचे तिकीट काढून नीट लावायला सांगितले. बाबासाहेबांनी सुद्धा असेल काहीतरी नियम हा विचार करून ते पोस्टाचे तिकीट नीट लावून दिले. नंतर त्यांनी प्रश्न केला, “पोस्टाचे तिकीट उलटे लावले तर काय फरक पडतो? पत्रावरचा पत्ता महत्त्वाचा आहे. तिकीट कसेही लावले तरी पत्र पोहोचणारच होते.”

त्यावर ती तरुणी म्हणाली, “हो मलाही ते माहित आहे. पण मला दिसले की माझ्या राणीचा फोटो उलटा लावला गेला आहे आणि ते दिसत असून सुद्धा ही चूक दुरुस्त करून न घेणे माझ्या तत्वात बसत नाही. इथे राणी आमच्यासाठी सर्वात आदरस्थानी आहे आणि तिचा अपमान मी खपवून घेऊ शकत नाही.”

त्या अनुभवातून पहिल्यांदा बाबासाहेबांना ब्रिटीशांमधला आणि आपल्यातला फरक कळला. त्यांनी भारतात परतल्यावर अनेकांना हा किस्सा सांगितला आणि म्हणाले, “इतिहासावर प्रेम असावे तर असे. नाहीतर आपल्याकडे लोकं आपल्याच इतिहासाला नावं ठेवतात. तो खोटा आहे म्हणून त्याची खिल्ली उडवतात. दंतकथा, भाकडकथा म्हणून आपलाच इतिहास नाकारतात. त्या उलट हे गोरे आहेत. त्यांना स्वत:च्या इतिहासाबद्दल आदर आहे, प्रेम आहे. तो जपावा म्हणून तिथे प्रत्येकजण धडपडतो. ही गोष्ट आपल्या भारतात झाली पाहिजे आणि तेव्हाच आपला वारसा टिकेल आणि आपला इतिहास जगभर पोहोचेल.”

याच परिवर्तनासाठी बाबासाहेबांनी मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबवविले, अनेक पुस्तके लिहिले, कार्यक्रम केले. जाणता राजा सारखा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यामागे सुद्धा त्यांचा हाच हेतू होता की खरा इतिहास लोकांना कळावा, खरे महाराज लोकांना कळावे. पण दुर्दैव हे की त्यांचे ते ध्येय ध्येयच राहिले.

आपला गौरवशाली इतिहास जतन करणे, आत्मसात करणे आणि त्याचा नेहमी आदर राखणे एवढे जरी आपण सर्वांनी केले तरी पुरेसे आहे. तीच बाबासाहेब पुरंदरे यांना खरी आदरांजली ठरेल.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

Shraddha More