‘ह्या’ मंदिरातील प्रसाद कधीच घरी आणू नका, नाहीतर अडकाल मोठ्या संकटात!

तुम्ही स्वत: हा प्रसाद खाऊ शकत नाही किंवा दुसऱ्याला देऊ सुद्धा शकत नाही.


सगळ्यांप्रमाणे तुम्ही सुद्धा कोणत्याही देवस्थानाला भेट दिली की एक गोष्ट करत असाल ती म्हणजे तेथील देवाला चढवलेला प्रसाद घेऊन येणे आणि तो कुटुंबात आणि शेजारी पाजाऱ्यांमध्ये वाटणे. पण थांबा, भारतात एक असे देवस्थान आहे तिथे जर तुम्ही भेट दिलीत तर तेथील प्रसाद चुकून सुद्धा घरी आणू नका. एवढेच काय तर तो प्रसाद तुम्ही सुद्धा खाऊ शकत नाही. कारण आजवर ज्यांनी असे केले आहे त्यांना खूप भयानक आणि विचित्र अनुभव आले आहेत. काय आहे ही अजब गोष्ट? चला जाणून घेऊ.

तर मंडळी हे देवस्थान आहे राजस्थानच्या मेहंदीपूर मधील बालाजी मंदिर! नावावरून हे मंदिर बालाजीचे वाटेल, पण तसे नसून हे मंदिर भगवान हनुमानाला समर्पित आहे. उत्तर भारतात आजही कित्येक ठिकाणी हनुमानाला बालाजी याच नावाने संबोधले जाते.

राजस्थानमधील अत्यंत प्रसिद्ध आणि सदानकदा गर्दी असणाऱ्या या मंदिराची भेट अनेक अर्थाने विशेष ठरते. मंदिरात हनुमानाची बाल स्वरूपातील मूर्ती आहे. या मूर्तीसमोर मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम, भगवान लक्ष्मण आणि माता सीता यांच्या मुर्त्या आहेत.

या मंदिराला तुम्ही भेट देणार असाल तर एक नियम लक्षात ठेवा तो म्हणजे या मंदिरात जाण्याच्या एक आठवडा आधी दारू, मांस, कांदा आणि लसूण यांचे सेवन अजिबात करू नका. कारण पूर्वीपासूनच चालत आलेला हा अलिखित नियमच आहे.

हे मंदिर सर्वात जास्त प्रसिद्ध आहे भूत-प्रेत आणि आत्म्याच्या बंधनातून मनुष्याला मुक्त करण्यासाठी! अशी मान्यता आहे की ज्या व्यक्तीला अशी कोणती बाधा झाली आहे त्याने इथे येऊन दर्शन घेतल्यास त्या व्यक्तीवरील वाईट प्रवृत्तींची पकड ढिली होते. बस्स केवळ याच कारणामुळे वर्षभर या मंदिरात भाविकांची गर्दी दिसून येते.

भगवान हनुमानाची आराधना केल्यास पिशाच्च आणि भूत-प्रेत दूर पळतात असे अनेक ग्रंथांमध्ये लिहिले आहे. शिवाय या मंदिरात राजस्थान मध्ये ज्यांना खुप मानले जाते अशा प्रेतराज बाबा आणि भैरव बाबा यांच्या सुद्धा मुर्त्या आहेत. त्यांच्या दर्शनाने सुद्धा पिशाच्च बाधा कमी होते असा दृढ समज आहे.

दर दिवशी दोन वाजता प्रेतराज बाबाच्या गाभाऱ्यामध्ये कीर्तन केले जाते. हा सोहळा पाहण्यासारखा असतो. याच वेळी ज्यांना कोणतीही वाईट बाधा झाली आहे त्यांच्यावरची बाधा उतरवली जाते. या मंदिरात दर्शन घेतल्यावर ज्या व्यक्तीला वाईट शक्तींची बाधा झाली तो व्यक्ती काही दिवसांत ठणठणीत बरा झाल्याचे अनुभव आजही अनेक भाविक सांगतात.

Source : wordpress.com

तर अशा या आगळ्यावेगळ्या मंदिरातील प्रसाद सुद्धा घरी घेऊन जाण्यास मनाई आहे. तुम्ही स्वत: हा प्रसाद खाऊ शकत नाही किंवा दुसऱ्याला देऊ सुद्धा शकत नाही. कारण या मंदिरात भूत-प्रेत, पिशाच्च उतरवण्याची कामे केली जातात आणि असे म्हणतात की या मंदिरातच वाईट शक्ती अडकून असतात. त्यांचा वास ठिकठिकाणी असतो. मंदिरातील प्रसाद जर बाहेर घेऊन गेलात तर जो व्यक्ती प्रसाद खाईल त्यावर त्या वाईट शक्तीचा परिणाम होऊ शकतो असे जुने जाणते लोक सांगतात आणि म्हणूनच या मंदिरातील प्रसाद बाहेर घेऊन जाण्यास मनाई आहे. तो मंदिरातच देवाला चढवला जातो.

ही गोष्ट कितपत खरी खोटी हा भाग वेगळा, पण रंजक आणि अद्भुत गोष्टींची भूमी असलेल्या भारतातील अशा गोष्टी जाणून घेताना खूप मस्त वाटते, हो की नाही?


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

D Vishal