आपल्याकडून लुबाडलेला काळा पैसा पांढरा करण्यासाठी नेते वापरतात ‘ही’ पद्धत!

जगातील बहुतांश बेकायदेशीर पैसा हा हवालाच्या माध्यमातूनच हस्तांतरित होत असतो. अर्थातच ही एक बेकायदेशीर प्रक्रिया आहे. त्यामुळे कोणत्याही देशामध्ये हवाला हे प्रतिबंधित आहे.


हवाला..हा शब्द आजवर तुम्ही खूप ठिकाणी ऐकला वा वाचला असेल. चित्रपटांमध्ये, टीव्हीवर, न्यूजपेपर मध्ये पण तुम्हाला हे नेमकं प्रकरण काय आहे हे माहित आहे का? नाही? चला आम्ही आहोत ना. आज जाणून घेऊ हे संपूर्ण हवाला प्रकरण!

समजा भारतातला एखादा राजकारणी आहे आणि त्याने बेकायदेशीरपणे खूप संपत्ती जमवली आहे, पण हा पैसा आला कुठून हे दाखवायला त्याच्याकडे पुरावे नाही. शिवाय अर्धा अधिक पैसा तर कर चोरीचा आहे म्हणजे त्याने त्यावर कर भरलेला नाही. कर भरला नाही म्हणजेच तो झाला ब्लॅक मनी! आता ह्या ब्लॅक मनीला त्याला करायचे असते व्हाईट अर्थात कायदेशीर, मग अशावेळी त्याच्या समोर अनेक पर्याय असतात. त्यापैकी दोन मुख्य पर्याय म्हणजे हवाला आणि मनी लॉन्डरिंग!  

ह्यापैकी हवाला पद्धत अधिक जास्त प्रसिद्ध आहे.  याला हुंडी बाजार असे सुद्धा म्हणतात. जगातील बहुतांश बेकायदेशीर पैसा हा हवालाच्या माध्यमातूनच हस्तांतरित होत असतो. अर्थातच ही एक बेकायदेशीर प्रक्रिया आहे. त्यामुळे कोणत्याही देशामध्ये हवाला हे प्रतिबंधित आहे.

आता तुम्हाला हे तर माहित असेलच की ब्लॅक मनी जमा करणाऱ्यांचा खूप पैसा हा बाहेरील देशांच्या बँक खात्यामध्ये असतो. तिथे तो पैसा व्हाईट होतो किंवा अनेक जण बाहेरील देशांत संपत्ती सुद्धा खरेदी करतात. सामान्यत: जर तुम्हाला बाहेरील बँक खात्यात पैसे पाठवायचे असतील किंवा तुम्हाला बाहेरील देशांत संपत्ती खरेदी करायची असेल तर तुम्ही काय कराल तर बँकेच्या माध्यमातून तिकडे पैसे ट्रान्स्फर कराल. यावर बँक तुम्हाला चार्ज लावेल. शिवाय जर रक्कम मोठी असेल तर अनेकदा तुम्हाला तुमचा पैसा कुठून आला याचे पुरावे देखील द्यावे लागतात. आयकर विभाग सुद्धा मोठ्या रकमांवर नजर ठेवून असते, जर खरा माणूस असेल तर तो हीच पद्धत वापरेल.

पण आपण वर उदाहरण म्हणून घेतलेला राजकारणी जो आहे त्याचा हा पैसा म्हणजे ब्लॅक मनी आहे आणि त्यामुळे तो ही सरळ पद्धत वापरणार नाही. कारण त्याला पैश्यांचा पुरावा द्यावा लागेल शिवाय त्याने त्या पैश्यावर कर सुद्धा भरलेला नाही. त्यामुळे तो फसू शकतो अशावेळी हवाला अशा लोकांसाठी वरदान ठरते.

तर ह्या राजकारण्याला समजा अमेरिकेमध्ये 5 कोटी रुपये पाठवायचे आहेत. तर हा राजकारणी एखाद्या हवाला एजंटशी संपर्क करणार. आता हे हवाला एजंट सुद्धा रस्त्यावर दुकान टाकून बसलेले नसतात. तुमचे संपर्क तेवढे तगडे हवे तरच तुम्ही त्यांच्या सर्कल मध्ये पोहचू शकतो. तर आपला हा राजकारणी हे 5 कोटी एजंटला देणार आणि त्याला सांगणार कि अमेरिकेमध्ये मार्क नावाचा एक माणूस आहे त्याला एवढे पैसे पोचते करा.  मग हा एजंट आपल्या राजकारण्याला एक खास पासवर्ड देणार. हा पासवर्ड हा राजकारणी मार्कला सांगणार. हा पासवर्ड लीक होता कामा नये ही जबाबदारी पैसे पाठवणाऱ्याची, कारण ज्याच्याकडे पासवर्ड त्यालाच हे पैसे मिळणार.

पासवर्ड सांगून झाला की भारतातील हवाला एजंट आपल्या अमेरिकेतील ओळखीच्या हवाला एजंटला सांगणार की मार्क नावाचा एक माणूस 5 कोटी रुपये घेण्यास येईल आणि असा अमुक पासवर्ड सांगेल तेव्हा त्याला अमेरिकन डॉलर मध्ये तेवढे रुपये दे. मग मार्क जाणार आणि ते पैसे तिथून घेणार.

तर मंडळी अशाप्रकारे आपल्या राजकारण्याचे पैसे अमेरिकेत कोणाला सुगावाही न लागता पोचले सुद्धा! ना बँकेला कळले, ना सरकारला, ना करन्सी एक्सचेंज शुल्क लागले, ना कोणता कर लागला, ना पुरावा द्यावा लागला. फक्त एजंटने 5 कोटींवर एक छोटी टक्केवारी पैसे ट्रान्सफार केले  या नावाखाली चार्ज केली. बँक आकारत असलेल्या शुल्कापेक्षा ही टक्केवारी फारच कमी असते.

आता तुम्ही म्हणाल की मग भारतातील एजंट अमेरिकन एजंटला पैसे कधी देणार? तर मंडळी हे लोक वापरतात मनी लॉन्डरिंगची पद्धत!  मनी लॉन्डरिंगचा शब्दश: अर्थ आहे पैसा धुणे. पण शब्दश: अर्था प्रमाणे खरंच पैसे लॉन्ड्री मध्ये धुतले जात नाहीत. एका वाक्यात सांगायचे झाले तर ब्लॅक मनी व्हाईट करणे याला म्हणतात मनी लॉन्डरिंग!

मनी लॉन्डरिंग ही खोट्या बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून केली जाते. म्हणजे हे लोक अनेक देशांत खोट्या कंपन्या उभ्या करतात. ज्या कंपन्या केवळ नावापुरत्या असतात आणि त्या कंपन्यांमार्फत बिझनेसच्या आणि गुंतवणुकीच्या नावे अगदी कायदेशीरपणे एका देशातून दुसऱ्या देशात पैसा पाठवला जातो. छोट्या छोट्या प्रमाणात रक्कमा पाठवल्या जात असल्याने बँकेला सुद्धा संशय येत नाही आणि मग हा पैसा कायदेशीर होतो. अशाप्रकारे भारतातील एजंट आपल्या अमेरिकेतील एजंटला त्याचे पैसे परत करतो.

तर असा आहे हा हवालाचा सगळा खेळ, जो आजही बेमालूमपणे खेळला जातोय!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

D Vishal