शर्ट आणि बुट घ्यायला सुद्धा पैसे नव्हते, तरीही श्रीलंकेने १९९६ चा वर्ल्डकप जिंकून दाखवला!

त्यांच्याकडे एखादा जास्तीचा शर्ट किंवा बूट घेता येतील इतकेही पैसे नसत. पण ते एकमेकांशी मिळून मिसळून राहत, एकत्र जेवत असत.


मित्रांनो तुम्ही लहानपणी उबदार पांघरूणात बसून आपल्या आजी-आजोबांकडून परीकथा ऐकल्या असतीलच ना? आपल्याला तेव्हा वाटायचं की या परीकथा सत्यात उतरल्या तर काय बहार येईल! पण अशक्य असतात म्हणूनच त्या परीकथा असतात. पण मित्रांनो, एक परीकथा मात्र सत्यात उतरली…1996 मध्ये… विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत.. श्रीलंकेसाठी!

१९९५ पूर्वी श्रीलंकेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात फारसा दबदबा नव्हता. श्रीलंकेमध्ये क्रिकेटचा इतिहास अगदी अलिकडचा! १९७५ साली श्रीलंकेने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट जगतात पदार्पण केले. लागोपाठच्या दोन ऑस्ट्रेलिया दौऱ्यांमध्ये कर्णधार रणतुंगाने स्वतः निवडलेले चेले आपल्याबरोबर घेतले. या दौऱ्यांमध्ये त्यांना टीका, छेडछाड, उपद्रव आणि विविध प्रकारच्या आरोपांना सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियन पंचांनी मुथय्या मुरलीधरनने टाकलेला चेंडू त्याने फेकल्याचे सिद्ध करून नो बॉल असल्याचे घोषित केले. त्याला त्यामुळे काही काळ संघाबाहेर रहावे लागले. ही श्रीलंकेच्या संघातील सर्वांत लहान खेळाडूवर साऱ्या जगासमोर ओढवलेली नामुष्की होती. पुढे कर्णधार अर्जुन रणतुंगा आणि संघातील इतर खेळाडू त्याच्या पाठीशी उभे राहिले.

त्याकाळात जयसूर्या व विक्रमसिंघेसारखे क्रिकेटपटू रणतुंगाच्या घरी उतरत असत. कारण त्या काळी त्यांना अन्यत्र राहणे परवडण्यासारखे नव्हते. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाचे त्याकाळी खरेतर दिवाळे निघाले होते. त्यांच्याकडे त्यावेळेस रू. ३,००,००००/- एवढीच रक्कम खर्च करण्यासाठी शिल्लक होती.

त्यामुळे नियमित वेतन मिळण्याची तर सूतराम शक्यता नव्हती. श्रीलंकन क्रिकेट संघाला त्याकाळी खेळण्यासाठी दौऱ्यावर जायचे असेल तर त्यांना स्पॉन्सर्स शोधावे लागत असत. या संघाकडे आधुनिक क्रिकेटपटूंकडे असणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा नव्हत्या. त्यांच्याकडे एखादा जास्तीचा शर्ट किंवा बूट घेता येतील इतकेही पैसे नसत. पण ते एकमेकांशी मिळून मिसळून राहत, एकत्र जेवत असत. याच काळात संघ घडत होता, उभा राहत होता. याचदरम्यान त्यांच्या नशीबाने कूस बदलली आणि त्यांना प्रशिक्षक म्हणून लाभले डेव्ह व्हॉटमोअर!

जून १९९५ पासून त्यांनी संघ व्यवस्थापक दुलीप मेंडीस यांच्या सहकार्याने संघामध्ये अनेक बदल घडवून आणले. शारीरिक प्रशिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल केला. त्यांच्या सुस्तावलेल्या वृत्ती पालटून त्यांना शिस्त लावली, त्यांच्यात जिद्द निर्माण केली. त्यामुळे त्यांची मनोवृत्तीही पालटली.
दरम्यानच्या काळात पुन्हा एकदा मुरलीधरनवर त्याची गोलंदाजीची शैली चुकीची असल्याचे आरोप झाले. पण प्रशिक्षक व्हॉटमोअर यांनी खंबीरपणे पाठीशी उभे राहून त्यांना संघाला मार्ग दाखवला.

Source : toiimg.com

त्या दौऱ्यामध्ये मुरलीधरन आणि जखमी रणतुंगा व महानामा यांच्या अनुपस्थितीत, पंचांचे तटस्थ नसणे, व विदेशी वातावरण या सर्वांचा सामना करत वेस्ट इंडिजला धूळ चारली आणि ऑस्ट्रेलियाला कडवी टक्कर दिली. त्यांचा संघ ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर तावून सुलाखून निघाला. आता ते तयार झाले होते मोठ्यात मोठ्या आव्हानांवरसुद्धा मात करण्यासाठी!

पुढे कोलंबोमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांमुळे ऑस्ट्रेलिया व वेस्ट इंडिजच्या संघांनी श्रीलंकेत खेळण्यास नकार दिल्यावर रणतुंगाने ऑस्ट्रेलियाला खुले आव्हान दिले. त्याने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी एक योजना आखली. प्रत्येक सामन्यापूर्वी रणनीती आखण्यासाठी बैठका होऊ लागल्या. कधी या बैठका २-२ तासही चालत असत. पण ही मेहनत सार्थकी लागाली. लवकरच परिणाम दिसू लागले. व्हॉटमोअर यांची प्रत्येक गोष्टीच्या नोंदी ठेवण्याची पद्धत, व्हिडीओ रिप्लेच्या माध्यमातून बारकावे अभ्यासणे, सर्व परिस्थितींना साजेशा व्यूहरचनेचे कागदावरील रेखाटन केले गेले. प्रत्येक श्रीलंकन खेळाडूसाठी विशिष्ट व निश्चित भूमिका तयार केल्या गेल्या. व्हॉटमोअर अगदी बारीक-सारीक गोष्टींसाठीही खेळाडूंना सूचना देत असत.

फलंदाजी अधिक आक्रमक करण्यासाठी आठव्या क्रमांकावर खेळणारा जयसूर्या आणि सातव्या क्रमांकावर खेळणारा कालुवितरणा यांना आघाडीवर खेळण्यास पाठवले. जयसूर्या, कालुवितरणा, महानामा, तिलकरत्ने असे तगडे फलंदाज आणि विक्रमसिंघे, वास, मुरलीधरन, धर्मसेना, जयसूर्या व डि सिल्व्हा अशी गोलंदाजांची भरभक्कम फळी असा श्रीलंकेचा संघ आकाराला आला.

Source : bbci.co.uk

रणतुंगा, व्हॉटमोअर आणि सहकाऱ्यांची मेहनत फळास आली. डि सिल्व्हाने अंतिम सामन्यात शतकी खेळी करून विश्वचषकावर श्रीलंकेचे नाव कोरले! एका दिवाळखोरीतून बाहेर पडून…. अगणित समस्या व अडथळ्यांवर मात करून.. मोठमोठी आव्हाने पार करून.. श्रीलंकेने विश्वचषकावर आपली मोहर उमटवली.. आणि एक परीकथा साकार झाली!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

Gauri Khare