बाळासाहेब वाजपेयींसमोर म्हणाले, “हे कसलं येडझंव नाव?”

बाळासाहेबांची भाषणे ही स्ट्रेसबस्टर आहेत. तुम्हाला फक्त युट्युबला जाऊन ‘Balasaheb Thackeray Comedy Speech’ एवढं सर्च करायचं आहे.


बाळासाहेब ठाकरे एक नेता म्हणून, एक ज्वलंत राजकारणी म्हणून अख्ख्या देशालाच नाही तर जगाला परिचित आहेत. पण या करारी विचारांमागे आजच्या भाषेत एक मिश्कील स्टँडअप कॉमेडीयन लपला होता असे म्हटले तरी वावगे ठरू नये. असं का म्हणून विचारताय? अहो कारण बाळासाहेबांची भाषणे!

बाळासाहेबांची भाषणे ही स्ट्रेसबस्टर आहेत. तुम्हाला फक्त युट्युबला जाऊन ‘Balasaheb Thackeray Comedy Speech’ एवढं सर्च करायचं आहे. अहो तुम्हाला अशी अशी भन्नाट भाषणे अनुभवायला मिळतील की तुम्ही स्वत:च म्हणाल, “आज स्वत:ला Standup Comedians म्हणवून घेणारे बाळासाहेबांसमोर किस झाड की पत्ती!”

कारण Standup Comedians हे स्क्रिप्ट बनवून मग ती सादर करतात, पण बाळासाहेब उत्स्फूर्त होते. जे त्यांच्या मनात त्या क्षणाला यायचं त्या क्षणी ते बोलून मोकळे व्हायचे आणि सर्वांना हसवायचे. तसे तर तुम्हाला बाळासाहेबांचे भाषणातील असे बरेचे किस्से बघायला मिळतील आणि कोणताच किस्सा हा कमी अधिक नाहीये. सगळेच बेस्ट आहेत हे विशेष!

खास करून विरोधकांची ते अशी काही उलटी सुलटी फिरकी घ्यायचे कि खुद्द त्या विरोधकाला सुद्धा हसू आवरायचे नाही. तर आज आम्ही तुम्हाला बाळासाहेबांचा एक खास किस्सा सांगणार आहोत, जो ऐकून तुम्ही बाळासाहेबांच्या क्रियेटीव्हीटीला आणि हजरजबाबीपणाला नक्कीच दाद द्याल. तर ही घटना घडली १९९६ साली! शिवसेना नेते मधुकर सरपोतदार हे तेव्हा लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उत्तर विभागामधून उभे होते. सगळीकडे प्रचारसभा आणि भेटींना उत आला होता. निवडणूक एकत्र लढणारे युतीतील पक्ष अर्थात शिवसेना आणि भाजपचे नेते या निवडणुकीसाठी सर्व शक्ती पणाला लावत होते.

तर मधुकर सरपोतदार यांच्या एका जाहीर सभेसाठी थेट अटल बिहारी वाजपेयी तसेच प्रमोद महाजन हे भाजप नेते येणार होते. पण आकर्षणाचे केंद्रबिंदू होते बाळासाहेब आणि त्यांचे भाषण! कधी एकदा बाळासाहेब भाषण सुरु करतात अशी उत्सुकता सगळ्यांना लागली होती. शेवटी तो क्षण आला आणि बाळासाहेबांनी आपले भाषण सुरु केले. त्यांच्या पहिल्या शब्दापासूनच टाळ्यांचा कडकडाट सुरु झाला. मधुकर सरपोतदार यांच्या विरोधात उभे होते कॉंग्रेसचे उमेदवार रिझवी! बाळासाहेबांनी भाषण सुरु केल्यावर हळूहळू त्यांची गाडी विरोधी पक्षाच्या दिशेने आली.

आता बाळासाहेब मस्त टोले हाणणार हे श्रोत्यांनी देखील हेरले आणि झाले देखील तसेच! बाळासाहेब म्हणाले, ““रि-टेक ऐकलंय. रि-कंस्ट्रक्शन ऐकलंय. पण हे कसलं यडझवं नाव? रि-झवी?”

एक सेकंद बाळासाहेबांनी घेतलेली ही शाब्दिक फिरकी अनेकांना कळलीच नाही, पण जेव्हा कळली तेव्हा सगळ्यांचीच हसून हसून पुरेवाट झाली. तेव्हा सभेला उपस्थिती असलेल्या प्रमोद महाजनांना तर अजिबातच हसू आवरत नव्हते. त्यांच्या बाजूला अटलबिहारी वाजपेयी बसले होते. वाजपेई हे राष्ट्रीय नेते आणि मराठी मध्ये बाळासाहेबांनी गुंफलेली ही शाब्दिक माळ त्यांच्या थोडी डोक्यावरूनच गेली. सगळे का हसतायत हे काही त्यांना कळेना. त्यांच्या बाजूला भाजप नेत्या जयवंतीबेन मेहता बसल्या होत्या.

त्यांनी जयवंतीबेन यांच्या कानात विचारलं, “हे सगळे का हसतायत? नक्की झालंय काय?”

जयवंतीबेन मेहता यांना मराठी कळत असल्याने त्यांना बाळासाहेबांचा हा डबल मिनिंग जोक कळला. पण आपल्या वरिष्ठ नेत्याला, ते सुद्धा एक पुरुषाला हा जोक आता सांगायचा कसा ही पंचायत जयवंतीबेन यांची झाली. त्यांच्या चेहरा अगदी ओशाळला. वाजपेयींना देखील हे काहीतरी विचित्र प्रकरण इथे घडलं आहे याची जाणीव झाली असावी आणि ते सुद्धा शांत बसले. तर दुसरीकडे प्रमोद महाजन, अन्य नेते आणि श्रोते नुसते हसतच सुटले होते.

नंतर वाजपेयींना नक्कीच काय घडले हे प्रमोद महाजनांनी समजावून सांगितले असणार आणि ते सुद्धा हात जोडून म्हणाले असतील, “बाळासाहेबांचा नाद नाय.”


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

D Vishal