भारतात भारतीयांनाच बंदी! तुम्ही ‘ह्या’ ठिकाणी डायरेक्ट जाऊ शकत नाही!

भारतात काही ठिकाणे आहेत जिकडे जाण्यासाठी चक्क भारतीयांना तिकडील सरकारी अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते.


होय, हे खरं आहे. जसे परदेशात जाण्यासाठी आपल्याला पासपोर्ट, व्हिसा या गोष्टींची आवश्यकता असते तसेच भारतात काही ठिकाणे आहेत जिकडे जाण्यासाठी चक्क भारतीयांना तिकडील सरकारी अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. या परमिटला ‘इनर लाईन परमिट (ILP) असे म्हणतात. या परमिट शिवाय भारतातील काही ठिकाणी अगदी भारतीयांना देखील प्रवेश दिला जात नाही.

या अशा परवानग्या भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ असणाऱ्या संवेदनशील ठिकाणांना भेट देण्यासाठी असतात. त्या भागात असणाऱ्या लोकांच्या हालचाली नियंत्रित ठेवण्यासाठी तसेच तेथे राहणाऱ्या आदिवासींच्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी आणि चुकीचे प्रकार घडण्यापासून कमी करण्यासाठी ही परवानगी घेण्याची अट असते. भारतात अशी काही सुंदर स्थळे आहेत जिथे भेट देण्यासाठी एखाद्याला परवानगी (ILP) घेण्याची आवश्यकता असते.

चला तर मग जाणून घेऊया अशीच काही ठिकाणे आणि तिकडे प्रवेश करण्यासाठी लागणाऱ्या परवानगी विषयी:

अरुणाचल प्रदेश

भारतातील उत्तर पूर्वेकडील प्रदेश नेहमीच भारतातीलच नव्हे तर परदेशी पर्यटकांसाठी देखील आकर्षक केंद्रबिंदू ठरला आहे. तेथील निसर्गाचे सौंदर्य डोळ्यांचे पारणेच फेडून टाकते. या प्रदेशाला ‘सेव्हन सिस्टर्स’ असेही नाव दिले गेले आहे. याच सेव्हन सिस्टर्ट्सपैकी एक म्हणजे अरुणाचल प्रदेश. नयनरम्य पर्वतरांगा, सुंदर रस्ते आणि शांत तलाव यांचे घर असलेलं अरुणाचल प्रदेश सर्वांसाठीच एक आकर्षण बनले आहे. २६ आणि त्यापेक्षा जास्त आदिवासी बांधव अरुणाचल प्रदेशात स्थायिक आहेत. अरुणाचल प्रदेशची सीमा म्यानमार, भूतान आणि चीनशी जोडलेली आहे. त्यामुळे, हा परिसर संवेदनशील मानला जातो आणि याच कारणामुळे तेथे स्थायिक नसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या अप्रतिम ठिकाणाला भेट देण्यासाठी इनर लाइन परमिट (ILP) बंधनकारक आहे. ज्यांना कोणाला अरुणाचल प्रदेशातील सौंदर्य अनुभवायचे आहे त्यांना नवी दिल्ली, कोलकाता, गुवाहाटी आणि शिलाँग येथील निवासी आयुक्त तसेच, अरुणाचल प्रदेश सरकारकडून तेथील संरक्षित क्षेत्रांसाठी परमिट मिळू शकते. सिंगल e-ILP किंवा ग्रुप e-ILP साठीचा खर्च प्रति व्यक्ती १०० रुपये इतका जास्तीत जास्त 30 दिवसांसाठी असतो. तसेच, एखादी व्यक्ती हे परमिट ऑनलाइन देखील मिळवू शकते.

नागालँड

नागालँड हे उत्तर पूर्वेकडील दुसरे सर्वांत सुंदर राज्य आहे. नागालँडची सीमा पूर्वेला म्यानमारशी जोडली गेलेली आहे. तसेच, हे राज्य सुमारे १६ आदिवासी जमातींचे निवासस्थान आहे, जे त्यांच्या स्वत: च्या म अद्वितीय आहेतच आणि त्यांची स्वतःची वेगळी भाषा, चालीरीती आणि बरेच काही आहे. ज्यांना या ठिकाणाला भेट द्यायची आहे, त्यांना येथे भेट देण्यासाठी इनर लाइन परमिट आवश्यक आहे. हे परमिट कोहिमा, दिमापूर, नवी दिल्ली, मोकोकचुंग, शिलाँग आणि कोलकाता येथील उपायुक्तांकडून मिळू शकते. अन्यथा, हे परमिट ऑनलाइन देखील मिळवू शकता.

