योगी आदित्यनाथ यांना ‘बुलडोझर बाबा’ हे नाव कसे पडले?

ही निवडणूक अनेक अर्थाने रंजक होती आणि त्यातील एक रंजक गोष्ट होती ती म्हणजे योगी आदित्यनाथ यांना बुलडोझर बाबा किंवा बाबा बुलडोझर म्हणणे!


२०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये समाजवादी पार्टी आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. शेवटी विजय हा भाजपच्या पारड्यातच पडला, पण ही निवडणूक अनेक अर्थाने लक्षवेधी आणि काहीशी रंजक ठरली.

या निवडणुकीमध्ये योगी आणि अखिलेश यादव हे उत्तर प्रदेशच्या युवा वर्गात प्रसिद्ध असणारे दोन विरुद्ध टोकाचे नाते आमनेसामने होते आणि त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. योगी यांनी ५ वर्षांत म्हणावा तितका विकास केला नाही असं तेथील जनता उघडपणे बोलत होती आणि त्यामुळे पुन्हा निवडून येणे योगी आदित्यनाथ यांच्यासाठी प्रतिष्ठेचे झाले होते.

Source : newstrack.in

तर दुसरीकडे अखिलेश यादव यांना आपल्या वडिलांच्या पक्षाला लागलेली उतरती कळा संपवून उत्तर प्रदेशात सगळ्यात मोठा स्थानिक पक्ष समाजवादी पार्टीच आहे हे दाखवून द्यायचे होते. त्यामुळे दोन्ही नेते अगदी इरेला पेटले होते.

ही निवडणूक अनेक अर्थाने रंजक होती आणि त्यातील एक रंजक गोष्ट होती ती म्हणजे योगी आदित्यनाथ यांना बुलडोझर बाबा किंवा बाबा बुलडोझर म्हणणे!

तुम्ही सुद्धा वर्तमानपत्रामध्ये किंवा बातम्यांमध्ये योगी आदित्यनाथ यांना या नावाने संबोधताना ऐकले असेल. आणि तुमच्या सुद्धा मनात प्रश्न आला असेल की असे का? बुलडोझर बाबा हे नाव योगी आदित्यनाथ यांना का? चला आज याचेच उत्तर आपण जाणून घेऊया!

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यापासून योगी आदित्यनाथ यांनी मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर गोष्टींवर चाप बसवायला सुरुवात केली आणि त्यापैकी एक गोष्ट होती बेकायदेशीर बांधकाम! बेकायदेशीर बांधकाम यापुढे माझ्या राज्यात मी चालूच देणार नाही अशी गर्जना त्यांनी केली आणि तेव्हापासुन त्यांनी उत्तर प्रदेशातील सर्व बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.

Source : tosshub.com

पण यात त्यांनी खास करून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नेत्यांना आणि त्यांच्या चेल्यांना टार्गेट केले. सरकारी जमिनीवर कब्जा करून बसलेल्या अशा लोकांच्या बांधकामांवर त्यांनी अधिकाऱ्यांना बिनधास्त सरळ जाऊन बुलडोझर फिरवायला सांगितले.

आता मुख्यमंत्र्यांनी स्वत: मोकळीक दिली म्हटल्यावर अधिकारी मागे का राहतील? त्यांनी तर थेट बांधकामे बुलडोझरने उडवण्याचा सपाटाच लावला. पण हे नाव नेमके त्यांना दिले कुणी? तेव्हापासून योगी प्रेमींच्या मनात त्यांचे नाव बुलडोझर वाले बाबा असे हळूहळू उमटू लागले. पण हे नाव अगदी प्रसिद्ध तेव्हा झाले जेव्हा एका नेत्याने त्यांना या नावाने संबोधले! तर मंडळी विश्वास बसणार नाही पण हा नेता दुसरा तिसरा कोणी नसून त्यांचेच विरोधक अखिलेश यादव होते!

अयोध्ये मधील एका सभेत अखिलेश यादव म्हणाले की, “उत्तर प्रदेश मध्ये सगळ्याच जागांची नवे बदलली जात आहेत, ती कमी कि काय म्हणून आता नेते सुद्धा स्वत:ची नवे बदलत आहेत. योगीजींना बुलडोझर बाबा हे नाव दिले गेले आहे.”

एका इंग्रजी वृत्तपत्रामध्ये पहिल्यांदा बुलडोझर बाबा या नावाने योगींचा उल्लेख केला गेला आणि त्याला धरूनच ही टीका अखिलेश यादव यांनी केली. यावर उत्तर देताना योगी म्हणाले की, “आमचा बुलडोझर काय काय करू शकतो हे तुम्हाला कळेल, तो फक्त बोलत नाही, करून दाखवतो.”

त्यांच्या ह्या प्रत्युत्तरानंतर योगींच्या सुलतानपूर जिल्ह्यातील एका सभेमध्ये कार्यकर्त्यांनी चार बुलडोझर आणून उभे केले आणि जणू बुलडोझरला समर्थन असल्याचे दाखवले. बस्स…तो फोटो वायरल झाला आणि बुलडोझर बाबा हे योगींचे कुजबुजले जाणारे नाव त्यांचे समर्थक अभिमानाने घेऊ लागले.

एवढेच नाही मंडळी तर एका दिवसांत त्यावर गाणी सुद्धा तयार झाली. खोटं वाटतंय? मग हे गाण पहाचं!

तर मंडळी अशी आहे ही बुलडोझर बाबा नावामागची कहाणी!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

D Vishal