पेट्रोल पंपावर ‘ह्या’ गोष्टींसाठी पैसे देत असाल तर होतेय तुमची फसवणूक!

तुम्हाला माहीत आहे का, पेट्रोल पंपावर तुम्हाला काही सुविधा मोफत उपलब्ध असतात. नव्हे त्या मोफत उपलब्ध करुन देणं पंपचालकासाठी बंधनकारकच असतं.


पेट्रोल डिझेलच्या किंमती कितीही वाढल्या तरीही आपल्याला बऱ्याचदा स्वतःची गाडी वापरण्याशिवाय पर्याय नसतो. एकतर आपल्याला ते सवयीचं आणि सोईचं झालेलं असतं. दुसरं म्हणजे सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय प्रत्येकालाच आवडतील असंही नाही. असो तर पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कितीही वाढ झाली तरी आपण ते खरेदी करतो. अर्थात त्यासाठी आपल्याला पेट्रोलपंपावर जावे लागते.

तुम्हाला माहीत आहे का, पेट्रोल पंपावर तुम्हाला काही सुविधा मोफत उपलब्ध असतात. नव्हे त्या मोफत उपलब्ध करुन देणं पंपचालकासाठी बंधनकारकच असतं. या सुविधा तुम्हाला मिळाल्या नाहीत, तर त्या पंपचालका विरुध्द तुम्ही तक्रारही करू शकता बरं… चला तर मग जाणून घेऊया, पेट्रोल पंपावर कोणत्या सुविधा मोफत मिळतात ते..

गुणवत्ता आणि प्रमाण तपासणी

बऱ्याचदा पेट्रोल किंवा डिझेलमध्ये भेसळ करुन विकले जाते. असे पेट्रोल-डिझेल वाहनांच्या तब्येतीसाठी चांगले नसते. त्यामुळे तुम्हाला कधी पेट्रोलच्या गुणवत्तेबद्दल शंका आली तर तुम्ही चक्क तिथल्या चालकाला पेट्रोल किंवा डिझेलच्या चाचणीसाठी फिल्टर पेपर मागू शकता. हे पेपर तुम्हाला मोफत उपलब्ध करुन देणे हे पेट्रोलपंप चालकासाठी अनिवार्य आहे. याच बरोबर पेट्रोल-डिझेल योग्यप्रमाणात नेमके भरले गेले की नाही याबद्दलही तुम्ही तपासणी करु शकता. लक्षात ठेवा पेट्रोलपंपावर काम करणारे अधिकारी तुम्हाला या सेवा नाकारू शकत नाहीत किंवा त्यासाठी शुल्क आकारू शकत नाहीत.

प्रथमोपचार किट

मध्यवर्ती शहरात किंवा महामार्गावर कुठेही अपघात होऊ शकतात. तुम्हाला रस्त्यावर अपघात झालेला दिसला. त्यावेळी प्रथमोपचाराची सोय होऊ शकत नसेल आणि जवळपास पेट्रोल पंप असेल तर तुम्हाला अद्यावत असे प्रथमोपचार किट तिथे मिळेल. प्रत्येक पेट्रोल पंपावर अद्यावत प्रथमोपचार किट असणे आवश्यक आहे.

इमर्जंसी कॉल

आजकाल सगळ्यांकडेच मोबाईल असतो. पण तुम्हाला माहीत आहेच, की पेट्रोलपंपावर मोबाईल वापरण्यास सक्त मनाई असते. अशात तुम्हाला महत्त्वाचा फोन करायचा झाल्यास. किंवा जवळपास अपघात झाला असेल तुमच्याकडे फोन नसेल, किंवा तुमच्या मोबाईलची बॅटरी गेली आहे आणि तुम्ही रस्त्यावर अडकून पडले असाल, तुम्हाला तातडीने मदतीची गरज असल्यास अशावेळी तुम्ही पेट्रोल पंपावर जाऊन मोफत कॉल करु शकता. त्यामुळे इथुन पुढे अशी परिस्थिती ओढावली तर तुम्ही गांगरुन जाऊ नका.

मोफत स्वच्छतागृह

बाय रोड तुम्ही लांबचा प्रवास करत असाल तर तुम्हाला सगळ्यात मोठी समस्या भेडसावते ती स्वच्छतागृहांची. त्यात जर तुम्ही स्त्री असाल तर विचारुच नका. पण तुम्हाला ठाऊक आहे का, की प्रत्येक पेट्रोल पंपावर एक स्वच्छतागृह असते. आणि ते मोफत वापरण्याची परवानगी सगळ्यांनाच असते. अगदी तुम्ही त्यांचे ग्राहक नसाल तरी ते स्वच्छतागृह वापरु शकता.

मोफत स्वच्छ पिण्याचे पाणी

Source: YouTube.com

पेट्रोलपंप चालकाला पंपावर स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करावीच लागते. याचा फायदा लांबच्या प्रवासासाठी होतो. कारण इथे तुम्ही पाणी पिऊही शकता आणि पाण्याची बाटली भरुनही घेऊ शकता.

टायरमध्ये हवा भरुन देणे

Source: indiamart.com

तुम्ही कोणत्याही पेट्रोलपंपावर पैसे देऊन हवा भरत असाल तर धन्य आहात. कारण प्रत्येक पेट्रोल पंपावर ही सेवा मोफत उपलब्ध करुन देणे हे अनिवार्यच आहे. तुम्ही गाडीच्या टाकीत पेट्रोल भरलं नाही तरी तुम्हाला ही सेवा मोफतच मिळायला हवी. जर त्याकरिता तुमच्याकडून पैसे मागितले गेले तर त्या विरुध्द तुम्ही रितसर तक्रार करू शकता.

काय मग? एक ग्राहक म्हणून तुमचे अधिकार तुम्हाला कळले ना? तर मग बिनधास्त आता या अधिकारांचा वापर करा!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *