‘पवारांनी पाठीत खंजीर खुपसला’ हा आरोप सतत का केला जातो? काय केलं होतं पवारांनी?

वसंतदादा पाटील, शरद पवार या मंडळींने यशवंतरावांसोबत रेड्डी कॉंग्रेसमध्ये जाणे पसंत केले, तर नासिरराव तिरपुडेंसारखे नेते इंदिरा कॉंग्रेसमध्येच राहीले.


शरद पवार यांच्या उल्लेखाशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत संभाषण घडूच शकत नाही हे प्रत्येक जण मान्य करेल आणि पवारांची राजकीय खेळी हा तर अभ्यासाचा विषय आहे. आता हेच पहा कोणी स्वप्नातही विचार केला नसेल की  एका रात्रीत शिवसेना युतीकडे  सपशेल पाठ फिरवून, राष्ट्रवादीशी हात मिळवणी करुन, मुख्यमंत्री पद पदरी पाडून घेईल. पवारांशिवाय असे घडणे कदापी शक्य नव्हते बरं. आता ही बाब योग्य की अयोग्य या भानगडीत न पडलेलेच बरे. पवारांची खेळी कामी आली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे झाले याहीपेक्षा फडवणीसांची ‘मी परत येईल’ ची घोषणा वाऱ्यावरच विरली याची चर्चा जोमात झाली होती.

Source : tosshub.com

असो पण हे काही पहिल्यांदाच घडले नव्हते.. जेव्हा स्वतः शरद पवार वयाच्या ३८व्या वर्षी मुख्यमंत्री बनले होते, तेव्हा त्यांना सर्वात कमी वयाचा मुख्यमंत्री होण्याचा मान तर लाभला  पण तो काय इतक्या सहजासहजी नाही. तेव्हाही राजकारणामध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. तेव्हा पवारांनी पुरोगामी लोकशाही दल म्हणजेच पुलोदची स्थापना करुन राज्यातले पहिले आघाडी सरकार स्थापन केले. 

त्यावेळी शरद पवारांनी पाठीत खंजीर खुपसला अशी टीका त्यांच्यावर करण्यात आली होती. कारण वसंतदादा पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचे सरकार पाडणे ही बाब सोपी नव्हती. मात्र तरुण वयात पवारांनी नवं सरकार स्थापन करुन त्यांचे राजकारणातले चातुर्य सिध्द करुन दाखविले.

महाराष्ट्रात आणीबाणी नंतर पुलोद सरकार कसे स्थापन झाले? याबाबत अभ्यास केला तर जाणवते की या सरकारची पाळंमुळं जी आहेत ती आणीबाणीत आणि त्यानंतर कॉंग्रेस पक्षाचे जे विभाजन झाले त्यामध्ये आहेत. यातूनच या सरकारचा जन्म झाला. १९७७ च्या विधानसभा निवडणूकी नंतर जी राजकीय अस्थिरता आली आणि हीच परिस्थिती पवारांच्या राजकीय कारकीर्दीकरिता पोषक ठरली.

1971 च्या निवडणूक प्रचारात सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग केल्याप्रकरणी, १२ जून १९७५ रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद उच्च न्यायालयाने, इंदिरा गांधी यांना दोषी ठरविले. त्याचबरोबर ती निवडणूक रद्द करुन त्यापुढील सहावर्षांसाठी इंदिरा गांधी यांना निवडणूक लढविण्यावरही बंदी घातली. परिणामी देशभरातून इंदिरा गांधींना कडाडून विरोध झाला. त्याचे पडसाद संपूर्ण देशात उमटले. पण इंदिरा गांधी सहज बधणाऱ्या नव्हत्या. खरं तर इंदिरा गांधींविरोधात जागोजागी निषेध दर्शविण्यात आले.

गांधीवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्त्वाखाली मोठे आंदोलन सुरु झाले. जयप्रकाश नारायणांच्या लोकसंघर्ष समितीच्या छत्राखाली वेगवेगळे राजकीय पक्ष एकवटले. अखेर इंदिरा गांधींनी आणीबाणी देशभरात लादली. नेत्यांचे अटक सत्र सुरु झाले. परिणामी राजकीय नेतेच नाही तर सामान्य जनतेही आणीबाणीला कडाडून विरोध केला. संपूर्ण देशाचे राजकारणाचे, समाजकारणाचे चित्रच पालटले.  त्यानंतर २१ मार्च १९७७ ला आणीबाणी मागे घेण्यात आली व देशात लोकसभा निवडणूका घेण्यात आल्या.

या निवडणुकीत कॉंग्रेसचा मोठा पराभव झाला. महाराष्ट्रात तर कॉंग्रेसचे फक्त २० खासदार निवडून आले. एकूणच विचार करता आणीबाणीनंतर कॉंग्रेस फुटली. इंदिरा गांधीनिष्ठ आणि कॉंग्रेस पक्षनिष्ठ असे दोन गट पडले. अर्थातच त्याचा  फार मोठा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर झाला.

