ज्यूस सेंटरला कानिफनाथ आणि नवनाथ ही नावं असण्यामागचं गुपित दडलंय पुरंदरच्या मातीत!

कुठल्याही रसवंती गृहाचे नाव हे कानिफनाथ किंवा नवनाथ असंच असते. आणि हो नवनाथांचा ताज्या फुलांचा हार घातलेला फोटोही प्रत्येक रसवंती गृहात असतोच असतो.


जगभरात अनेक फुड ब्रॅंड प्रसिध्द आहेत. त्याच्या अनेक फ्रेंचाईझी असतात. परदेशातले Macdonald, KFC, Starbucks, CCD यांसारखे ब्रॅंडस तर आता गल्ली गल्लीत दिसू लागले आहेत. पण तुम्हाला माहित आहे का? महाराष्ट्रातल्या पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांनीही ७० वर्षांपूर्वी एक ज्युस ब्रॅंड सुरु केला होता. नाही समजलं? अहो आपलं सर्वाचंच लाडकं कानिफनाथ किंवा नवनाथ रसवंती गृह.

Source : nbstatic.in

आता हे नवनाथ- कानिफनाथ रसवंती गृह म्हटलं की डोळ्यासमोर एक चित्रच उभं राहतं. घुंगरांचा आवाज करत, विशिष्ट्य लयात सुरु असलेलं गुऱ्हाळं. टनक उसाची छोटी मोळी करुन, ती गुऱ्हाळाच्या दाभणातून आत सरकवली जाते, तसा त्या उसाच्या मोळीला पीळ पडत, मधाळ रस बाहेर पडतो.

अवचित एखादा लिंबाचा आणि आल्याचा तुकडाही दाभणात सरकवला जातो, तसा खाली ठेवलेल्या पातेल्यात मस्त असा ताजा उसाचा रस पडतो.

मग एक पांढरी शुभ्र बंडी-पायजमा घातलेले, डोक्यावर गांधी टोपी, कपाळावर भुक्का अशाच वर्णनाचे मामा, तो रस, स्वच्छ काचेच्या ग्लासमध्ये भरतात, अरे हो त्या आधी त्या ग्लासमध्ये थंडगार बर्फही टाकलेला असतो बरं. तर असे ग्लास आपल्या समोर आल्यावरच दिल थंडा हो जाता है… आणि बघता बघता कळत नकळत दोन-चार रसाचे ग्लास आपण रिचवतोच. विशेषतः उन्हाळ्यात उसाचा रस म्हणजे… आहाहा…अमृतच हो.. (उन्हाच्या काहीलीत अमृततुल्य चहा पेक्षाही या रसाची गोडी म्हणजे अवीटच).

अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे या रसवंती गृहाचे नाव आणि त्याचे फलक… तेही सगळीकडे साधारणतः सारखंच असतं. म्हणजे कुठल्याही रसवंती गृहाचे नाव हे कानिफनाथ किंवा नवनाथ असंच असते. आणि हो नवनाथांचा ताज्या फुलांचा हार घातलेला फोटोही प्रत्येक रसवंती गृहात असतोच असतो. तुम्हीही या गोष्टी नोटीस केल्याच असतील ना? मग तुम्हाला कधी प्रश्न नाही पडला की महाराष्ट्रातल्या समस्त रसवंती गृहांचे नाव हे नवनाथ किंवा कानिफनाथ का असावं? आज या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला पडलेला हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि महाराष्ट्रातल्या मातीतल्या या ब्रॅंडचीही माहिती देणार आहोत.

साधारण सत्तर ऐंशी वर्षांपूर्वी म्हणजेच १९४० ते १९५० दरम्यानची गोष्ट असावी. पश्चिम महाराष्ट्रातील पुरंदर तालुक्यात बोपगाव आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत हा पट्टा तसा दुष्काळीच. मात्र इथला शेतकरी हा जिद्दीतून पीक उभं करणारा. कमी पाणी असलं तरी हिरवं शेत पिकवणारा. त्या काळात आतासारखे साखर कारखाने वगैरे नव्हते बरं. त्यामुळे शेतात कष्टाने उभ्या राहिलेल्या उसाला म्हणावी तशी बाजारपेठ मिळत नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला कायम घोर हो. त्यातच गावातला एक धडपड्या तरुण पोटापाण्याची सोय व्हावी म्हणून मुंबईला गेला.

