पद्मनाभस्वामी मंदिराच्या तळघरातील एका खोलीचे रक्षण करतात साप, नेमकं त्यात आहे तरी काय?

सर्वोच्च न्यायालयाने या गुप्त खजिन्याची नोंद करण्यासाठी सात सदस्यांची टीम नियुक्त केली. या टीमने खजिन्याचा शोध सुरू केल्यानंतर त्यांना सहा खोल्या सापडल्या आणि त्यांना त्यांनी ए, बी, सी, डी, ई आणि एफ असे नाव दिले.


केरळची राजधानी असलेले तिरुवअनंतपुरम हे जगातील सर्वांत श्रीमंत देवस्थानांपैकी एक असून तेथे पद्मनाभस्वामी मंदिर आहे. मंदिरात ६ तिजोऱ्या आहेत आणि त्यापैकी एक तिजोरी (कोठडी) अजूनही बंद आहे. मंदिराच्या या बंद दरवाज्यामगील रहस्य जाणून घेऊया.

तिरुवअनंतपुरम हे नाव भगवान विष्णूच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. याचा शब्दशः अर्थ ‘भगवान अनंताचे शहर’ (साक्षात परमेश्वराचे शहर) असा आहे. या मंदिरातील मुख्य देवता म्हणून ओळखले जाणारे पद्मनाभ स्वामी हे भगवान विष्णूच्या नाभीतून फुललेल्या कमळावर बसलेले असून भगवान ब्रह्मदेवाच्या (निर्मात्याच्या) उदयाचे वर्णन करतात. म्हणून, पद्मनाभ स्वामी हे नाव, ‘पद्म’ म्हणजे कमळ, ‘नाभ’ म्हणजे नाभी आणि ‘स्वामी’ म्हणजे भगवान यातून निर्माण झाले आहे. येथील पद्मनाभ स्वामी हे पाच डोक्यांच्या नागावर (शेषनागावर) आडवे बसलेल्या ( अनंत शयनम म्हणजेच शाश्वत झोपेची अवस्था) मुद्रेत दिसून येतात.

या मंदिरातील बी नावाच्या गुप्त आणि गूढ तिजोरीमुळे किंवा पारंपारिकपणे निलावरस किंवा कल्लारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिजोरीमुळे हे मंदिर अनेकदा चर्चेत असते.

त्यामागील एक किस्सा असा की, निवृत्त आयपीएस अधिकारी सुंदरराजन यांनी मंदिराच्या या बेहिशेबी तिजोरीचा आढावा घेण्यासाठी २०११ मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे, सर्वोच्च न्यायालयाने या गुप्त खजिन्याची नोंद करण्यासाठी सात सदस्यांची टीम नियुक्त केली. या टीमने खजिन्याचा शोध सुरू केल्यानंतर त्यांना सहा खोल्या सापडल्या आणि त्यांना त्यांनी ए, बी, सी, डी, ई आणि एफ असे नाव दिले.

परंतु या खोल्यांचे दरवाजे उघडणे कठीण काम झाले होते. तथापि, या तिजोऱ्यांमधील मौल्यवान वस्तू शोधण्याचे कार्य चालू असताना, त्यांना सोने, हिरे आणि इतर मौल्यवान रत्ने तसेच दगडांच्या मूर्ती आणि १ लाख कोटी रुपयांच्या मौल्यवान धातूंचे सिंहासन सापडले. परंतु, वॉल्ट बी किंवा कल्लारा बी अस्पर्शित राहिले कारण जो कोणी ते उघडण्याचा प्रयत्न करेल तो दुर्दैवाला आमंत्रण देईल असा सर्वांचा समज झाला होता. हा समज अधिक दृढ झाला, जेव्हा तिजोरी उघडल्यानंतर काही आठवड्यांत याचिकाकर्त्याचा अकाली मृत्यू झाला.

लोकांमध्ये असा समज आहे की, व्हॉल्ट बी चे रक्षण साप, कांजिरोट्टू यक्षी नावाचे लोककथित पिशाच्च आणि इतर अलौकिक देवता करतात. असेही मानले जाते की ते तिजोरीचे रक्षक आहेत आणि कोणीही त्याचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला तर त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल.

काही शतकांपूर्वी, जेव्हा मंदिर व्यवस्थापनाने कल्लारा बी उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना लाटांचे आवाज ऐकू आले आणि ते रहस्यमय आणि भितीदायक वाटत असल्याने, ते मागे हटले आणि त्यांनी ते उघडण्याचा निर्णय मागे घेतला.

त्यानंतर १९३० च्या दशकात, दरोडेखोरांच्या टोळीने जेव्हा मंदिर लुटण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना त्यांच्या दिशेने साप येताना दिसले.
प्राचीन काळातील संतांनी शक्तिशाली ‘नागा पासम’ मंत्राचा जप करून दरवाजे बंद केले आहेत असे मानले जाते, आणि केवळ अचूक ज्ञान असलेला पुजारीच गरुड मंत्राचा जप करून दरवाजे उघडू शकतो. त्यामुळे एखादी व्यक्ती व्हॉल्ट बी च्या बंद दारांमागे काय लपले आहे याचा फक्त विचारच करू शकतो.

पद्मनाभ स्वामी मंदिराबाबत काही इंटरेस्टिंग बाबी सुद्धा आहेत. पद्मनाभ स्वामींच्या मूर्तीचा आकार एवढा अवाढव्य आहे की, भक्त तीन दरवाजातून त्यांचे दर्शन घेतात. पहिल्या दारातून देवतेचे मस्तक दिसते, मध्यभागी असलेल्या दारातून भक्ताला भगवंताच्या नाभीतून फुललेले कमळ आणि शेवटच्या दरवाजातून त्यांचे पाय दिसतात. हे मंदिर कदाचित अशा देवस्थानांपैकी एक आहे जेथे भगवान विष्णू त्यांच्या पत्नी, देवी लक्ष्मी (श्री देवी म्हणूनही ओळख असणाऱ्या) तसेच भू देवी (पृथ्वीची देवी) सोबत दिसतात. या देवतेचे आणखी एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे भगवान विष्णूंचा उजवा हात शिवलिंगावर आहे.

Source: gqindia.com

विशेष म्हणजे, मुख्य मूर्ती ही नेपाळमधील गंडकी नदीतून गोळा केलेल्या १२,००८ शीलग्रामांपासून बनलेली आहे आणि ती कतुसरकरा योगम नावाच्या आयुर्वेदिक पेस्टने झाकलेली आहे जी देवतेचे संरक्षण करते, असे मानले जाते.

वरील देवतांच्या मूर्तींशिवाय, भृगु मुनी आणि मार्कंडेय मुनी (कटुसारकापासून बनवलेले), गरुड (भगवान विष्णूचे वाहन), नारद (भगवान विष्णूचे परम भक्त), तंबुरू (एक आकाशीय संगीतकार), सूर्य (आकाशीय संगीतकार) सूर्य देव), चंद्र (चंद्र देव), सप्तर्षी (सात ऋषी), मधु आणि कैतभा (दोन राक्षस) यांच्या मूर्ती देखील आढळतात.

हे मंदिर त्रावणकोरच्या राजघराण्याने इसवी सन सहाव्या शतकात बांधले होते असे मानले जाते आणि त्यांचे सध्याचे वंशज हे आता मंदिराचे विश्वस्त आहेत. मंदिराच्या लक्षणीय आर्किटेक्टरमध्ये द्रविड आणि चेरा शैलीचे मिश्रण आहे. मंदिराचे सात-स्तरीय गोपुरम दक्षिण भारतातील प्राचीन वास्तुकलेची भव्यता दर्शवते. मंदिराची रचना तिरुवत्तर येथील श्री आदिकेसवपेरुमल मंदिरासारखी आहे परंतु भगवान पद्मनाभ स्वामींचे मूळ स्थान हे (किंवा मुख्य आसन) कासारगोड जिल्ह्यातील अनंतपुरा मंदिरात असल्याचे मानले जाते.

काय मग, अशा या अद्भुत आणि आगळ्यावेगळ्या मंदिराला तुम्ही कधी भेट देताय?


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

Gayatri Gurav