दोन्ही पाय नसतानाही ‘माउंट एव्हरेस्ट’ सर करणारी आधुनिक झाशीची राणीची!

रात्रभर रेल्वे येत जात होत्या. रुळांखालील उंदीर तिचे पाय, केस कुरतडत होते. रेल्वेतील मलमूत्र तिच्या चेहऱ्यावर, अंगावर पडत होतं.


परवा केरळ एक्सप्रेसमध्ये दिल्लीहून सकाळी अकरा वाजता बसलो. आवडती साईड लोवर सीट मिळाली होती. गाडी झांशी शहराबाहेर काही मिनिटांसाठी थांबली. समोर उंचावर झांशीचा किल्ला खिडकीतून दृष्टीसमोर होता. खिडकीच्या बाहेर रुळांजवळ छोटंसं तळं होतं. सूर्यास्त व्हायला पाऊण एक तास बाकी असेल. सूर्य झांशीच्या किल्ल्याच्या मागे दडत होता. त्या पिवळ्या केशरी प्रकाशात, चमकणाऱ्या पाण्याच्या मागे किल्ला अंधारात राकट काळा दिसत होता.

इतर कोणत्याही दिवशी समोर किल्ला दिसत असता तर  मी मनाने, कल्पनेने राणी लक्ष्मीबाईने किल्ल्यावरून कशी अश्वउडी घेतली असेल याची कल्पना मी करत राहिलो असतो. पण त्या दिवशी झांशीच्या किल्ल्याकडे बघताना एका वेगळ्याच ‘व्यक्तीची’ आठवण मला येत होती. त्याच व्यक्तिबद्दल माझ्या मनात आदल्या दिवशीपासून विचार सुरू होते. मित्राला ‘त्या’ व्यक्तीबद्दल एक वाक्य ही बोललो होतो..आणि काय आश्चर्य डोळ्यासमोर तेव्हा झांशीचा किल्ला होता. गाडी थांबलेलीच होती. डोळ्यासमोर व्यक्ती येत होती ती “अरुणिमा सिन्हा”.

23 वर्षाची ही नॅशनल व्हॉलीबॉल खेळाडू मुलगी 12 एप्रिल 2011ला घरून दिल्लीला नोकरीच्या मुलाखतीसाठी निघाली. सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊन घरातून निघताना तिच्या घरच्यांना किंवा तिलाही कल्पना नव्हती नियतीने तिच्यापुढे काय वाढून ठेवलंय. लखनऊहुन ती पद्मावती एक्सप्रेसमध्ये जनरल डब्यात चढली. रात्री डब्यात काही तरुण हातात चाकू घेऊन डब्यात घुसले. सगळयांना धमकावून जे मिळेल ते लुटू लागले. कोणत्याही प्रवाशाने विरोध केला नाही.

तिच्या गळ्यात सोन्याची चेन होती. ते दरोडेखोर तिच्याजवळ आलेत. एकाने तिला चेन देण्यासाठी दरडावले. दुसरा तिच्या गळ्यापाशी हात नेऊ लागला. तीने विरोध केला. ती म्हणाली, ”मैं अपनी चेन नही दुंगी!” ती विरोध करू लागली. एकाने तिच्या पोटावर लाथ मारली. तिच्या गळ्यातील चेन ओढून घेतली. पण ते पिसाळले होते. कोणीही विरोध करत नसताना एक मुलगी आपल्याला विरोध करतेय हे त्यांना पचलं नाही. ट्रेन भरधाव सुरू होती. त्या नीच उलट्या काळजाच्या लोकांनी तिला ओढत दरवाज्यापाशी नेले आणि भरधाव वेगातील रेल्वेतुन बाहेर ढकलून दिले.

रात्रीची वेळ..ती जोराने आदळली. कंबरेपासून पायाचे  हाड मोडलेत. चेहऱ्यावर जखमा..ती जिथे आदळली त्याला लागून दुसरा रेल्वेमार्ग होता. दुसऱ्या ट्रॅकवरील रुळांवर तिचा पाय होता. तिने उठायचा प्रयत्न केला. पण ती उठू शकली नाही. पाय हलत नव्हता. समोरून एक रेल्वे त्याच ट्रॅकवरून येत होती. ती तिच्या पायांवरून गेली. रात्रभर रेल्वे येत जात होत्या. रुळांखालील उंदीर तिचे पाय, केस कुरतडत होते. रेल्वेतील मलमूत्र तिच्या चेहऱ्यावर, अंगावर पडत होतं. बऱ्याच वेळानंतर तिची शुद्ध हरपली.