एकूणच त्याच्या लक्षात आलं की मुंबईतल्या लोकांना उसाचं अप्रुप फार हो. इथल्या लोकांना गावातल्या लोकांप्रमाणे सहजासहजी ऊस पाहायलाही मिळत नसे. झालं, या पठ्ठ्याला यातून उद्योगाची कल्पना सूचली. त्याने उसाचे तुकडे केले आणि ते बरणीत भरुन शेतकरी बांधवांसह दारोदारी जाऊन विकू लागला. लोकांचा प्रतिसाद चांगलाच होता.

पण मग त्यांच्यातल्याच कोणालातरी सूचलं की असं दारोदारी जाऊन ऊस विकण्यापेक्षा एका जागी दुकान टाकून त्यात ऊसाचा रस विकला तर? त्याची कल्पना जेव्हा सत्यात उतरली तेव्हा मुंबईकरांना उसाच्या रसाने वेड लावलं. उसाच्या रसाला मुंबईकरांनी अपेक्षेहून जास्त चांगला प्रतिसाद दिला. पुरंदरच्या गोड रसाळ रसाच्या चवीची भूरळ मुंबईकरांनाच नाही तर अवघ्या महाराष्ट्राला पडली. आणि पुरंदर तालुक्यातील बोपगाव, सासवड, चांबळी, बिव्हरी गावातील शेतकऱ्यांनी चक्क रसवंती गृहांची चेनच सुरु केली.

जशी भारताबाहेर मॅकडॉनल्ड, KFC वाल्यांनी सुरु केली होती ना? अगदी तशीच. मात्र त्याचे रुप आपल्या मातीची साक्ष देणारे आणि तिथे मिळणारा रसही आजच्या भाषेत सांगायचं झालं तर प्योर ऑरग्यानिक. या शेतकऱ्यांनी रसवंती गृहांचा यशस्वी ब्रॅंडच बनवला. तेही कुठलाही बडेजाव किंवा मार्केटिंग न करता. गेली ८ दशकं ही रसवंती गृह, ग्राहकांची तृष्णा प्रामाणिक पणे भागविण्याचा अविरत प्रयत्न करत आहेत.

Source : Youtube

बरं या रसवंती गृहाचे ब्रॅंड नेम कसे ठरले हा प्रश्न तुम्हाला आता पडला असेल.., तर बोपगावजवळच्या डोंगरावर नाथसंप्रदायाच्या नऊ नाथांपैकी कानिफनाथांची गुहा आहे. या गुहेत कानिफनाथांनी तपश्चर्या केली होती. अख्खा पुरंदर तालुका कानिफनाथांचा भक्त आहे. त्याचमुळे इथल्या शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या रसवंती गृहांच्या चेनचे नावही मोठ्या श्रध्देने नवनाथ किंवा कानिफनाथ ठेवण्यात आलं.

पूर्वी बैलांच्या सहाय्याने रसाच्या लाकडी घाण्यावर रस काढला जायचा. त्यानंतर प्रगत तंत्रज्ञानाची कास या शेतकऱ्यानी धरली. आणि लोखंडी मशिन्सवर रस काढण्यात येऊ लागला. सुरुवातीच्या काळात लाडक्या बैल जोडीच्या मदतीने व्यवसाय जोमाने वाढला होता. त्यांनीच आपल्याला जगवलं होतं, हे शेतकरी विसरले नाहीत. म्हणूनच बैलाच्या गळ्यातले घुंगरु उसाच्या गुऱ्हाळावर बांधले जातात.

आता शेतकऱ्याची प्रत्येक पिढी त्या बैलांच्या ऋणाईत आनंदाने कानिफनाथ रसवंती गृह चालवत आहेत. तुमची ती स्टारबक्सची महागडी कॉफीही या रसवंती गृहाच्या रसासमोर झक मारते की नाही?


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *