स्वातंत्र्यानंतर हिंदुस्तानाची फाळणी झाली. भारत आणि पाकिस्तान असे दोन देश विभागले गेले. ही वाटणी होती माणसांची…जमिनीची… पण आपल्या संस्कृती जपणाऱ्या ऐतिहासिक जागा तिथेच राहिल्या. आणि भारतीयांना तिथे जाऊन त्या जागा अनुभवायलाही पाबंदी लागली. आपला वारसा कायमचाच आपल्यापासून दुरावला गेला. खरंच या वाटणी मुळे दोन्हीही देशांचं खूप मोठे नुकसान झाले. अशाच एके काळी भारताची शान असलेले, आपल्या संस्कृतीची निशाणी असलेले पाच किल्ले, वाटणीमुळे पाकिस्तानला मिळाले. त्या पाच किल्ल्यांबाबत माहिती घेऊ या.
रानीकोट किल्ला
पाकिस्तानच्या सिंध प्रांतामधील जामशोरोच्या किर्थन रेज नजिक लक्की पहाडावर रानीकोट किल्ला आहे. ३२ किलोमीटर जमिनीवर हा किल्ला व्यापला असून या किल्ल्याला ‘सिंध की दिवार’ म्हणूनही ओळखले जाते. जगातला सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी रानीकोट किल्ल्याचा दुसरा क्रमांक येतो. सुमारे ५००० वर्षांपूर्वी हा किल्ला बांधण्यात आला होता, मात्र हा किल्ला नक्की कोणी बांधला याबाबत ठोस असे ऐतिहासिक पुरावे सापडले नाही. काहींच्या मते इ.सन २० च्या सुरुवातीला हा किल्ला बांधण्यात आला. तर काहींचे म्हणणे आहे की इसवी सन ८३६ मध्ये सिंधचे गव्हर्नर, पर्शियन नोबेल इमरान बीन मूसा बर्मन यांनी हा किल्ला बांधला. या किल्ल्याचे छायाचित्र पाहताच तुम्हाला हिंदुस्तानी स्थापत्य कला किती प्रगत होती यावर विश्वास बसेल.
रॉयल फोर्ट (शाही किल्ला)
१४०० फूट लांब आणि १११५ फूट रुंद असलेला हा शाही किल्ला लाहोरमध्ये आहे. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये या किल्ल्याचा समावेश करण्यात आला आहे. इसवी सन १५६० मध्ये अकबर बादशहाने २० हेक्टर जमिनीवर हा किल्ला बांधला होता. या किल्ल्यात प्रवेश करताना आलमगीर प्रवेशव्दार लागते. या प्रवेशद्वाराची निर्मिती सन १६१८ मध्ये जहांगीरने केली होती असे इतिहासात नमूद केले आहे.
रोहतास किल्ला
रोहतास किल्ला हा पाकिस्तानच्या झेलम शहरातील दीना टाऊनजवळ स्थित आहे, १६ व्या शतकाच्या सुरुवातीला, शेरशाह सूरीने पोतोहारच्या स्थानिक जमातींवर आपले राज्य प्रस्थापित करण्यासाठी या प्रदेशाचा ताबा घेतला आणि त्याभागातली बंडखोरी चिरडून टाकण्याच्या उद्देशाने हा किल्ला बांधण्याचे त्याने आदेश दिले. त्यानंतर इसवी सन १५४० ला या किल्ल्याचे बांधकाम सुरु झाले ते इसवी सन १५४७ पर्यंत किल्ल्याच्या बांधणीचे काम पूर्ण झाले. याचदरम्यान सुरी साम्राज्याची पायाभरणी करत शेरशाहने शासन करण्यास सुरुवात केली. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे, याला १२ दरवाजे असून ते बांधण्यासाठी ३० हजार कारागीर लागले होते.
अल्तीत किल्ला
गिलगिट-बाल्टिस्तान मधील हुंजा व्हॅलीच्या करीमाबाद येथे अल्तीत किल्ला आहे. हा किल्ला हुंजा राज्याच्या राजांचा किल्ला होता. या राजांना मीर म्हणून संबोधले जात. हा किल्ला सुमारे ५०० वर्षे जुना आहे. काही वर्षांपासून या किल्ल्याची जर्जर अवस्था झाली होती मात्र आगा खान ट्रस्ट आणि जपानच्या मदतीने किल्ल्याची डागडूजी करण्यात आली.
डेरावर किल्ला
डेरावर किल्ला हा पाकिस्तानातील बहावलपुर येथून डेरा नवाब साहिबपासून ४८ किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला, जैसलमेरचे राजा रजपूत राय जज्जा भाटी यांनी बांधला होता. या किल्ल्याच्या भिंती ३० फुट उंच असून त्यांची लांबी १५०० मीटर इतकी आहे.
फाळणी नंतर दोन देश वेगळे झाले खरे, दोन्ही देशांनी या फाळणीमुळे बरचं काही गमावलं. माणसं सामानासह इकडची तिकडे होऊ शकली, मात्र संस्कृतीच्या आणि इतिहासाच्या पाऊलखुणा जशाच्या तशा तिथेच राहिल्या.
Khup mast mahiti