हो, तुम्ही पण फसलात! रेल्वेमधील Announcement कोणी बाई नाही तर ‘हा’ मराठी मुलगा करायचा!


रेल्वे फलाटावर पाय ठेवल्यावर सगळ्यात आधी आपण आपले कान टवकारतो. कारण आपल्याला अपेक्षित गाडीविषयी माहिती हवी असते. आणि गोड आवाजात एक महिला अनाऊन्समेंट करत असते. पण तुम्हाला जर आम्ही सांगितलं की येणारा गोड आवाज बाईचा नसून एका पुरूषाचा आहे तर? अर्थातच तुमचा अजिबातच विश्वास बसणार नाही, उलट तुम्ही वेड्यात काढाल आम्हाला…

पण मवाली वर तुम्हाला कधी चुकीची माहिती मिळाली आहे का राव? आहो खरंच ‘कृपया ध्यान दिजीए’ हा लक्षवेधी आवाज ज्या गोड गळ्यातून येतो तो गळा एका पुरुषाचा आहे. विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ नक्की पहा.

कुठल्याही दक्षिण-मध्य रेल्वे स्थानकांवर (South-Central Railway Station) जा. तिथे हा आवाज तुम्हाला ऐकू येईलच. हा आवाज आहे, बीडच्या परळी वैजनाथमधल्या श्रावण आदोडेचा. बसला ना धक्का?

श्रावणला लहानपणापासूनच रेल्वेच्या उद्घोषणा ऐकायला खुप आवडत असे. त्याला त्याचं इतकं आकर्षण होतं, की वेळ मिळेल तेव्हा तो रेल्वे स्थानकावर जाऊन या उद्घोषणा ऐकत बसे आणि घरी येऊन त्याची हुबेहुब नक्कल करण्याचा प्रयत्न करत असे.

सरावानंतर त्याला खरंच त्याला महिलेच्या गोड आवाजात उद्घोषणा करणे जमू लागले. त्यातूनच त्याला आता रेल्वेमध्ये उद्घोषक म्हणून काम करण्याची स्वप्नं खुणावू लागली.

म्हणतात ना जबरदस्त इच्छा असेल तर मार्ग आपोआपच मिळत जातात. श्रावणच्याबाबतीतही असंच घडलं. एकदा त्याच्या ओळखीतल्या नातेवाईकांनी त्याचा आवाज ऐकला आणि त्यांनी त्याला थेट नांदेड रेल्वे स्थानकावर नेलं. तिथे माईकवर रेल्वेगाडी येण्याची उद्घोषणा करायला सांगितली. त्यानेही मोठ्या आत्मविश्वासाने उद्घोषणा केली. आणि त्याचा आवाज नांदेड रेल्वे स्थानकावर घुमला.

हा आवाज पुरुषाचा असेल अशी साधी शंकाही कोणाला आली नाही. मात्र स्थानकावरील प्रमुख अधिकारी हातातलं काम सोडून उद्घोषणा कक्षात आले. कारण त्या दिवशीची उद्घोषणा वेगळी होती, आवाजात थोडा बदल होता हे त्यांनी लागलीच ताडलं होतं. मात्र जेव्हा त्यांना सांगितलं की तो आवाज श्रावणचा होता तेव्हा त्यांचा या गोष्टीवर विश्वासच बसला नाही. तेव्हा श्रावणने परत एकदा उद्घोषणा करुन दाखवली.

या घटनेनंतर श्रावणचे रेल्वे उद्घोषक बनण्याचे स्वप्न काही अंशी खरं झालं. त्याला दक्षिण-मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवरील उद्घोषकाचे कंत्राटी काम मिळालं. २०१९ ते २०२१ दरम्यान दक्षिण-मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवर श्रावणचा आवाज घुमू लागला.

Source : sbs.com.au

मात्र पुढे त्याने हे काम सोडण्याचा निर्णय घेतला. आता त्याने रेल्वे अधिकारी होण्यासाठी अभ्यासाची तयारी सुरू केली आहे. एकूणच त्याची जिद्द पाहता, लवकरच त्याचे हे स्वप्नही पूर्ण होईल, हे नक्की.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *