भारतात कधीच ऑलम्पिकचे आयोजन का होत नाही? एक लाजिरवाणे सत्य!

तुम्ही १८९६ पासूनचा ऑलम्पिक इतिहास चाळला तर तुम्हाला विविध देशांची नावे दिसतील. इटली, फ्रांस, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, रशिया, चीन एवढेच काय तर ब्राझीलचे सुद्धा नाव आहे.


भले कोणत्याही देशामध्ये कितीही वेगवेगळ्या खेळांचे विश्वचषक वा स्पर्धा का होईना पण प्रत्येक देशाचे एक स्वप्न असते की आपल्या देशात एकदातरी ऑलम्पिक स्पर्धा झाली पाहिजे. ह्या स्पर्धेची शानच काहीतरी वेगळी आहे. तुम्ही १८९६ पासूनचा ऑलम्पिक इतिहास चाळला तर तुम्हाला विविध देशांची नावे दिसतील. इटली, फ्रांस, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, रशिया, चीन एवढेच काय तर ब्राझीलचे सुद्धा नाव आहे. या सर्व देशांत ऑलम्पिकचे आयोजन करण्यात आले होते. पण या यादीमध्ये कुठेच तुम्हाला भारताचे नाव दिसणार नाही आणि पुढेही कित्येक वर्षे कदाचित ते नसेल. पण असे का? का भारतात आजवर एकही ऑलम्पिक खेळवली गेली नाही? आज या लेखातून आपण एक विदारक आणि लाजीरवाण सत्य जाणून घेऊ.

ज्या देशाला ऑलम्पिक आयोजित करायचे असेल त्या देशाला स्वत:ची पात्रता सिद्ध करावी लागते. कारण ऑलम्पिक आयोजित करणे हे क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याएवढे सोप्पे नाही. भारतात ऑलम्पिक आयोजित का होऊ शकत नाही याचे कारण म्हणजे ऑलम्पिकसाठी लागणारा खर्च होय. हा खर्च भारतासारख्या देशाला परवडणारा नाही.

मागील जी ऑलम्पिक स्पर्धा झाली होती त्यासाठी १४.४ बिलियन डॉलर्स इतका खर्च आला होता. हा खर्च एवढा आहे की आपल्या देशातील काही राज्यांचे मिळून सुद्धा एवढे उत्पन्न नाही. ऑलम्पिक बाबत चिंतेची अजून एक गोष्ट म्हणजे जे बजेट सांगितले जाते त्यापेक्षा जास्तच खर्च येतो आणि हा अधिकचा खर्च सुद्धा त्या देशाला परवडायला हवा.

आता तुमच्यापैकी अनेकांना ज्यांना भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती माहित आहे ते म्हणतील हा खर्च भारतासाठी जास्त मोठा नाही आहे. भारताला हा खर्च झेपू शकतो. तर हो, भारताला हा खर्च नक्कीच झेपू शकतो. पण हा खर्च करून त्याच्यातून काहीच फायदा आपल्याला मिळणार नाही. म्हणजे एक प्रकारे हा पैसा वाया घालवण्यासारखे आहे.

Source : inhabitat.com

देशात एवढे सामाजिक प्रश्न असताना एवढा खर्च करणे नक्कीच जागतिक पातळीवर भारताला टीकेचा धनी बनवू शकते. तुम्ही म्हणत असाल की टीव्ही राईट्स मधून उत्पन्न मिळते की, पण मंडळी सगळे उत्पन्न देशाला मिळत नाही. खूप जास्त टक्केवारी ऑलम्पिक समितीला मिळते आणि ही समिती दरवर्षी आपला हा भाग वाढवत चालली आहे.

भारतात ऑलम्पिक आयोजित करण्यात अजून एक अडथळा म्हणजे किमान ३५ मैदाने ऑलम्पिकसाठी तयार करावी लागतात आणि  २ महिने तरी त्यांच्या देखभालीचा खर्च असतो. यासाठी जागा खाली करावी लागते. लोकांचे पुनर्वसन करावे लागते. शिवाय पर्यावरण आणि सामाजिक दृष्ट्या अनेक प्रश्न उभे राहतात. ते सोडवणे गरजेचे बनते. हे सर्व नियोजन भारतात सुरळीतपणे होईल असे खुद्द ऑलम्पिक समितीला सुद्धा वाटत नाही. शिवाय ऑलम्पिक गेम्स संपल्यावर त्या शहराला मोठा आर्थिक फटका सोसावा लागतो.

आजवर अशी अनेक उदाहरणे समोर आली आहेत कि ज्या शहरात ऑलम्पिक झाले, ती शहरे नंतर डबघाईला आली आणि कर्जबाजारी झाली. २००४ मध्ये अथेन्सची अवस्था अशीच होती आणि पुढे त्याचा फटका पूर्ण देशाला भोगावा लागला. आज पूर्ण ग्रीस देश हा आर्थिकदृष्ट्या बुडाला आहे.

ही सर्व कारणे भारत सरकारला सुद्धा माहित आहेत आणि म्हणूनच भारत कधीच ऑलम्पिक आयोजनसाठी अर्ज करत नाही. कारण आता असेही म्हटले जात आहे की ऑलम्पिक आयोजित करणे म्हणजे स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे. त्यामुळे ज्या देशांना आपण ऑलम्पिक आयोजित करूनही भक्कम राहू शकतो असे वाटते तेच देश ऑलम्पिक आयोजनासाठी इच्छुक असतात.

Source : jakpost.net

भारतासाठी ही गोष्ट लाजिरवाणी यासाठी आहे की आपण महासत्ता होत असल्याच्या एकीकडे बाता मारतो पण दुसरीकडे आपण अजूनही विकसित देशांच्या यादीत नाही. आपली अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलर झाल्याचे सांगितले जाते, पण आपण ऑलम्पिक सारखी स्पर्धा आयोजित करण्यास अजूनही सक्षम नाही.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

D Vishal