संपूर्ण जग ज्या देशाला ‘मसीहा’ समजतं त्याच देशाने स्वार्थासाठी तालिबानला जन्म दिला!

अमेरिकेचा हा निर्णय तत्कालीन अफगाणिस्तान सरकारला मान्य नव्हता, ना जनतेला मान्य होता. अफगाणी नागरिकांना आशा होती की अफगाणी सैन्य तालिबान्यांशी लढेल. पण असं काहीच घडले नाही.


तालिबान….एक असे नाव ज्यांच्यामुळे अफगाणिस्तान सारखा शांतीचे स्वर्गीय सुख उपभोगणारा देश नरकाच्या छायेत लोटला गेला. एक अशी छाया जी तालीबानच्या जन्मापासून कमीच झालेली नाही, उलट वाढतच चालली आहे. कधीकाळी ज्या देशात मस्त गाणी गात, दोन मेहनतीचे घास पोटात ढकलत लोकं जगत होती आणि हा प्रदेश कधीच सोडून जाणार नाही असं म्हणत होती आज तोच देश त्याच लोकांना नकोसा झालाय. त्याला कारण म्हणजे एकच….तालिबान!

Source : bbci.co.uk

ही गोष्ट सुरु होते 1978 च्या आधीपासून. त्या काळी सोव्हिएत युनियन म्हणजेच आताच्या रशियन सत्तेने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला होता. आपला देश स्वतंत्र व्हावा, ही भूमी आपलीच राहावी, येथे सत्ता आपलीच असावी या भावनेतून अनेक देशप्रेमी आणि धर्मप्रेमी संघटना त्या काळात निर्माण झाल्या आणि त्यांनी सोव्हिएत युनियन विरोधात लढा देण्यास सुरुवात केली. त्यापैकी एक प्रमुख संघटना होती अफगाण मुजाहिद्दीन! तालिबानची ज्यांनी स्थापना केली ते सर्व नेते पूर्वी याच अफगाण मुजाहिद्दीनच्या खांद्याला खांदा लावून अफगाणिस्तानात लढत होते. वर्षे मागे पडत होती, सोव्हिएत युनियन सुद्धा या कट्टर संघटनांना दाबण्याचा प्रयत्न करत होते.

ही गोष्ट पाहून पाकिस्तान चिंतेत पडला कारण अफगाणिस्तान नंतर सोव्हिएत पाकिस्तानवर कब्जा करेल अशी त्यांना भीती होती. सौदी अरेबियाला सुद्धा अफगाणिस्तानचा मिनी रशिया होऊ द्यायचा नव्हता. तिकडे अमेरिकेचाही कोल्ड वॉर मुळे सोव्हिएत युनियन वर राग होताच. तेव्हा या तीन देशांच्या नजरेत तालिबान नावाची संघटना आली. यांच्या सहाय्याने सोव्हिएत युनियनला कायमचे हद्दपार करायचे हा विचार ठरला आणि शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या पद्धतीने पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि अमेरिका या तिघांनी मिळून तालिबानला जे हवं ते पुरवलं. पैश्यापासून शस्त्रांपर्यंत, मिलिटरी ट्रेनिंग पासून राजकीय फायद्यांपर्यंत हवं ते दिलं आणि या तीन देशांनीच खऱ्या अर्थाने तालिबानला जन्माला घातलं.

तालिबानची स्थापना दक्षिण अफगाणिस्तानात मुल्ला मोहम्मद ओमर या पश्तून कबिल्याच्या नेत्याने केली होती. हा अफगाण मुजाहिद्दीनचा कमांडर सुद्धा होता. कंदाहार मध्ये अवघ्या ५० साथीदारांच्या सहाय्याने त्याने तालिबानची विचारधारा मांडली. पश्तून भाषेत तालिबानचा अर्थ होतो विद्यार्थी! एक असा विद्यार्थी जो इस्लाम धर्म आणि इस्लाम राष्ट्र निर्माणासाठी तयार झाला आहे. हळूहळू सोव्हिएतने अफगाणिस्ताना मधून माघार घेण्यास सुरुवात केली आणि हीच वेळ आपल्या उदयाची आहे हे ओळखून तालिबान अधिक हिंसक झाले, एव्हाना त्यांना पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि अमेरिकेचाही सपोर्ट मिळाला होता. त्याच जोरावर त्यांनी हळूहळू आसपासच्या प्रदेशांवर कब्जा करण्यास सुरुवात केली.

तो १९९४ चा काळ होता. संपूर्ण अफगाणिस्तानात तालिबानचे नाव होऊ लागले. आम्ही देशात शांतता आणण्यासाठी लढतोय असा प्रसार ते करू लागले. हळूहळू तालिबानने अफगाणिस्तानावर कब्जा केला. कधी काळी प्रमुख संघटना असलेली अफगाण मुजाहिद्दीनही त्यांच्या समोर फिकी पडली. युद्धाने कंटाळलेल्या अफगाणी नागरिकांना तालिबान मध्ये नवीन आशा दिसली. सुरुवातीला तालिबान्यांची असलेली सुधारणावादी प्रतिमा हळूहळू बदलली आणि त्यांनी पूर्ण अफगाणिस्तानात शरिया कायदा राबवण्यास सुरुवात केली.

Source : qz.com

हा शरिया कायदा काय? तर कुरणात सांगितलेली जीवनशैली! असे नियम जे प्रत्येक इस्लाम धर्मियाने पाळणे बंधनकारक असते. या शरीया कायद्यात अनेक जाचक नियम असले तरी त्याचा सर्वाधिक फटका हा स्त्रियांनाच बसतो. या कायद्यानुसार वयाच्या ८ व्या वर्षीपासून प्रत्येक स्त्रीला बुरखा घालणे अनिवार्य असते. कुठेही सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही स्त्रीचे फोटोज लावण्यास परवानगी नसते. स्त्रियांना बाहेर जायचे असल्यास सोबत एक पुरुष असणे बंधनकारक असते. स्त्रियांना कोणतेही शिक्षण घेण्यास, नोकरी करण्यास बंदी असते. चित्रपट, म्युजिक यांवर सुद्धा बंदी असते. पुरुषांना देखील काही नियम पाळावे लागतात जसे की पुरुषांना केवळ पारंपारिक वेशातच वावरावे. इस्लाम धर्मानुसार दाढी ठेवावी लागते. असे अजून कैक नियम आहेत आणि हे जर मोडले तर भररस्त्यात फासावर लटकवणे, दगडांनी ठेचून मारणे यांसारख्या शिक्षा दिल्या जातात. एकंदर हे शरिया कायदा अत्यंत भयानक प्रकरण आहे.

२००१ पर्यंत तालिबान्यांनी धर्मरक्षणाच्या नावाखाली अफगाणिस्तानावर अनन्वित अत्याचार केले. पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती हे तीन देश अशा स्थितीत सुद्धा तालिबान्यांना सपोर्ट करत होते. कधीकाळी तालिबानला जन्माला घालणारा अमेरिका मात्र तालिबानच्या वाढत्या वर्चस्वामुळे आणि अतिरेकी कारवायांमुळे चिंतेत होता.

११ सप्टेंबर २००१ रोजी ओसामा बिन लादेन याने अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर वर हल्ला केला आणि या ओसामाला तालिबान्यांनी अफगाणिस्तानात आश्रय दिल्याचे अमेरिकेला कळले. जणू अमेरिका सुद्धा याच संधीची वाट पाहत होती. अमेरिकेने आपले सर्वाधिक सैन्य अफगानिस्तानामध्ये उतरवले आणि काहीच महिन्यांत तालिबानची सत्ता संपुष्टात आली. सगळे तालिबानी पाकिस्तानच्या आश्रयाला गेले. पण शांत बसतील ते तालिबानी कसले? त्यांना आता नवीन शत्रू मिळाला होता. तो म्हणजे अमेरीका! हळूहळू तालिबानने पुन्हा एकदा अन्य इस्लामिक देशांच्या मदतीने हात पसरायला सुरुवात केली. अर्थात या देशांनी कधीच उघडपणे आपण तालिबानला सपोर्ट करत असल्याचे कबूल केले नाही.

तेव्हापासून अमेरिकेने आपले मोठे सैन्य अफगाणिस्तानच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी तेथेच ठेवण्याचा निर्णय घेतला आणि अफगाणिस्तानची अधिक दुर्दशा झाली. कारण तालिबानी आणि अमेरिकन सैन्यामध्ये वारंवार छोटी मोठी युद्ध होत असतं. ज्याचा फटका सामान्य नागरिकांना सहन करावा लागायचा. तब्बल २० वर्षे अफगाणिस्तान जळत राहिला, उध्वस्त होत राहिला. यात किती सैनिक आणि निष्पाप जीव मारले गेले याची गणती सुद्धा नाही.

Source : abcnews.com

आपण अमेरिकन सैन्याला हरवू शकत नाही हे तालिबानला सुद्धा माहित होते. म्हणून त्यांनी एक धूर्त डाव खेळला. अमेरिका आणि तालिबान यांच्यात २०२० मध्ये एक शांती करार झाला, ज्यानुसार तालिबानने आपण अफगाणिस्तानात सत्तेवर येऊन शांतता प्रस्थापित करू आणि येथील दहशतवाद रोखू असा शब्द दिला, पण त्याबदल्यात अमेरिकेने आपले सगळे सैन्य माघारी घ्यावे अशी अट घातली. जो बायडन यांनी सर्वांच्या भल्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचे जाहीर करत आपले सर्व सैन्य माघारी बोलावले आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच तालिबान पुन्हा अफगानिस्तानात सक्रीय झाले आणि जे घडायला नको होते ते घडले.

अमेरिकेचा हा निर्णय तत्कालीन अफगाणिस्तान सरकारला मान्य नव्हता, ना जनतेला मान्य होता. अफगाणी नागरिकांना आशा होती की अफगाणी सैन्य तालिबान्यांशी लढेल. पण असं काहीच घडले नाही. अफगाणिस्तानाचे राष्ट्रपती देश सोडून पळून गेल्याची बातमी येताच सगळीकडे अराजकता माजली आणि अगदी अलगद अफगाणिस्तान तालिबान्यांच्या हाती आला. आता पुढे काय? ते येणारा काळच ठरवेल, पण जे काही होईल त्यात सर्वाधिक नुकसान हे सामान्य नागरिकांचेच होणार आहे!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

D Vishal