ज्यू, ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मियांसाठी जेरुसलेमची भूमी पवित्र मानली जाते. कारण याच शहरात या तिन्ही धर्मांचा उदय झाला. त्यामुळे ही मान्यता तिथे राहणाऱ्या नागरिकांपुरतीच मर्यादित नाही, तर जगभरातील तीन चतुर्थांश लोकं या भूमिला पवित्र भूमी मानतात. त्याच बरोबर या तिन्हीही धर्मांचे लोक या शहरावर आपला हक्क सांगतात. असे हे प्राचीन शहर सध्या सुरु असणाऱ्या इस्त्राईल-फिलिस्तीन संघर्षामुळे चर्चेत आलं.
जेरुसलेमला हिब्रूमध्ये येरुशलेम आणि अरबीमध्ये अल-कुड्स म्हणून ओळखले जात असे. हे शहर जगभरातल्या प्राचिन शहरांपैकी एक असून वारंवार या शहरावर हल्ले झाले, त्यात ते उद्ध्वस्त होत गेलं आणि वेळोवेळी नव्याने उभारण्यातही आलं.
ह्या शहरात अनेक गल्ली बोळ असून त्यांची रचना चक्रव्युहासारखी दिसते. म्हणूनच हे शहर म्हणजे ऐतिहासिक वास्तुकलेचा सुंदर नमुनाच आहे. शहराचे विभाजन अनुक्रमे चार भागात झाले असून तिथे इस्लाम, ख्रिस्ती, ज्यू आणि आर्मेनियन धर्मीय लोक राहतात. हे जगातील सर्वात पवित्र शहर आहे आणि हेच इस्त्राईल-पॅलेस्टाईनच्या संघर्षाचे कारण आहे.
जेरुसेलमचा इतिहास:
इतिहास अभ्यासकांच्या मते जेरुसलेममध्ये कांस्य युगाच्या सुरुवातीला म्हणजेच सुमारे इसवी सन पूर्व ३५०० च्या दरम्यान मानव वस्ती निर्माण झाली. असंही म्हणतात साधारणतः एक हजार इसवीसन पूर्व काळात राजा डेव्हीडने जेरुसेलेम जिंकले आणि ज्यू राज्याची राजधानी इथे स्थापन केली. त्यानंतर ४० वर्षांनी डेव्हीडचा मुलगा सॉलेमनने जेरुसेलेममध्ये पहिले पवित्र मंदिर बांधले. सुमारे ४०० वर्ष या मंदिरात पूजा अर्चा चालत असे. या मंदिराची खासियत म्हणजे एका पवित्र संदूकीवर हे मंदिर उभारण्यात आले होते. इसवीसन पूर्व ५८६ मध्ये बॅबिलोनियन लोकांनी हे मंदिर नष्ट केले आणि ज्यूंना बंदिवासात पाठवले. या पहिल्या मंदिराचे तपशीलवार वर्णन बायबलमध्ये आढळते. मात्र पुरातत्व विभागाला आजपर्यंत या मंदिराच ठोस पुरावे सापडले नाहीत.
जेरुसलेमचे आध्यात्मिक महत्त्व :
सुमारे ५० वर्षांनंतर, पर्शियन राजा सायरसने, ज्युंना जेरुसेलममध्ये येऊन पुन्हा मंदिर स्थापन करण्याची परवानगी दिली. त्यानंतर इसवी सन पूर्व ३३२ अलेक्झांडर द ग्रेटने जेरुसलेमचा ताबा घेतला. त्याच्या पुढील १०० वर्षात रोमन, पर्शियन, अरब, फातिमिड, सेल्जुक तुर्क, क्रुसेडर, इजिप्शियन, मामलुक आणि इस्लामवादी अशा अनेक लोकांनी जेरुसलेमवर राज्य केलं. ही होती जेरुसलेमची ऐतिहासिक पार्श्वभूमी. आता याची आध्यात्मिक पार्श्वभूमि काय आहे याबाबत जाणून घेऊया.
इस्लाम धर्मियांच्या मते जेरुसलेममध्ये एक नमाज अदा केली की ४० हजार नमाज आदा केल्याचं पुण्य मिळतं.
“ज्याप्रमाणे जेरुसलेम डोंगरांनी वेढलेलं आहे, त्याचप्रमाणे ईश्वरानेही आपल्या लेकरांना कुशीत घेतलं आहे, आज आणि कायमचंच.” जेरुसेलमचे हे वर्णन ख्रिस्ती धर्मियांच्या पवित्र बायबल ग्रंथामध्ये केलं आहे.
तर “जगात ज्या १० सुंदर गोष्टी ईश्वराने दिल्या आहेत, त्यातल्या ९ गोष्टी ह्या जेरुसलेममध्येच मिळाल्या, असं ज्यूंच्या तालमुदमध्ये सांगण्यात आलं आहे.
या गोष्टीवरुन तुम्हाला या तिन्ही धर्मियांसाठी जेरुसलेम किती पवित्र आहे याची जाणीव झालीच असेल. जेरुसलेममधील टेम्पल माऊंट हा ३५ एकरावर पसरलेला एक डोंगराळ भागातला परिसर आहे. इथे तिन्हीही धर्मातली, धार्मिक स्थळ आहेत. त्यात ज्यूंची पश्चिमी भिंत म्हणजेच वेस्टर्न वॉल इथेच आहे. ज्या डोंगरावर पूर्वी सॉलेमनने पवित्र मंदिर बांधले होते त्याच्या पायाशी असलेली ही भिंत म्हणून ज्यूंचे हे श्रध्दास्थान.
ख्रिस्ती धर्मियांचे चर्च ऑफ ऑफ होली सेपलकर ही याच डोंगरावर आहे. ख्रिस्ती धर्मियांसाठीही हे शहर तितकेच महत्त्वाचे कारण त्यांच्या प्रभू येशूंनी शेवटचे जेवण याच शहरात घेतलं. त्यानंतरच ज्यू धर्मगुरुंच्या सांगण्यावरुन रोमन सरदारांनी त्यांना मृत्यूदंड सूनावला आणि याच शहरात त्यांना क्रुसावर चढविण्यात आलं. इथल्याच एका गुहेत त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं. तिथूनच ते गायब होऊन मृत्यूपश्चात जिवंत झाले होते. त्यामुळेच जगभरातील ख्रिस्त धर्मियांची नाळ जेरुसेलमशी जोडलेली आहे.
इस्लाम धर्मियांची अल- अक्सा मशीद सुध्दा याच डोंगरावर आहे. जेरुसलेमच्या भूमितच प्रेषित अब्राहम यांनी एकेश्वरवादाचा पाया रचला. ज्यू, ख्रिस्ती आणि इस्लाम तिन्हीही धर्मांचे एकेश्वरवादी मूळ अब्राहम यांच्या विचारांशी निगडीत आहे. अब्राहम यांचा कालावधी हा साधारणतः ख्रिस्तपूर्व १८०० वर्ष असल्याचा दावा इतिहास तज्ज्ञ करतात.
या तीनही धर्मांची पाळंमुळं ही जेरुसलेमच्या भूमिशी जुळली असल्याने जगातील तीन चतुर्थांश लोकांच्या भावना या शहराशी जोडल्या गेल्या आहेत आणि म्हणून तिन्ही धर्म या शहरावर आपला हक्क सांगतात.
0 Comments