रेल्वेच्या डब्ब्यांवर असणाऱ्या ‘ह्या’ आकड्यांमागे लपला आहे मोठा अर्थ!

अजून एक महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला असायला हवी LHB कोच बद्दल. या कोचवर हा विशिष्ट नंबर लिहिल्यावर C हे अक्षर सुद्धा टाकण्यात येतं. असं का?


रेल्वे ही आपल्या भारतीयांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. कुठेही लांबच्या गावी जायचे असले तरी सर्वात स्वस्त आणि आरामदायी प्रवास म्हणून रेल्वेकडेच पाहिले जाते. भारतीय रेल्वे सुद्धा आपल्या कुवतीप्रमाणे प्रवाश्यांना उत्तम सेवा देण्यात यशस्वी ठरते. तुम्ही सुद्धा अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल आणि तुमच्या मनात सुद्धा हा प्रश्न अनेकदा आला असेल की, “ट्रेनच्या डब्ब्यांवर काही नंबर लिहिलेले असतात. त्यांचा नेमका अर्थ काय?”

Source : ytimg.com

तुमच्यापैकी अनेकांना याबद्दल माहिती असेलही, पण अनेक लोक आजही असे आहेत ज्यांना याचे गौडबंगाल उमगलेले नाही. तर आज या लेखाच्या माध्यमातून आपण याच नंबर मागची उकल सोडवणार आहोत. का बरं देत असतील हे विशिष्ट नंबर? चला जाणून घेऊ.

आपण हे खालील छायाचित्र पाहू. यात जी रेल्वे आहे त्याच्या डब्ब्यावर दिसत असलेला पाच आकडी नंबर आहे – ०८४३७

आता आपण या क्रमांकांच्या एका एका भागाचा अर्थ जाणून घेऊ. तर पहिले जे दोन आकडे आहेत ते आकडे हा रेल्वे कोच कोणत्या वर्षी तयार झाला ते दर्शवतात. आता या नंबरकडे पाहता हा कोच २००८ साली तयार झाला आहे.

उरलेले आकडे हा कोच कोणत्या प्रकारचा आहे ते दर्शवतात.  हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला रेल्वेच्या कोड्सची यादी माहित असायला हवी. ती खालीलप्रमाणे आहे –

  • ००१ – ००५ : एसी फर्स्ट क्लास
  • ०२६ – ०५० : कॉम्पोसीट फर्स्ट एसी + एसी-टू टायर
  • ०५१ – १०० : एसी-टू टायर
  • १०१ – १५० : एसी-थ्री टायर
  • १५१ – २०० : सीसी (एसी चेअर कार)
  • २०१ – ४०० : एसएल (सेकंड क्लास स्लीपर)
  • ४०१ – ६०० : जीएस (जनरल सेकंड क्लास)
  • ६०१ – ७०० : सेकंड एस (सेकंड क्लास सिटींग / जनशताब्दी चेअर कार)
  • ७०१ – ८०० : एसएलआर
  • ८०१ + : पॅन्ट्री कार, वीपीयु, आरएमएस मेल कोच, जनरेटर, कार इत्यादी.

पुढील तीन आकड्यांचा अर्थ तुम्हाला या यादीमधून कळेल. आपल्या वरील छायाचित्रामधील उरलेले तीन आकडे आहेत – ४३७! म्हणजे हा कोच जनरल सेकंड क्लास प्रकारातला आहे.

यामध्ये अजून एक महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला असायला हवी LHB कोच बद्दल. या कोचवर हा विशिष्ट नंबर लिहिल्यावर C हे अक्षर सुद्धा टाकण्यात येतं. असं का?

तर मंडळी C हे अक्षर त्या कोचला CBC कप्लर जोडलेले असल्याचे दर्शवते. कधी कधी काही कोच वर तुम्हाला AB अक्षर दिसेल. ज्याचा अर्थ आहे या कोचला एयर ब्रेक जोडलेला आहे.

तर मंडळी आता रेल्वेने कधी प्रवास केला तर आजूबाजूला कोणाला ही माहित नसेल तर त्यांना समजावून सांगा आणि थोडा भाव खा की!


One Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

D Vishal