तुम्ही अमकं एक प्रोडक्ट १० जणांना विका मग तुम्हाला त्यावर बोनस मिळेल. त्या १० जणातल्या प्रत्येकाने ते प्रोडक्ट अजून दहा जणांना विकलं तरीही तुम्हाला बोनस मिळत जाईल. ही साखळी जितकी वाढत जाईल तितकाच तुमचा बॅंक बॅलेन्सही वाढत जाईल. असं सांगणाऱ्या बऱ्याच कंपन्या मार्केटमध्ये आल्या आणि गेल्या. त्यात काही जणं खरचं गब्बर झाले तर काही जणांना तोटा झाला. तुम्हाला ठाऊक असेलच या साखळी बिझनेस प्रकाराला मल्टी लेव्हल मार्केटिंग (MLM) म्हणतात. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की या मल्टी लेव्हल मार्केटिंग कंपन्या म्हणजे नेमकी काय भानगड आहे? आज मवाली तुमच्या मनातल्या अनेक शंकांच निवारण करणार आहे.
सगळ्यात आधी मल्टी लेव्हल मार्केटिंग कंपनी म्हणजे काय ते आपण पाहू. मल्टी लेव्हल मार्केटिंगच्या माध्यमातून कंपनी आपले प्रोडक्ट किंवा सेवा थेट ग्राहकांना विकतात. मल्टी लेव्ह मार्केटिंग मध्ये केलेली गुंतवणूक वितरक, सहभागी, कंत्राटदार किंवा संस्थापक म्हणून ओळखली जाते. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर तुम्ही थेट किरकोळ विक्रेता म्हणून किंवा नवीन सदस्यांची भरती करुन तुम्ही तुमची कंपनी चालवू शकता.
यात हे सदस्य स्वतः तुमचं प्रोडक्ट खरेदी करतात आणि त्याची पुर्नविक्री करतात. जेव्हा ते पुर्नविक्री करतात तेव्हा त्यांना प्रत्येक प्रोडक्ट मागे ठरलेलं कमिशन मिळतं. त्याच बरोबर त्यांनी अजून सदस्य जोडून घेतले तर त्यामागेही त्यांना कमिशन मिळत जातं. एकूणच काय तर तुम्ही जितकी मोठी सदस्यांची साखळी बनवाल, तितके जास्त कमिशन तुम्हाला मिळत जाईल.
बऱ्याचदा मल्टी लेव्हल मार्केटिंग कंपन्यांकडून फसवणूक झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. फसवणूक करणाऱ्या कंपन्या तुम्हाला तुमचे पैसे गुंतवण्यासाठी प्रवृत्त करतात आणि कोणत्याही जोखमेशिवाय भरपूर पैसे कमविण्याचं गाजरही दाखवतात. मग या कंपन्या गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करतात. ते नवीन गुंतवणूकदारांना पैसेही देतात मात्र त्यातला मोठा शेअर स्वतःसाठी ठेवतात. या कंपन्यांना रेव्हेन्यू म्हणजेच प्रत्यक्ष महसूल मिळतच नाही. ती कंपनी स्थिर राहण्यासाठी त्यांना नवीन सदस्य जोडून पैशाचा प्रवाह स्थिर ठेवावा लागतो.
अशावेळी त्या कंपन्या या पैशावरच अवलंबून असतात. मात्र जेव्हा नवीन सदस्य मिळण्याचं प्रमाण कमी होत जातं, तसं या कंपन्या आपला गाश्या गुंडाळतात आणि चक्क गायब होतात. स्वतःची तुंबडी भरण्यासाठी त्यांनी तुमची फसवणूक केलेली असतेच, पण त्याच सोबत इतरांची फसवणूक करण्यासाठी तुमचा वापरही केला असतो.
या कंपन्यांच्या जाहिराती इतक्या आकर्षक असतात की, भोळे भाबडे लोक त्यावर लागलीच विश्वास ठेवतात. आता तर सोशल मीडियावर अशा जाहिरातींचा भडीमार असतो. तुम्हीही वाचलंच असेल की,
केवळ योजनेत सामील व्हा आणि डॉलर्समध्ये कमवा.
घरुन काम करा आणि दरमहा ५० हजार कमवा.
तुम्हीच तुमच्या कंपनीचे मालक आहात.
तुम्हाला घरी बसून जास्त पैसे कमवायचे आहे का?
निरोगी आणि समृध्द जीवन जगायचं आहे?आमच्यासोबत नोंदणी करा.
या कंपन्या जास्त करुन कॉलेज स्टुडंट, गृहिणी, जेष्ठ नागरिक यांना टार्गेट केलं जातं. गरज म्हणून ही लोकं गुंतवणूक करतात आणि बळी पडतात. तर एकूणच काय नीट पडताळणी केल्या शिवाय या फंदात पडू नका.
आता तुम्हाला वाटेल इतके घोटाळे होतात तर यावर काही कायदे नाहीत का? तर भारतीय ठेव संकलनाचे नियमन करणारे कायदे आहेत. या कायद्यानुसार MLM कंपन्यांवर नियंत्रण ठेवले जाते.
अनियंत्रित ठेव योजनांवर बंदी घालण्याचा कायदा, २०१९
१९८२ चा चिट फंड कायदा (चिट फंड कायदा) – हा कायदा चिट फंडांच्या ऑपरेशनला नियंत्रित करतो.
बक्षीस चिट्स आणि मनी सर्कुलेशन स्कीम्स बंदी कायदा, १९७८
कंपनी कायदा, २०१३ (२०१४ च्या कंपनी नियमांनुरास सुधारित)
भारतीय सिक्युरिटीज ऍन्ड एक्सचेंज बोर्ड ऍक्ट, १९९२ आणि सिक्युरिटीज ऍंन्ड एक्सेंज बोर्ड ऑफ इंडिया ऍक्ट,१९९९
तुम्ही म्हणाल की सगळ्याच MLM कंपनी फसवणूक करतात का? तर तसं नाही. काही कंपन्या अनेक वर्ष ग्राहकांचा विश्वास टिकवून आहेत आणि चांगले प्रोडक्टही देतात. ऍम्वे, एवॉन, मेरीकी, फॉरएव्हर लिव्हींग, हर्बल लाईफ आणि टपरवेअर सारख्या कंपन्या MLM कंपन्यांचे उत्तम उदाहरणच आहेत असं म्हणावं लागेल. एकूणच तुम्हाला MLM कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायचीच असेल तर डोळ्यात तेल घालून कंपनीच्या पॉलिसीज् वाचा. जरा त्या कंपनीच्या बद्दल रिसर्च करा. कंपनीचे इनव्हेस्टर कोण आहेत त्यांचे सोशल मीडिया प्रोफाईल्स पहा.
मुळात ते काय प्रोडक्ट विकत आहेत त्याची विश्वासार्हता सगळं पडताळून घ्या. आणि मगच काय ते गुंतवणूक करा. काय आपण स्वकष्टाने कमावलेली मिळकत कोणत्याही ऐऱ्या गैऱ्याच्या हातात दिली तर पश्चातापाशिवाय हाती काहीच लागणार नाही.
Network marketing