पंडित नेहरू खरंच स्त्रीलंपट होते? काय आहे या फोटों मागचं सत्य?

‘पंडित नेहरू हे स्त्रीलंपट होते’ असे वक्तव्य करून पंडित नेहरूंची अनेक छायाचित्रे काही अति कट्टर विरोधकांनी प्रसिद्ध केली. सोशल मिडीयाच्या जमान्यात असल्या गोष्टी आगीसारख्या वायरल होतात आणि झालेची तसेच, पण खरंच त्यामध्ये काही तथ्य होते का?


पंडित जवाहरलाल नेहरू एक असे राजकीय व्यक्तिमत्त्व ज्यांच्या उल्लेखाशिवाय भारतीय स्वातंत्र्यलढा आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतरचा काळ अपूर्ण आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान ही नेहरूंची सर्वात प्रमुख ओळख! आजही शाळेमध्ये पंडित नेहरूंचे धडे दिले जातात, त्यांची कार्ये सांगितली जातात. पण जस जसे आपण मोठे होते आणि राजकीयदृष्ट्या अधिक प्रगल्भ होतो तेव्हा आपली मते विभागली जातात. कधी कधी ही मते पक्षानुसार विभागली जातात तर कधी कधी विचाधारेनुसार!

आता देखील जी पिढी प्रगल्भ झाली आहे ती सुद्धा दोन गटात विभागली गेली आहे. एक गट आहे उजव्या विचारसरणीचा आणि एक गट आहे डाव्या विचारसरणीचा आणि याच विचारसरणीनुसार भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू सुद्धा विभागले जातात.

डाव्या विचारसरणीचा गट म्हणतो की पंडित नेहरू हे महान होते आणि त्यांनी जी काही पाउले उचलली ती भारतासाठी योग्य होती. तर उजव्या विचारसरणीचा गट नेहरुंना जास्त महान मानत नाही आणि त्यांच्या मते अनेक बाबतीत नेहरू कमी पडले. दोन्ही गट आपापल्या बाजूने योग्य असतीलही, पण कधी कधी टीका करण्याच्या नादात अशा गोष्टींची चिखलफेक होते की त्यामुळे व्यक्तीचे चारित्र्य कलंकित होते आणि हीच गोष्ट विरोधी गटाकडून मध्यंतरी पाहायला मिळाली.

‘पंडित नेहरू हे स्त्रीलंपट होते’ असे वक्तव्य करून पंडित नेहरूंची अनेक छायाचित्रे काही अति कट्टर विरोधकांनी प्रसिद्ध केली. सोशल मिडीयाच्या जमान्यात असल्या गोष्टी आगीसारख्या वायरल होतात आणि झालेची तसेच, पण खरंच त्यामध्ये काही तथ्य होते का? तर नाही मंडळी.

 जी छायाचित्रे प्रसिद्ध करून आरोप केले गेले त्या सर्व छायाचित्रांमागची कहाणी काही वेगळीच होती आणि आज तीच खरी बाजू आपण जाणून घेणार आहोत.

हा फोटो पहा. या फोटोकडे पाहताक्षणी असा गैरसमज होऊ शकतो की कोणीतरी तरुणी नेहरुंना किस करते आहे आणि नेहरुंचा देखील त्या गोष्टीला विरोध दिसून येत नाही. पण या छायाचित्रामागचे सत्य हे आहे की ही तरुणी कोणी अनोळखी नसून पंडित जवाहरलाल नेहरूंची भाची नयनतारा सेहगल आहे.

हे छायाचित्र १९५५ सालचे आहे जेव्हा पंडित नेहरू ब्रिटनच्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हा विमानतळावर नयनतारा सेहगल आपली आई  विजयलक्ष्मी पंडित हिच्यासह नेहरूंचे स्वागत करायला गेली होती.

पंडित नेहरूंचे स्वागत करताना तेथील रिवाजाप्रमाणे विजयलक्ष्मी पंडित यांनी नेहरुंना किस केले आणि त्याच वेळी नयनतारा सेहगलने देखील मागून येऊन आपल्या मामाला मिठी मारत किस करून त्यांचे स्वागत केले.

आता या दुसऱ्या छायाचित्रामध्ये अजून एक स्त्री नेहरुंना किस करताना दिसत आहेत. पण मंडळी ही स्त्री आहे जवाहरलाल नेहरूंची बहिण विजयलक्ष्मी पंडित अर्थात नयनतारा सेहगल यांची आई.

Source : bbc.com

हे छायाचित्र १९४९ सालचे आहे जेव्हा विजयलक्ष्मी पंडित अमेरिकेमध्ये भारताच्या राजदूत होत्या  आणि विमानतळावर त्यांचे स्वागत करायला तेथे आल्या होत्या. तेव्हाही त्यांनी रिवाजाप्रमाणे गालावर किस करून त्यांचे स्वागत केले.

नेहरूंचे संपूर्ण घराणे उच्चभ्रू होते आणि त्यांच्या घरात पुढारलेले वातावरण होते. शिवाय ते व त्यांच्या कुटुंबातील अनेक जण विदेशातून खूप काळ राहिल्याने तेथील संस्कृतीचा त्यांच्यावर प्रभाव पडणे साहजिक आहे. त्यामुळे भाचीने मायेने आपल्या मामाचे चुंबन घेणे यात काही गैर नाही. त्यामुळे त्या काळी सुद्धा या छायाचित्रावरून कोणताही गदारोळ झाला नव्हता. कारण सर्वांनाच त्या दोघांमधील नाते माहित होते.

अजून एक छायाचित्र या सोबत वायरल झाले ते म्हणजे नेहरूंच्या ओठात सिगारेट आहे आणि ते अजून एका स्त्रीला सिगारेट पेटवून देत आहेत. हे छायाचित्र दाखवून नेहरू अय्याश होते असा अपप्रचार सुरु केला गेला. पण या छायाचित्रामागे सुद्धा कहाणी आहे.

Source : bbc.com

नेहरू हे धुम्रपान करायचे ही गोष्ट तेव्हा जगजाहीर होती. त्या काळी अनेक मोठ्या व्यक्ती धुम्रपान करायच्या. अनेकांना असा गैरसमज आहे की नेहरू हे चेन स्मोकर होते पण नाही, नेहरू दिवसाला २-३ सिगारेटच ओढायचे. विशेष म्हणजे ते धुम्रपानावेळी फिल्टर वापरायचे.

हे छायाचित्र होमाई व्यारावाला या भारतातील पहिल्या महिला प्रेस फोटोग्राफरने काढले होते, जेव्हा त्यांना नेहरुंसोबत ४५ मिनिटांचा विमान प्रवास करायला मिळाला होता. तेव्हा त्या वेळी विमानात तत्कालीन ब्रिटीश डेप्युटी हाय कमिशनर यांच्या पत्नी मिसेस सिमॉन सुद्धा होत्या. त्यांनाच पंडित नेहरू सिगारेट पेटवून देत होते.

पाहिलंत मंडळी? सोशल मिडीयावर शेअर केली जाणारी प्रत्येक गोष्ट खरीच असते असे समजू नका. त्यामागची सत्यता एकदा पडताळून पहा.

आज आपण पंडित नेहरुं विषयीचे गैरसमज दूर केले, असेच आपण कधीतरी एखाद्या उजव्या विचारसरणीच्या नेत्याबद्दल प्रचलित असलेले गैरसमज सुद्धा दूर करू. म्हणजे आम्ही एकांगी आहोत असा आमच्या विरोधात अपप्रचार होणार नाही!


One Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

D Vishal