मिझोराम

मिझोराम हे देखील उत्तर पूर्वेकडील खूप सुंदर असे राज्य आहे. ह्या राज्याचे नाव ‘मिझो’ मूळ राहिवाश्यांचे स्वतः वर्णन केलेले नाव आणि ‘राम’ म्हणजे मिझो भाषेतील अर्थ जमीन वरून तयार केले आहे. म्हणजेच ‘मिझोराम’चा अर्थ आहे ‘मिझोची भूमी’. मिझोरामची सीमा म्यानमार आणि बांग्लादेशला लागून आहे. येथे देखील अनेक आदिवासी जमाती राहतात. या सुंदर स्थळाला भेट देण्यासाठी, तुमच्याकडे इनर लाइन परमिट असणे अनिवार्य आहे. हे परमिट तुम्ही मिझोराम सरकारच्या संपर्क अधिकारी, सिल्चर, कोलकाता, गुवाहाटी, शिलाँग आणि नवी दिल्ली येथून मिळवू शकता. तथापि, जे लोक विमानाने राज्यात प्रवेश करतील त्यांना लेंगपुई विमानतळ, आयझॉल येथे आगमन झाल्यावर सुरक्षा अधिकाऱ्याकडून विशेष पास मिळू शकतो. दोन प्रकारचे ILP येथे उपलब्ध आहेत; एक तात्पुरता परमिट आहे, जो १५ दिवसांसाठी वैध आहे. तर, दुसरा नियमित परमिट आहे ज्याची वैधता सहा महिन्यांची आहे.

सिक्कीममधील काही संरक्षित क्षेत्रे

सिक्कीम हे उत्तर पुर्वेकडीलच एक राज्य आहे. सिक्कीम राज्याची सीमा भूतान, तिबेट आणि नेपाळ यांना जोडलेली आहे. जर सिक्कीममधील दुर्गम संरक्षित क्षेत्रांना किंवा सर्वोच्च बिंदूंना भेट द्यायची असेल, तर तुम्हाला परवानगीची आवश्यक असेल. अहवालानुसार, प्रवाशांना नाथुला पास टूर, त्सोमगो-बाबा मंदिर ट्रिप, झोंगरी ट्रेक, सिंगलिला ट्रेक, युमेसामडोंग, गुरुडोंगमार लेक ट्रिप, युमथांग – झिरो पॉइंट ट्रिप आणि थांगू-चोपटा व्हॅली ट्रिपसाठी परवानग्या आवश्यक आहेत. हे परवाने पर्यटन आणि नागरी विमान वाहतूक विभागाकडून जारी केले जातात आणि बागडोगरा विमानतळ आणि रंगपो चेकपोस्टवर मिळू शकतात. स्पेशल परमिटची व्यवस्था करण्यासाठी टूर ऑपरेटर किंवा ट्रॅव्हल एजंटचीही मदत घेऊ शकता.

लक्षद्वीप

लक्षद्वीप हा भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. हा अरबी समुद्रातील ३६ बेटांचा एक द्वीपसमूह आहे. पर्यटकांना लक्षद्वीपला भेट देण्यासाठी परमिट आवश्यक आहे. कारण, भारतीय केंद्रशासित प्रदेश नंदनवन बेटाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतो. परमिट मिळविण्यासाठी, तुम्हाला तुमच्या सर्व ओळखीच्या कागदपत्रांसह (पर्सनल आयडेंटिटी कार्ड्स) तुमच्या परिसरातील पोलिस स्टेशनचे क्लिअरन्स प्रमाणपत्र बंधनकारक असते. परमिट मिळाल्यानंतर, ते लक्षद्वीपमधील स्टेशन हाउस ऑफिसरकडे जमा करावे लागते आणि मग लक्षद्वीपला प्रवेश मिळतो. फारसा त्रास न होता ऑनलाइन परमिटही मिळू शकते.

तर मंडळी या ठिकाणी जाण्याचा प्लान करत असाल तर सर्वात आधी परमीट मिळवण्याकडे लक्ष द्या आणि मगच प्लान बनवा!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

Gayatri Gurav