देशपातळीवर यशवंतराव चव्हाण आणि ब्रम्हानंद रेड्डी यांनी इंदिरा गांधींचे नेतृत्त्व नाकारले आणि ‘रेड्डी क्रॉंग्रेस’ची स्थापना केली. यशवंतराव चव्हाण हेच संस्थापक आहे म्हटल्यावर सहाजिकच शरद पवार रेड्डी क्रॉंग्रेसमध्ये गेले. महाराष्ट्रातही त्यामुळे दोन गट पडले. वसंतदादा पाटील, शरद पवार या मंडळींने यशवंतरावांसोबत रेड्डी कॉंग्रेसमध्ये जाणे पसंत केले, तर नासिरराव तिरपुडेंसारखे नेते इंदिरा कॉंग्रेसमध्येच राहीले.  कॉंग्रेसमध्ये पडलेल्या या फुटीमुळे महाराष्ट्रातल्या राजकारणातली समिकरणं संपूर्णतः बदलली. परिणामी १९७८च्या विधानसभेत त्याचे पडसाद पहायला मिळाले.

Source : thequint.com

१९७८ मध्ये झालेल्या या निवडणुकीत कॉंग्रेसच्या या दोन्ही गटांचा दारूण पराभव झाला आणि जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरला मात्र बहुमत मिळविण्यास अपयशीच ठरला. एकूणच काय तर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीत दोन्ही कॉग्रेस गट एकत्र आले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली. ७ मार्च १९७८ रोजी रेड्डी कॉंग्रेसचे वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाची तर इंदिरा कॉंग्रेसच्या नासिकराव तिरपुडे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हेच महाराष्ट्रातले पहिले आघाडी सरकार. तत्कालीन मंत्रीमंडळात शरद पवार हे उद्योग मंत्री होते. मात्र हे सरकार फार काळ काही टिकले नाही. दोन्ही कॉंग्रेस गटांमध्ये आपापसात कुरबुरी वाढल्या आणि हे सरकार पडले.

१९७८ साली पावसाळी आधिवेशन सुरु असताना शरद पवारांनी ४० आमदारांना घेऊन पक्षाला रामराम केला आणि सरकारमधून बाहेर पडण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यावेळी सुशीलकुमार शिंदे, सुंदरराव सोळंके आणि दत्ता मेघे सारख्या मंत्र्यांनीही पवारांना साथ दिली. परिणामी वसंतरावांचे सरकार गडगडले. 

या घटनेने तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राचे राजकीय वर्तुळ हादरले होते. कारण हि अत्यंत अनपेक्षित घटना होती. वसंतरावांचा पवारांनी असा घात करणं चुकीचं होतं असं म्हटलं गेलं, तर काहींनी राजकीय भविष्यासाठी योग्य गोष्ट केली असेही मत मांडले. तर मंडळी हीच ती राजकीय खेळी ज्यामुळे शरद पवारांनी कॉंग्रेसच्या आणि वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला ही टीका झाली आणि आजतागायत त्याच घटनेचा दाखला देऊन पवारांवर पाठीत खंजीर खुपसण्याचा आरोप वेळोवेळी केला जातो.

बाहेर पडल्या नंतर पवारांनी समाजवादी कॉंग्रेसची स्थापना केली आणि चक्क जनता पक्षाची हातमिळवणी करुन पुरोगामी लोकशाही दलाचे सरकार स्थापन केले. पुलोदची स्थापना करणे ही पवारांची उत्तम राजकीय खेळी ठरली. त्याचमुळे शरद पवार वयाच्या अवघ्या ३८व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशातील स्वातंत्र्योत्तर काळातील पहिले तरुण मुख्यमंत्री ठरले. उपमुख्यमंत्रिपद हे सुंदरराव सोळंके यांना सोपविण्यात आले, तर शंकरराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, गोविंदराव आदिक, दत्ता मेघे, सदानंद वर्दे, भाई वैद्य यांसारखे नेते पुलोद सरकारमध्ये मंत्री होते. हे सरकार जेमतेम पावणेदोन वर्षेंच तग धरु शकले. मात्र या सरकारने घेतलेले मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा ठरावाबाबतचा निर्णय, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता लागू करण्याबाबत निर्णय आजही आधोरेखित केले जातात.

याच काळात केंद्रामध्ये मोठे राजकीय बदल झाले, पुन्हा एकदा इंदिरा गांधींचे सरकार प्रस्थापित झाले. त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. हे घडत असताना इकडे जनता पक्षातही फूट पडली. परत राजकीय अस्थिरता निर्माण झाली. महाराष्ट्रातल्या खासदारांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना महाराष्ट्रातले सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आणि १७ फेब्रुवारी १९८० रोजी इंदिरा गांधींच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी पवारांचे पुलोद सरकार बरखास्त करण्यात आले आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली.

Source : wikipedia

यानंतर १९८० ला झालेल्या निवडणूकीत पवारांच्या कॉंग्रेसचा पराभव झाला  आणि इंदिरा गांधींच्या मर्जीतले बॅरिस्टर अंतुले यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली. त्यानंतर सहा वर्ष पवारांच्या समाजवादी कॉंग्रेसने विरोधी पक्षाचे काम केले.  मग १९८७ साली शरद पवारांनी राजीव गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली परत एकदा इंदिरा कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आणि एक वर्तुळ पूर्ण झाले.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *