एक अशी मर्डर केस ज्यामुळे राज ठाकरेंचे राजकीय करियरच संपले असते!

शीला यांनी आरोप केला की, “माझ्या पतीच्या मृत्यूमागे राज ठाकरे यांचाच हात आहे आणि आता सर्व मॅनेज केले जात आहे.”


राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात लाडके व्यक्तिमत्त्व, खास करून तरुणांमध्ये त्यांची जी क्रेझ आहे ती अजून कमी झालेली नाही. त्यांची हीच क्रेझ नव्वदच्या दशकात सुद्धा होती. शिवसेना पक्षाच्या विविध शाखा जसे की कामगार सेना आणि विद्यार्थी सेना यांची जुळवाजुळव आणि वृद्धी राज ठाकरे यांनीच केली. तेव्हाही सबंध महाराष्ट्रामधील युवक हे बाळासाहेबांनंतर राज ठाकरे यांचाच आदेश पाळायचे. बाळासाहेबांचे उत्तराधिकारी हे राज ठाकरेच असणार याची एव्हाना सर्वांना खात्री पटलीच होती. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते आणि १९९६ साल राज ठाकरे यांच्यासाठी घातक ठरले आणि यामुळे केवळ राज ठाकरेच नाही तर अख्खी शिवसेना गोत्यात आली होती.

Source : dnaindia.com

झाले असे की १९९६ साली पुण्याच्या अलका थियेटरमध्ये रमेश किणी नावाच्या मध्यमवर्गीय इसमाचा मृतदेह आढळला. पोस्टमार्टम मध्ये आकस्मिक मृत्यू म्हणून याची नोंद करण्यात आली. मात्र रमेश किणी यांच्या पत्नी शीला किणी यांनी एक खळबळजनक दावा केला आणि त्या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे वादळ उठले. विरोधकांना आयती संधी मिळाली आणि सत्तेमधील शिवसेना-भाजप दोन्ही पक्ष हादरले.

शीला यांनी आरोप केला की, “माझ्या पतीच्या मृत्यूमागे राज ठाकरे यांचाच हात आहे आणि आता सर्व मॅनेज केले जात आहे.”

पण त्यांनी हा आरोप का केला? राज ठाकरे यांचे या प्रकरणात नाव कसे आले? तर माटुंग्याच्या लक्ष्मी निवास ह्या तीन मजली इमारती मध्ये रमेश किणी आणि त्यांची पत्नी शीला हे पगडी सिस्टमने राहत होते. इमारतीचा जो मूळ मालक होता लक्ष्मीचंद शहा त्याचा मुलगा सुमन शहा याला ही जागा डेव्हलप करायची होती आणि त्यासाठी लक्ष्मी निवास पाडावे लागणार होते. सुमन शहा याने किणी दाम्पत्याला खूप आमिषे दिली, खूप समजावले. पण रमेश किणी यांनी घर सोडण्यास नकार दिला आणि प्रकल्पाला विरोध केला.

Source : rediff.com

शीला किणी यांच्या मते, सुमन शहा हा राज ठाकरे यांच्या जवळचा होता. तेव्हा सत्ता सुद्धा शिवसेनेची होती. त्यामुळे घर खाली करण्यासाठी खूप दबाव आणला जात होता. एक दिवस अचानक रमेश किणी बेपत्ता झाले आणि त्यांचा मृतदेह थेट पुण्यात आढळून आला.

विरोधकांसाठी हे प्रकरण सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी चांगले शस्त्र होते. त्यांनी आवाज उठवला. बाळासाहेब ठाकरे यांच्या वर पुतण्याला वाचवण्याचे आरोप झाले. शिवसेनेचे सर्व नेते गप्प होते. यावर कुठेच काहीही स्पष्टीकरण मिळत नव्हते. राज ठाकरे निर्दोष आहेत हेच सतत सांगितले जात होते. प्रकरण जास्त वाढल्याचे पाहून बाळासाहेबांनी तेव्हा मी शिवसेना सोडतो अशी इच्छा जाहीर केली. तेव्हाचा काळ संपूर्ण शिवसेनेसाठी कठीण होता. कारण राज ठाकरे कोणी छोटे नेते नव्हते. बाळासाहेबांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. शिवाय बाळासाहेब त्यांचे काका, त्यामुळे पूर्ण ठाकरे घराणे या प्रकरणात गोवलं गेलं होतं.

अखेर सीबीआय तर्फे राज यांची चौकशी करण्यात आली आणि २९ ऑगस्ट १९९७ साली सीबीआयने किणी प्रकरणात एक चार्जशीट दाखल केली. त्यात विद्यार्थी सेनेचे नेते आशुतोष राणे, जमीन मालक लक्ष्मीचंद शहा आणि सुमन शहा यांच्या वर रमेश किणी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र त्यात राज यांचे नाव नव्हते. राज यांना सीबीआयने क्लीन चीट दिली होती.

Source : amazonaws.com

राज यांनी क्लीन चीट नंतर प्रतिक्रिया दिली की, “हे होणारच होते. आम्ही आधीपासूनच सांगत होतो की माझा या प्रकरणाशी संबंध नाही. आता सीबीआयने स्वत: क्लीन चीट दिली आहे तर सगळ्यांना सत्य कळले असेलच.”

पुढे २००२ साली कोर्टात असे निष्पन्न झाले की रमेश किणी यांचा मृत्यू नैसर्गिकच होता. कोर्टाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. रमेश किणी हे मृत्युच्या एक दिवस आधी ‘सामना’ कार्यालयात आले होते असे आरोप केले गेले. पण त्यातून देखील काही निष्पन्न झाले नाही.

१५ मार्च २०११ रोजी रमेश किणी यांच्या पत्नी शीला किणी यांचा माटुंगा येते राहत्या घरात मृत्यू झाला. हे प्रकरण कित्येक वर्षांपूर्वी कायद्याच्या दृष्टीने संपले असले तरी रमेश किणी प्रकरण राज ठाकरे यांचा पिच्छा काही सोडत नाही. काही वर्षांपूर्वी खुद्ध उद्धव ठाकरे यांनी किणी प्रकरणावरून राज यांना चिमटा काढला होता.

एका सभेत छगन भुजबळ यांनी जाहीरपणे ‘राज यांचाच किणी प्रकरणात हात होता’ या आशयाचे वक्तव्य करून नव्याने वाद सुरु केला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान सुद्धा भाजप तर्फे राज यांच्या विरोधात किणी प्रकरण बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला.

Source : assettype.com

राज ठाकरे असे नेते आहेत ज्यांच्या विरोधात काहीच आरोप नाही. फक्त हा एकमेव असा आरोप आहे जो त्यांच्या चारित्र्यावर काळ्या डागाप्रमाणे चिकटून बसला आहे. याच प्रकरणानंतर त्यांची शिवसेनेवरील पकड कमी झाली आणि हळूहळू ते शिवसेने पासून दुरावत गेले.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

Shraddha More