भारतातील 5 अशी मंदिरे जेथे पुरुषांना जाण्यास मनाई आहे!

भारतात अशा मंदिरांची संख्या खरंच खूप जास्त आहे. पण आपण प्रमुख 5 मंदिरांबाबत जाणून घेऊ जेथे पुरूषांची सावली सुद्धा चालत नाही.


आजवर आपण असंच समजत आलो आहोत की स्त्रियांना समाजात नेहमी दुय्यम स्थान देण्यात आले. जसं की मंदिरांमध्ये स्त्रियांपेक्षा नेहमीच पुरुषांना प्राधान्य दिले जाते. धार्मिक कार्यात सुद्धा मागे ठेवले जाते. शिवाय आपल्या संस्कृतीमध्ये असे अनेक देव आहेत ज्यांना स्त्रियांची सावली सुद्धा चालत नाही. त्यामुळे भारतात अशी काही मंदिरे आहेत जेथे स्त्रियांना बिलकुल प्रवेश नाही. पण मंडळी ही नाण्याची एक बाजू असली तरी दुसऱ्या बाजूला अशी सुद्धा काही मंदिरे आहेत जेथे पुरुषांना प्रवेश नाही. भारतात अशा मंदिरांची संख्या खरंच खूप जास्त आहे. पण आपण प्रमुख 5 मंदिरांबाबत जाणून घेऊ जेथे पुरूषांची सावली सुद्धा चालत नाही.

कन्याकुमारी मंदिर, कन्याकुमारी

हे भारतातील असे एकमेव मंदिर असेल जेथे पुरुषांनी मंदिरात न येण्याचा नियम अत्यंत कडक पद्धतीने पाळला जातो. कन्याकुमारी मध्ये वसलेल्या या मंदिरात केवळ संन्याशी पुरुषांना मंदिराच्या गेट पर्यंत येण्याची मुभा आहे. बाकी इतर सर्व प्रकारच्या पुरुषांना मंदिराच्या परिसरात जाण्याची देखील मनाई आहे. हे मंदिर देवीच्या ५२ शक्तीपिठांपैकी एक असल्याने या मंदिराचा महिमा फार मोठा आहे. पुराणातील कथेनुसार या ठिकाणी लग्नाच्या दिवशी भगवान शंकराने देवी पार्वतीचा अनादर केला होता. त्यामुळेच पुरुषांनी मंदिरात न येण्याची प्रथा इथे पडली.

ब्रम्हदेव मंदिर, राजस्थान

आपल्या भारतात ब्रम्हदेवाची मंदिरे फार कमी आहेत. त्यापैकी सर्वात प्रमुख मंदिर म्हणून राजस्थानचे हे ब्रम्हदेव मंदिर ओळखले जाते. ब्रम्हदेव हे स्वत: पुरुष असले तरी या मंदिरात त्या पुरुषांना जाण्यास मनाई आहे जे विवाहित आहेत. अशी प्रथा का पडली तर त्यामागे एक दंथकथा सांगितली जाते. झालं असं की एकदा ब्रम्हदेवाने आपली पत्नी देवी सरस्वती सोबत एका यज्ञाचे आयोजन केले होते. पण देवी सरस्वतीला पोहोचायला उशीर झाला. अशावेळी ब्रम्हदेवाने देवी गायत्रीशी लग्न करून हा यज्ञ पूर्ण केला. जेव्हा हे देवी सरस्वतीला कळले तेव्हा तिने ब्रम्हदेवालाच शाप दिला की, “यापुढे कोणीही विवाहित पुरुष ब्रम्हदेवाच्या दर्शनाला जाणार नाही, अन्यथा त्याच्या वैवाहिक आयुष्यात बाधा येईल.”

कामाख्या मंदिर, आसाम

Source : intoday.in

या मंदिराबद्दल तुम्हाला देखील नक्की माहित असेल. वर्षातील चार दिवस कामाख्या देवीचा मासिक पाळीचा काळ असतो आणि या काळात देवी विश्रांती घेते अशी धारणा आहे. या काळात मंदिराचा मुख्य दरवाजा चार दिवसांसाठी बंद केला जातो. या काळात पुरुषांना मंदिरात येणास बंदी घातली जाते. केवळ संन्याशी पुरुष आणि स्त्रियाच देवीच्या सेवासाठी आत जाऊ शकतात.

माता मंदिर, मुझफ्फरनगर

हे भारतातील एक प्रमुख शक्ती पीठ असून आसाम मधील कामाख्या मंदिरा प्रमाणे या मंदिरातील देवीचा सुद्धा मासिक पाळीचा एक काळ असतो आणि या काळात मंदिराची सुरक्षा अधिक वाढवली जाते व मंदिराच्या आवारात सर्व पुरुषांना येण्यास मज्जाव असतो. एवढेच नाही तर मंदिराचे जे मुख्य पुरुष पुजारी आहेत त्यांना सुद्धा मंदिरात येणास बंदी असते. या तीन-चार दिवसांच्या काळात केवळ स्त्रियाच मंदिरात येऊ शकतात.

अट्टुकल भगवती मंदिर, केरळ

केरळ मधील अट्टुकल भगवती मंदिर हे स्त्री शक्तीचा अद्भुत सोहळा दाखवणारं एक मंदिर आहे. येथे अट्टुकल पोंगल म्हणून एक सण साजरा केला जातो. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तब्बल 10 दिवसांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या या सोहळ्यात एवढ्या स्त्रिया सामील होतात की गिनीज वर्ल्ड रेकोर्ड मध्ये सुद्धा जगातील स्त्रियांची सर्वात मोठी यात्रा म्हणून या सोहळ्याची नोंद झालेली आहे.

तर पुरुषप्रधान समाजात स्त्री शक्तीचा सोहळा साजरा करणारी ही मंदिरे आपले एक वेगळे स्थान निर्माण करून आहेत.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

Shraddha More