एका प्राथमिक आरोग्य केंद्रात तिला भरती करण्यात आलं आहे. हे तिला जाणवलं. सकाळी कोणालातरी ती ट्रॅकवर पडलेली, भेसूर अवस्था झालेली दिसली. तिचा पाय कापण्याचा निर्णय झाला. तिच्या समोर तिचं व्हॉलीबॉल करिअर संपताना तिला दिसत होतं. “सर अपने पास क्लोरोफॉम नही है!” तिच्या कानी कोणाचेतरी शब्द पडलेत. लवकरात लवकर, विष पूढे जाण्यापूर्वी पाय कापणं गरजेचं होतं. तिने डॉक्टरांना स्वतः सांगितलं “मी रात्रभर इतक्या वेदना सहन केल्या आहेत की आता मी हे सुद्धा सहन करू शकते. तुम्ही क्लोरोफॉर्मशिवाय माझा पाय कापा..!”

तिचा पाय कापण्यात आला. क्लोरोफॉमशिवाय. त्याही वेदना सहन केल्या तिने. काय मानसिक अवस्था झाली असेल तिची त्या वेळी! शारीरिक वेदना तर सहन करण्यापलीकडे होत्या. त्यानंतर तिला दिल्लीत एम्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. या काळात मीडियाने अत्यंत नीच आरोप करत तिलाच दोषी ठरवू लागले. “अरुणिमाकडे तिकीट नव्हतं म्हणून तिनेच बाहेर उडी मारली” अश्या बातम्या वर्तमानपत्रात, न्यूज चॅनल्सवर आल्यात.

ती आतून तुटत होती..मरत होती. त्यावेळी तिने एम्स हॉस्पिटलमध्ये स्वतःपुढे एक विलक्षण एम ठेवलं.  आयुष्यातील सगळ्यात मोठी खेळी खेळण्याचं ठरवलं! तिने ठरवलं “माउंट एव्हरेस्ट” सर करण्याचं! सगळयांनी तिला मूर्खात काढलं. अरुणिमा या अपघातामुळे ठार वेडी झालीये लोक म्हणू लागले. सामान्य लोकांना, हिशोबी, सुरक्षित जगणाऱ्यांना हे माहिती नसतं की वेडे लोकच इतिहास घडवतात. क्रांती घडवतात. वेगळी पाऊलवाट तयार करतात.

अरुणिमा सिन्हाला कृत्रिम पाय लावण्यात आला. ती हॉस्पिटलमधून भावासोबत बच्छिन्द्री पाल यांना बिहारमध्ये भेटायला गेली. “बच्छिन्द्री पाल” या प्रथम भारतीय स्त्री माउंट एव्हरेस्टवीर आहेत. त्यांनीही तिला प्रथम विरोध केला. पण अरुणिमाची जिद्द बघून त्या म्हणाल्या ,” तू आधीच तुझ्या मनात एव्हरेस्ट सर केलंय! आता फक्त लोकांना ते दाखवायचं शिल्लक आहे! त्यांनी तिला पूर्ण पाठिंबा दिला. भारतात एकूण चार केंद्र सरकार आणि संरक्षण मांत्रालयाखाली येणारे पर्वतारोहन केंद्रे आहेत. येथील प्रशिक्षण किती कडक आहे हे ट्रेकिंग ग्रुप्स सोबत मजा मस्ती करायला, सेल्फी काढायला जाणाऱ्या लोकांना कळू शकणार नाही.

या चारमध्येही सगळयात कडक आणि कठीण दोन केंद्रे, दार्जिलिंगचं आणि उत्तरकाशीचं जवाहरलाल नेहरू पर्वतारोहन केंद्र . अरुणिमाची रवानगी उत्तर काशीच्या केंद्रात झाली. अत्यंत कठीण ,कडक प्रशिक्षण सुरू झालं. चालताना ती सगळ्यांच्या मागे राहायची कारण मध्येच पाय मांडीतून निघून जायचा. तिला खूप उशीर होऊ लागला. ती तीन ते चार तास उशीर व्हायचा.  पायातून रक्त यायचं.

या केंद्रात एक नियम असतो, संध्याकाळी प्रशिक्षण आटोपल्यावर प्रत्येकाला स्वतःच्या पायाचे निरीक्षण करायला सांगितलं जातं. कारण पायाला बारीक फोड ज्यांना ‘ब्लिस्टर्स’ म्हणतात, ते आले असतील तर प्रशिक्षण बंद करायला सांगतात. कारण ते खूप धोक्याचं, सेप्टिक होण्याचा धोका आणि वेदनादायी असतं. अरुणीमा सिन्हाच्या पायातून तर रक्त येत होतं. ती सतत मांडीतून कृत्रिम पाय काढायची, रक्त पुसून पुढे चालायची. तिने दुसऱ्या दिवसापासून ठरवून टाकलं की काहीही होवो आता पाय काढून बघायचा नाही. वेदना सहन करत चालत, हळूहळू तिची प्रगती होऊ लागली. जबरदस्त इच्छाशक्तीच्या बळावर ती प्रथम येऊ लागली. सगळेजण थक्क झालेत तिच्या इच्छाशक्तीपुढे.

“अरुणिमा तुम क्या खाती हो?” विचारू लागलेत. अरुणिमाचं एक महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झालं. परीक्षा A ग्रेडने पास झाली. आता लक्ष होतं ‘एव्हरेस्ट’. या पृथ्वीवरील सगळ्यात उंच जागा! टॉप ऑफ द वर्ल्ड! “टाटा स्टील”कडून तिला प्रायोजकत्व मिळाले. आणि अरुणिमा निघाली नेपाळकडे. काठमांडुला पशुपतीनाथाचं दर्शन घेऊन दुसऱ्या  दिवसापासून तिची चढाई सुरू झाली. शेर्पा तिच्या मदतीला होता. पण जेव्हा त्याला अरुणिमाच्या पायाबद्दल कळलं, त्याने एका अपंग मुलीसोबत जाण्यास नकार दिला. अरुणिमाने विनवण्या करून शेर्पाला राजी केले. ती म्हणाली तुम्हाला कुठेही जाणवणार नाही की तुम्ही एका अपंग मुलीसोबत चाललाय.

काही दिवसांच्या चालण्यानंतर, संकटं झेलत ,मृत्यूच्या दाढेतुन वाचत ती शिखरापासून काही मिनिटांवर येऊन पोहचली. रस्त्यात अनेक प्रेते दिसलीत. तेव्हा तिच्या समोर एक जर्मन पर्वतारोही पाय घासून मरताना दिसला. एका ठिकाणी बर्फावर रक्त सांडलेलं दिसलं. पुनः काही प्रेते दिसलीत. त्या सर्व प्रेतांना ओलांडून ती समोर गेली आणि शेवटी एव्हरेस्ट शिखर सर केलं..

एप्रिल 2011ला तिचा अपघात झाला आणि 21 मे 2013ला सकाळी 10 वाजून 55 मिनिटांनी ती पृथ्वीवरील सर्वात उंच जागेवर उभी होती. शी वॉज अॅक्च्युअली ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. पण…पण अजूनही एक फार मोठं संकट बाकी होतं. तिचा प्राणवायू संपत आला होता. तिला जाणीव झाली होती की  ती जिवंत परत जाऊ शकणार नाही. म्हणून किमान जगाला आपला व्हिडीओ दिसावा म्हणून  तिने शेर्पाला कॅमेराने तिला चित्रित करायला सांगितलं.

Source : bbci.co.uk

शेर्पा तिच्यावर प्रचंड चिडला. आणि मला तुझ्यासोबत मरायचं नाहीये असं म्हणाला. कारण परिस्थिती खूप बिकट होती. शिखरावर भयानक वेगाने वारे वाहत होते. लवकरच वादळ येणार होतं. आणि सगळ्यात मोठं संकट म्हणजे प्राणवायू संपत होता. पण तिची जिद्द बघून तो शेर्पाही नतमस्तक झाला. तो म्हणाला, “अरुणिमा आता मी मेलो तरीही चालेल पण तुला एकटं सोडणार नाही! तुला जिवंत परत खाली घेऊन जाईन!” वेगाने ते परतीला निघाले. पण तिचा कृत्रिम पाय सतत मांडीतून निखळत होता. त्यामुळे तिला चालताना खूप त्रास होत होता. पण तिची शर्यत लागली होती मृत्यूबरोबर! तोही वेगाने तिच्या मागे येत होता. तिला बाद करण्यासाठी. झडप घालण्यासाठी.

तिच्या डोळ्यातुन अश्रू येत होते..उंच ठिकाणी चालताना तोंडात लाळ निर्माण होत असते. तिच्या तोंडातील लाळ खाली पडताना ‘टक’ असा आवाज येई, कारण खाली पडेपर्यंत त्याचा बर्फ होत होता. अश्रूही खाली ओघळताना बर्फ होत होते. तिचा हात काळा निळा पडला होता. फ्रॉस्ट बाईट, बर्फ बाधा म्हणतात. हातसुद्धा कापावा लागणार होता. पण ती जिवंत राहिली तर..! चालता येत नव्हतंच. शेवटी तिने एक भयंकर निर्णय घेतला, तिने पाय काढून टाकला..आणि तशीच स्वतःला घासत चालू लागली. एका हातात स्वतःचा एक पाय..काय दृश्य असेल ते! देव जगात असेल तर तो ही इतक्या उंचावर ,’जवळून’ तिला बघत असेल तर त्यानेही तोंडात बोट घातलं असेल!

एव्हरेस्ट मोहिमे दरम्यान सगळ्यात जास्त मृत्यु हे  परत येताना होत असतात. त्या क्षणी अरुणिमाकडे फक्त काही मिनिटांचा प्राणवायू शिल्लक होता. दोघांनाही माहिती होतं आता तिचा मृत्यू अटळ. आणि नेमका तेव्हा एक ब्रिटिश पर्वतवीर जास्तीचा प्राणवायू सिलेंडरसोबत दिसला. त्याला त्या सिलेंडरचं वजन होत असल्याने त्याने तो सिलेंडर तिथेच टाकून दिला. शेर्पा धावत तिथे गेला, सिलेंडर अर्ध भरलं होतं. त्याने ते प्राणवायूचं सिलेंडर आणून अरुणिमाच्या पाईपला जोडलं. अरुणिमाला पुनर्जीवन मिळाले. अरुनिमा सिन्हाला 2015 मध्ये ‘पद्मश्री’ने गौरविण्यात आले.

मी आदल्या रात्री एका कार्यक्रमात प्रत्यक्ष अरुणिमा सिन्हाला ऐकून, बघून आलो होतो. तेव्हा मी मित्राला ओरडून म्हणालो , “ही आजच्या काळातील झाशीची राणी आहे!” त्यावेळी संध्याकाळी मी झाशीच्या किल्ल्यासमोर होतो. खिडकीतून बघत होतो. पण डोळ्यासमोर राणी लक्ष्मीबाई येत नव्हती. दिसत होती ती आजच्या काळातील झाशीची राणी, एव्हरेस्टवीर, पद्मश्री अरुणिमा सिन्हा! अरुणिमा सिन्हा हे जिवंत उदाहरण आहे सकारात्मकतेचं..जिद्दीचं..विलक्षण इच्छा शक्तीचं..

वाईट लोकांनी तिला अपंग केलं. तिने भारतातील कृत्रिम पायाने एव्हरेस्ट सर केलेली प्रथम व्यक्ती, हा इतिहास, रेकॉर्ड करून दाखवला. या दिव्य स्त्रीला साष्टांग नमस्कार! दंडवत! टेक अ बाव लेडी!


0 Comments

Your email address will not be published.

Choose A Format
Personality quiz
Series of questions that intends to reveal something about the personality
Trivia quiz
Series of questions with right and wrong answers that intends to check knowledge
Poll
Voting to make decisions or determine opinions
Story
Formatted Text with Embeds and Visuals
List
The Classic Internet Listicles
Countdown
The Classic Internet Countdowns
Open List
Submit your own item and vote up for the best submission
Ranked List
Upvote or downvote to decide the best list item
Meme
Upload your own images to make custom memes
Video
Youtube, Vimeo or Vine Embeds
Audio
Soundcloud or Mixcloud Embeds
Image
Photo or GIF
Gif
GIF format