धर्म ख्रिश्चन पण भाषा अस्सल मराठी असणाऱ्या इस्ट इंडियन समाजाचा इतिहास!

हि सर्व मंडळी ख्रिस्ती असली तरी कुठून परदेशातून आलेली नसून अस्सल भारतीय वंशाची आहेत व आजही त्यांनी आपापल्या संस्कृती मोठ्या अभिमानाने जपल्यायत.


मंडळी, तुम्हाला माहितीये का.. मुंबईत व आसपासच्या उपनगरात एक असा समाज आहे जो स्वतःला इस्ट इंडियन म्हणवतो. शहरी भागातल्या गावठणांत किंवा कोळीवाड्यातली ही ख्रिस्ती धर्मीय मंडळी आपापसात मराठी किंवा मराठीच्या पोटभाषांतून बोलताना आपल्याला बऱ्याचदा दिसून येतात.. ख्रिश्चन ते देखिल मराठी बोलणारे?? आपल्यापैकी बहुतेकांना नवल वाटल असेल! शिवाय असा प्रश्नही पडला असेल की, ईस्ट इंडियन्स म्हणजे नक्की कोण?

तर या प्रश्नाचं उत्तर जाणून घेताना थोडंसं इतिहासात डोकावूया.. पंधराव्या शतकाच्या सुरवातीला व्यापाराच्या उद्देशाने गोव्यात उतरलेल्या पोर्तुगीजांनी पुढे चौल, साष्टी (ठाणे), मुंबई, वसई, डहाणू ते थेट दिव-दमणपर्यंत आपला साम्राज्यविस्तार केला. यादरम्यान धर्मांध पोर्तुगीजांनी स्थानिक प्रजेवर प्रचंड जुलूम करत सक्तीचं धर्मांतर केलं. त्यामुळे वरील प्रदेशांतील विविध जाती-जमातीतील स्थानिक समुदाय हे हिंदू धर्मातून धर्मांतरीत होऊन ख्रिस्ती धर्माचं अनुसरण करू लागले.

Source : firstpost.com

उदाहरणार्थ आगरी, कोळी,भंडारी, वाडवळ, कुपारी, पाचकळशी, कुणबी यांसारखे अनेक समूह ख्रिस्ती धर्मामध्ये सामावलेले गेले व पोर्तुगीज हे ‘रोमन कॅथलिक’ असल्यामुळे आपसुकच त्या समाजाचा भाग बनले. हा सर्व समाज आज इस्ट इंडियन म्हणून ओळखला जातो.

बरं हि सर्व मंडळी ख्रिस्ती असली तरी कुठून परदेशातून आलेली नसून अस्सल भारतीय वंशाची आहेत व आजही त्यांनी आपापल्या संस्कृती मोठ्या अभिमानाने जपल्यायत. बहुतेकांची मातृभाषा ही मराठी (किंवा मराठीची पोटभाषा) आहे. आता एवढं सर्व असूनही यांना ईस्ट इंडियन का संबोधण्यात आले असावे?

वास्तविक ईस्ट इंडियन म्हटल्यावर सर्वप्रथम ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी ध्यानात येते; त्यामुळे ही लोकं ब्रिटिशांच्या कंपनीत कामाला असावी असं वाटणं सहाजिकच आहे. पण हा निव्वळ गैरसमज आहे. खरं तर कंपनी सरकार बरखास्त होऊन भारतात राणी सरकार आल्यानंतर ह्या समाजाला ‘ईस्ट इंडियन्स’ अशी ओळख मिळाली. राणी सरकारच्या काळात मुंबईत विकासकामांची सुरूवात झाली. तसं पाहिलं तर मुंबई ही पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली असताना तितकीशी वसवली गेली नव्हती कारण पोर्तुगिजांचा उत्तर कोकणातला सर्व कारभार हा वसईहून चालत असे. पण ब्रिटिशकाळात मुंबईला व्यापाराच्या दृष्टीने अधिक महत्त्व प्राप्त झालं आणि सरकारने स्थानिकांचे भूखंड संपादित करून नागरीकरणास सुरूवात केली.

यामुळे स्थानिक समाज भूमीहीन झाला व त्यांच्या जमिनींवर रेल्वे, इस्पितळे, नगरपालिका, व्यापारी व गृह संकुले यांसारखे प्रकल्प राबवून मुंबई वसवली गेली. पुढे देशभरातून विविध समाजाची लोकं मुंबईत येऊन स्थायिक झाली (अनेकांना ब्रिटिशांनी पाचारण केले उदा. आज मुंबईत स्थायिक झालेला पारशी समाज हा मूळचा गुजरातहून आलेला आहे). शिवाय गोवा, मंगरूळ वगैरे प्रांतातील ख्रिश्चन देखील मुंबईत वस्तीस येऊ लागले.

तेव्हा स्थानिक भुमिपुत्र असलेला ह्या समाजाला शासन दरबारात आपली वेगळी ओळख निर्माण व्हावी असे वाटू लागले. आपल्या वडिलोपार्जित, हक्काच्या जमिनींवर वसवलेल्या मुंबईत भुमिपुत्र या नात्याने सरकारकडून काही सवलती मिळाव्यात म्हणून १८८७ साली सर्वप्रथम ‘इस्ट इंडियन’ हे नाव धारण करून ह्या ख्रिश्चन समाजाने राणीच्या सुवर्णमहोत्सवात हजेरी लावली. तेव्हापासून आजपर्यंत हे नाव रूढ आहे.

Source : wikimedia.org

आता मुंबई, ठाणे, वसई भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असूनही इथल्या ख्रिस्ती लोकांना ‘ईस्ट इंडियन’ म्हणण्यामागचं कारण काय? तर ही गावं जरी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेली असली तरी युरोपियन देशांच्या पूर्वेस आहेत असाही एक अंदाज लावता येतो. आता ईस्ट इंडियन्स कोण होते याचा आपण थोडक्यात आढावा घेतलाच आहे तर जाणून घेऊया त्यांची गावं व संस्कृती यांबद्दलही थोडी माहिती..

७ बेटांपासून बनलेली मुंबई म्हणजेच Bombay (Mobai, Golaba, AL-Omanis, Mazagaon, Worii, Parel आणि Mahim), सालसेत म्हणजेच the islands of Salsette (Salsette proper, Trombay, Juhu, Versova, Marva, Dharavi, Rai and Murdha), वसई Vasai, parts of Thana ठाणे आणि parts of Raigad रायगड इथले स्थानिक ख्रिश्चन भुमिपुत्र म्हणजे इस्ट इंडियन्स. या भागातली गावं ही त्यांची जन्मभूमी.

या गावांची लुप्त होत चाललेली संस्कृती जाणून घ्यायची असल्यास मनोरी गावातल्या ‘मोबाई भवन’ म्हणजेच ‘काका बाप्टिस्ट इस्ट इंडियन म्युझियम’ला भेट द्यायलाच हवी. इथे तुम्हाला पहायला मिळेल अगदी जुन्या काळातल्या अनेक वस्तूंचं संकलन.

इस्ट इंडियन महिलांचे पारंपारिक कपडे व दागिने, हत्यारं व अवजारं, जुनी मातीची भांडी, जुन्या काळात वापरले जाणारे वाईन ग्लास, अल्तार (Alters), काही टिपिकल लाकडी फर्निचर व कालबाह्य होत चाललेल्या अनेक वस्तू जसं की जातं, छकडा (बैलगाडी), पाटा-वरवंटा, सुप-रोवळी, तांब्या पितळेच्या कळश्या- घागरी- हंडे, चिनी मातीच्या बरण्या, खापरी (भाजण्यासाठी वापरण्यात येणारा तवा), चिमणी किंवा फणस (कंदील), उखळ, मोरली (मासे कापण्याची विळी), कोयती, खवणी (नारळ खवण्याचं यंत्र), घुमट (स्थानिक वाद्य) आणि अजूनही खुप काही. या सर्व वस्तूंना बोलीभाषेत काय म्हटले जाते हे देखील तुम्ही इथे वाचू शकता. त्याशिवाय काही सुंदर पुस्तकांचा संग्रहसुद्धा पहायला मिळतो.

Source : whatshot.in

तर मित्रांनो असे हे मराठमोळे इस्ट इंडियन्स. यापुढे एखादी ख्रिश्चन व्यक्ती तुमच्याशी अस्खलित मराठीतून बोलली तर नवल वाटून घेऊ नका, उलट समजून जा की ज्या मुंबईत किंवा जवळच्या उपनगरात आपण रहातोय त्या जागेचे हे भुमिपुत्र किंवा स्थानिक रहिवाशीच!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *